15 December 2018

News Flash

या चष्म्याआड दडलंय काय?

पूर्वीच्या जाड काचा आणि बोजड फ्रेमची जागा रंगबेरंगी आणि विविध आकारांच्या फ्रेमनी घेतली आहे.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

कोणे एके काळी चष्मा ही लाजिरवाणी बाब होती. चष्म्यावरून विनोद होत असत. एवढेच नाही तर लग्न जमवताना चष्मा अडसर ठरत असे. त्यामुळे दृष्टिदोष माहिती झाल्यावरही समाजभीतीने चष्मा लावला जात नसे. आताच्या तरुणांना हे सांगूनही खरे वाटणार नाही, इतपत आता स्थिती बदलली आहे. गॉगलच्या जोडीनेच चष्मा हा स्टाइलचा भाग झाला आहे.

पूर्वीच्या जाड काचा आणि बोजड फ्रेमची जागा रंगबेरंगी आणि विविध आकारांच्या फ्रेमनी घेतली आहे. काचांमध्येही बदल झाले आहेत. चष्म्याची वाढती बाजारपेठ पाहून अनेक ब्रॅण्डनीही यात उडी घेतली आहे. मात्र त्यामुळेच चष्मा हा आरोग्याशी संबंधित न राहता त्याची गणना आभूषणांमध्ये होऊ लागल्याची भीती आहे. सध्या भारतातील चष्म्यांची बाजारपेठ ही मुख्यत्वे चीन, इटली येथून येणाऱ्या काचा, फ्रेम यावर अवलंबून आहे. चष्मा हा वैद्यकीय साधनांमध्ये मोडत नाही, त्यामुळे बाजारपेठेतील इतर वस्तूंप्रमाणेच त्याच्या किमती ठरतात. आयात केलेल्या काचांच्या मूळ किमती आणि विक्रीयोग्य किंमत यात किती फरक असावा हे बाजारपेठेच्या नियमानुसार ठरते. चष्म्यांच्या किमतींवर आरोग्य मंत्रालयाचे नियंत्रण नाही. त्यामुळेच बाजारात साठ रुपयांपासून साठ हजार रुपयांपर्यंतचे चष्मे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

चष्म्याची काच किंवा फ्रेम हे प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि खर्च करण्याच्या ऐपतीनुसार ठरवले जात असले तरी चष्म्याचा क्रमांक किंवा दृष्टिदोषाची तपासणी मात्र योग्य पद्धतीनेच होणे आवश्यक आहे. चष्म्याची विक्री ही नफायोग्य असल्याने आणि तो नाशवंत नसल्याने अनेकांनी या व्यवसायात सहभाग घेतला आहे. या सर्व व्यक्ती आरोग्याविषयी जागरूक असतीलच असे नाही. त्यामुळे चष्म्याच्या दुकानात असलेल्या यंत्राने आणि अकुशल व्यक्तीने काढलेला डोळ्यांचा क्रमांक चुकीचा ठरू शकतो. त्यानुसार केलेला चष्मा हा दृष्टिदोषावर मात करण्यापेक्षा दोष वाढवणारा ठरण्याची भीती असते. त्यामुळे चष्मा कोणत्याही ब्रॅण्डचा केला तरी त्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

डॉक्टरांकडून डोळ्यांचा क्रमांक काढला असेल तर त्यानुसार ऑनलाइन चष्मा तयार करण्यास हरकत नसावी. मात्र चष्म्याचा योग्य क्रमांक काढण्याएवढी यंत्रणा त्यांच्याकडून घरी पाठवली जात नाही. त्यामुळे दृष्टिदोष योग्य प्रकारे निश्चित करता येत नाही, हे लक्षात घ्यावे.

लेन्स

चष्मा वापरणे गैरसोयीचे वाटत असलेल्यांसाठी लेन्स हा उत्तम पर्याय आहे. अनेक जण चष्म्याऐवजी लेन्सला पसंती देतात. मात्र काहींना लेन्स वापरणे त्रासदायक वाटते. लेन्स लावल्यावर डोळे लाल होणे, पाणी येणे, डोळ्यांना खाज येणे असे प्रकार घडतात, तसेच त्या स्वच्छ करणे, झोपताना काढून ठेवणे काहींना त्रासाचे वाटते. मात्र बहुतेक वेळा हा दोष लेन्सचा नसून तज्ज्ञांच्या मदतीशिवाय लेन्स निवडल्याचा आहे. डोळ्यांची तपासणी करून त्यांना कोणत्या लेन्स सोयीच्या ठरतील हे नेत्रविकारतज्ज्ञ सांगू शकतात. मात्र चष्माविक्रेत्याच्या सोयीने खरेदी केलेल्या लेन्स योग्य ठरतीलच असे नाही. मोठय़ा क्रमांकाचा चष्मा असलेल्यांना फ्रेमच्या कडांच्या बाजूचा परिसर नीट पाहता येत नाही. लेन्स ही कमतरता दूर करतात. दोन्ही डोळय़ांनी एकत्रित पाहण्याची प्रक्रियाही लेन्स लावल्यावर सुधारते.

