फातिमा राधानपूरवाला, आहारतज्ज्ञ

उन्हाळ्यात जास्त घाम येत असल्यामुळे शरीराला इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक पाण्याची आवश्यकता असते. ही गरज साध्या व थंड पाण्याबरोबरच सरबत, फळांचा रस यातूनही पूर्ण केली जाते. मात्र फळांचे रस व सरबत यातून शरीरात अतिरिक्त साखर जाते. यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्याशिवाय साखर खाल्ल्यामुळे उष्मांक वाढून चयापचय क्रियेवर परिणाम होऊ  शकतो. या कारणाने उन्हाळ्यात सरबत किंवा फळांच्या रसातील साखरेच्या प्रमाणाबाबत जागृत असावे.

शीतपेयांमुळे वजन वाढण्याचा धोका

शीतपेयांमध्ये फॉस्फरिक अ‍ॅसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायऑक्साईड यांचा समावेश असतो. शीतपेयांमुळे मूत्रिपड व यकृताला हानी पोहोचते. ३५० मिलीलिटर शीतपेयांमध्ये साधारण ३१.५ ग्रॅम इतकी साखर असते. ही शीतपेये सातत्याने घेतल्यास शरीरातील साखर वाढत जाते. यातून वजन वाढण्याबरोबर मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, हृदयरोग उद्भवतो.

थंड सरबत टाळा

उन्हाळ्यात सरबत किंवा रस पिताना आवर्जून बर्फ टाकला जातो. उन्हाळ्यात शरीराच्या तापमानात वाढ झालेली असल्याने थंड पेय प्यायल्याने शरीराचे तापमान झपाटय़ाने खाली येते. याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होत असतो. शिवाय ज्यांना सर्दी, कफाचा त्रास असेल अशा रुग्णांना उन्हातून आल्या आल्या बर्फ टाकलेले थंड पेय पिणे टाळावे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उपाहारगृह किंवा रस्त्याच्या कडेला रसबत बनवणाऱ्यांकडील बर्फ स्वच्छ पाण्याचा असेल याची शाश्वती नसते, त्यामुळे यातून अतिसार, उलटी याचा त्रास संभवू शकतो.

उपाययोजना

घराबाहेर पडताना घरात तयार केलेले आणि कमी साखर घातलेले सरबत सोबत ठेवावे किंवा पाण्यात इलेक्ट्रॉल पावडर किंवा तत्सम पावडर टाकल्यास फरक पडू शकतो. घरातून सरबत तयार करून घेणे शक्य नसल्यास पाणीयुक्त फळे खावीत. कलिंगड, पेर, द्राक्ष, टरबूज, संत्री, मोसंबी ही फळे खावीत. फळांचा रस प्यावयाचा असल्यास त्यात साखर व बर्फ घालू नये. फळे शक्यतो जेवणापूर्वी खावीत. याशिवाय घरात तयार केलेले कैरी पन्हे, कोकम सरबत, सोलकडी प्यावे. उन्हाळ्यात ताक हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे उन्हाळ्यात दिवसातून एकदा तरी ताक प्यावे. ताकामुळे पोट थंड राहते व त्यात जिरे घातलेले ताक हे पोटातील दाह कमी करणारे आणि पचनास मदत करणारे आहे.  त्या तुलनेत दही किंवा लस्सी खाणे आरोग्यवर्धक नाही. लस्सीत साखरेचे प्रमाण अधिक असते, तर दही खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची भीती असते. त्याशिवाय पिण्याच्या पाण्यात सब्जा घालून ठेवावा आणि हे पाणी पीत राहावे. या पेयांमुळे उन्हाळ्यात वाढणारे आम्लपित्तही नियंत्रणात आणता येते. साखर टाळण्यासाठी मध किंवा गुळाचा वापर करू शकता.