News Flash

मना पाहता! : मीच का म्हणून?

सुदेशने व्यायामाचा आनंद घेत घेत व्यायाम करावा, फक्त मधुमेह आणि रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी करू नये.

स्वत:च्या अपेक्षा आणि आयुष्य यांचा ताळमेळ न जमल्यामुळे त्याचा स्वत:शी संघर्ष सुरू आहे.

समोर बसलेल्या सुदेशचं वय सुमारे ४० असावं. त्याच्या चेहऱ्यावरून तो त्रासलेला, थकलेला दिसत होता. डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसत होती. ‘डॉक्टर माझी झोप उडाली आहे. गेले अनेक दिवस मला शांत झोप लागत नाही. झोपायला गेलं की विचार सुरू होतात. मला उच्च रक्तदाब आणि मधुमेह दोन्ही एकदम सुरू झालेत. माझा यावर विश्वासच बसत नाहीये. डॉक्टर म्हणाले की चाळीशीत हे आजार सुरू होतात, काळजी घ्या. एवढंच करा. आणखी काही नको. हे विधान करणं सोपं आहे. पण ते मला पचवणं कठीण जातंय. मुळात मी आठवडय़ातून चार वेळा व्यायाम करतो. माझं वजनही आटोक्यात आहे. मला हे काय व्हावं? त्यावर डॉक्टरांच म्हणणं असं की तुमच्या आई-वडिलांना हे आजार आहेत. आनुवंशिकतेच्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही. दुसरं त्यांचं म्हणणं की तुम्हाला ताण खूप जास्त आहे. ते मी मान्य करतो. पण त्याला माझा काही इलाज नाही. मी चार्टर्ड अकाऊन्टंट आहे. माझ्या कामात मी चांगल्यापैकी व्यग्र असतो. माझी बायको म्हणते की, तुला कामाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. पण मला माझं काम आवडतं. हे आजार झाले म्हणून मी काम बंद करू का? ती म्हणते की तुला कामातून थोडा वेळ काढायला हवा. तिच्या मते मी घरी पुरेसा वेळ देत नाही. तिला आणि मुलीला माझा पुरेसा सहवास मिळत नाही. घरी आलो की तिचं हे टुमणं चालू होतं. मग माझं भांडण होतं तिच्याशी. हल्ली माझी चिडचिड वाढलीय. ती असं म्हणते आहे, पण मलाही ते जाणवतंय. या आजारांचं निदान ऐकल्यापासून तर नक्कीच. डॉक्टरांच्या मते मला थोडी औषधे घ्यावी लागतील इतकंच, मग हे दोन्ही आजार सहजपणे आटोक्यात राहू शकतील. पण माझं म्हणणं इतकं सगळं करूनही मला हे काय व्हावं?’

सुदेशचा प्रश्न तर्कसंगत आहे. आयुष्याकडे तो एका तार्किक नजरेने बघतो. त्याच्या तर्काच्या चौकटीत ज्या गोष्टी बसत नाहीत त्या त्याला मान्यच नाहीत. त्याच्या अपेक्षेनुसार त्याचं आयुष्य चालावं ही त्याची इच्छा आहे. त्याच्या जीवनशैलीची तो त्याला जमेल तशी काळजी घेतो. आनुवंशिकतेचा घटक काही आजारांच्या बाबतीत महत्त्वाचा असतो. मधुमेह आणि रक्तदाब जर दोन्ही पालकांना असतील तर ते होण्याची आनुवंशिक शक्यता बरीच जास्त असते. ती आपण कशी नाकारणार? अशी शक्यता असणाऱ्या मंडळींनी आपली जीवनशैली सांभाळणं गरजेचं असतं. सुदेश त्याच्या परीने प्रयत्न करतोही आहे. दुसरा घटक म्हणजे त्याच्यावर असणारा ताण. ताण म्हणजे तरी शेवटी काय? परिस्थितीने आपल्याकडून केलेली मागणी पुरवताना आपली होणारी अवस्था. ताण कुणाला चुकलेला नाही. काही प्रमाणात ताण आवश्यकही असतो. सुदेशच्या बाबतीत ताणाचं प्रमाण जास्त असावं. त्याची वाढलेली चिडचिड, त्याचा निद्रानाश ही त्याच्या ताणाचीच लक्षणे आहे. तो त्याच्या आजारांच्या निदानाशी, त्याच्या पत्नीशी झगडताना दिसतो आहे. पण वास्तविक पाहता तो स्वत:शीच झगडतो आहे. स्वत:च्या अपेक्षा आणि आयुष्य यांचा ताळमेळ न जमल्यामुळे त्याचा स्वत:शी संघर्ष सुरू आहे. ‘हे माझ्याच वाटय़ाला का यावं?’ हा प्रश्न त्या संघर्षांची एक झलक आहे.

सुदेशने व्यायामाचा आनंद घेत घेत व्यायाम करावा, फक्त मधुमेह आणि रक्तदाब आटोक्यात ठेवण्यासाठी करू नये. दुसरं, त्याने मधून मधून एखाद्या छंदासाठी वेळ द्यावा, ध्यान किंवा योग यातलं काही करायला आवडत असेल तर ते करावं. रोजचं आयुष्य जगताना आवळलेल्या मुठी आणि रोखून धरलेले श्वास-थोडक्यात म्हणजे मनाशी पकडून ठेवलेले दुराग्रह सोडणं गरजेचं असतं. सुदेशला पडलेला प्रश्न त्याला सतावतो आहे. मीच का म्हणून? मलाच का म्हणून? असा प्रश्न कधीही पडला तर स्वत:ला बजावावं, ‘कारण हे बदलण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे.’ आणि असे प्रश्न, आपल्या आयुष्यात जेव्हा चांगल्या घटना घडतात तेव्हा कधीच पडत नाहीत!

डॉ. मनोज भाटवडेकर drmanoj2610@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 3:35 am

Web Title: stress cause sleep deprivation
Next Stories
1 पिंपळपान : कोहळा
2 जंक फूड बाहेरचे अन् घरातले!
3 पिंपळपान : एरंड
Just Now!
X