लेझर ट्रीटमेंट

दृष्टी सुधारण्यासाठी लेझर शस्त्रक्रिया हा सुरक्षित पर्यायही वापरला जातो. मात्र ही शस्त्रक्रिया १८ वर्षांहून अधिक वयानंतर केली जाते. तोपर्यंत डोळय़ांचा आकार तसेच त्याची क्षमता बदलत असल्याने ही शस्त्रक्रिया केली जात नाही. या शस्त्रक्रियेत डोळय़ांच्या बुबुळांची प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण करण्याची क्षमता

(रिफ्रॅक्टिव्ह पॉवर) वाढवली जाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया अधिकाधिक सुरक्षित झाली आहे. मात्र शस्त्रक्रियेनंतर प्रत्येकाचीच दृष्टी १०० टक्के योग्य होत नाही. काहींना या शस्त्रक्रियेनंतरही चष्मा किंवा लेन्स वापरावी लागते. त्याचप्रमाणे दूरची दृष्टी सुधारण्यासाठी ही शस्त्रक्रिया प्रभावी ठरत असली तरी जवळच्या दृष्टिदोषामध्ये पूर्ण सुधारणा होत नाही. अधिक दृष्टिदोष असलेल्या आणि चष्म्याशिवाय पानही न हलणाऱ्या व्यक्तींचे चष्म्यावरील अवलंबित्व या शस्त्रक्रियेनंतर कमी होते.

चष्म्याची काळजी कशी घ्यावी?

* चष्मा कायम स्वच्छ ठेवा.

* लेन्स सतत स्वच्छ ठेवाव्या लागतात, यामुळेही काही जण चष्मा वापरतात. मात्र प्रत्यक्षात चष्माही नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे दृष्टीला अडसर होत नाहीत. काच स्वच्छ करण्याच्या द्रवाने, मऊ  कापडाने चष्मा साफ करावा. काच साफ करताना कापड एकाच दिशेने फिरवावे. चष्म्यावर कापड घासल्याने त्यावर ओरखडे पडतात.

नेहमी चष्मा लावावा

* चष्मा लावण्याचा कंटाळा येतो, सणसमारंभाला कपडय़ांवर शोभत नाही म्हणून चष्मा लावण्याचे टाळले जाते. मात्र त्यामुळे दृष्टिदोष वाढण्याची शक्यता असते.

नेत्रतज्ज्ञांकडे डोळे तपासावेत

* चष्म्यांच्या दुकानात दृष्टिदोष तपासण्याचे यंत्र असले तरी तेथे तज्ज्ञ व्यक्ती नसतात. दर सहा महिन्यांनी नेत्रतज्ज्ञांकडून डोळे तपासून घ्यावेत आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे चष्मा तयार करून घ्यावा. चष्मा जड, सैल किंवा सतत नाकावर येणारा असला तर त्यामुळे दृष्टिदोष वाढतो. चष्मा डोळ्यांवर योग्य पद्धतीने बसेल अशी रचना करून घ्यावी. आता पॉलिकाबरेनेट, अतिनील किरणांपासून बचाव करणाऱ्या काचाही उपलब्ध आहेत.

डोळ्यांसाठी हे करा

* चांगल्या प्रकाशात काम करा.

* संगणक, टॅब, स्मार्टफोनवर सतत काम करू नका. दर तासाला ब्रेक घ्या.

* धावत्या गाडीत वाचन करू नका.

* झोपून पुस्तक वाचू नका.

* पुरेशी झोप ही डोळ्यांसाठीही चांगली असते. अपुऱ्या झोपेमुळे डोळे लाल होतात आणि सुजतात.

* मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असला तर डोळ्यांची नियमित तपासणी करून घ्या.

* डोळ्यांवर स्वत:हून उपचार करणे टाळा. डोळे हे अतिसंवेदनशील असतात. डोळे चोळू नका. त्यामुळे तुमच्या हातांवाटे डोळ्यांना जिवाणू-विषाणूंचा संसर्ग होऊ  शकतो.

* डोळे लाल झाल्यास, अ‍ॅलर्जी झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

– डॉ. बी. सी. चिंचलकर, नेत्रविकारतज्ज्ञ

First Published on March 13, 2018 4:05 am

Web Title: style statement with eyeglasses