18 September 2020

News Flash

उदरभरण नोहे. ! उन्हाळ्यातील आहार

पाणी गाळून व उकळून तर प्यावेच, परंतु उकळताना त्यात ५ लिटर पाण्याला १ चहाचा चमचा भरून सुंठ घालून पाणी उकळावे.

पाणी गाळून व उकळून तर प्यावेच, परंतु उकळताना त्यात ५ लिटर पाण्याला १ चहाचा चमचा भरून सुंठ घालून पाणी उकळावे.

उन्हाळा म्हणजे भूक कमी लागण्याचे दिवस. या दिवसांत सारखी तहान लागते, भूक लागल्यावरही काहीतरी चटपटीत खावेसे वाटते. साखर घातलेली थंड पेये तर येता-जाता प्यावीशी वाटतात. या दिवसांत अन्नपाणी कसे असावे, कोणत्या पेयांना प्राधान्य द्यावे हे जाणून घेऊ या.

पाणी
* पाणी गाळून व उकळून तर प्यावेच, परंतु उकळताना त्यात ५ लिटर पाण्याला १ चहाचा चमचा भरून सुंठ घालून पाणी उकळावे. त्यामुळे पाण्यापासून होणारा जंतुसंसर्ग काही प्रमाणात टाळता येतो, शिवाय पाणी पाचक गुणधर्माचे बनते. अपचनाच्या तक्रारींपासून दूर राहण्यासाठी ते फायदेशीर.
* माठात वा पाण्याच्या पिंपात वाळा घालून ठेवावा. वाळ्याची पुरचुंडी २-३ दिवसांनी स्वच्छ धुवावी नाहीतर त्याला चिकटा धरतो. वाळ्यामुळे पाणी शीतल गुणधर्माचे होते.
* पिण्याच्या पाण्यात मोगऱ्याची ताजी फुले घालून ठेवली तर पाण्याला छान वास येतोच, पण पाणी शीतल गुणधर्माचे होण्यास मदत होते. अर्थातच ही फुले रोज बदलावीत.

विविध पेये
* कोकम सरबत, आवळा सरबत, लिंबू सरबत, कैरीचे पन्हे अशी पेये उन्हात जाण्यापूर्वी तसेच उन्हातून परत आल्यावर पिण्यास चांगली. या पेयांमध्ये काळे मीठ जरूर घालावे.
* कलिंगड, संत्री, मोसंबी ही फळे आणि ऊस खावा. फळांचा घरीच रस काढून ताजा असतानाच प्यावा. फळे खाताना त्यावर काळे मीठ भुरभुरावे.
* शहाळ्याचे पाणी हेदेखील उन्हाळ्यातील उत्तम पेय.
* जेवणात किंवा इतर वेळीही ताजे व पातळ ताक चांगले. त्यात जिरेपूड, थोडा हिंग आणि मीठ घालावे. शिळे वा आंबट ताक मात्र टाळावे.
* धने, जिरे व बडिशेप समप्रमाणात रात्री पाण्यात भिजत घालावे, सकाळी ते पाण्यातच कुस्करून पाणी गाळून घ्यावे. या पाण्यात साखर, मीठ घालून त्याचे सरबत प्यावे.
या सर्व पेयांनी शरीरातील पाण्याची पातळी भरून निघते. घामावाटे निघून जाणाऱ्या क्षारांची परिपूर्ती होते आणि शरीरात थंडावा निर्माण होतो. लघवी साफ होऊन जळजळ कमी होण्यासही ही पेये मदत करतात. अनेकांना उष्णतेमुळे कडकीचा त्रास होतो, शौचाला कडक होते. अशा व्यक्तींनी घरगुती पेयांमध्ये सब्जाचे बी घालून घ्यावे.
रोजचा आहार
उन्हाळ्यात पचनशक्ती कमकुवत झालेली असते. त्यामुळे पचनाला हलके असणारे पदार्थ या दिवसांत चांगले. पदार्थ बनवताना त्यांना पाचक गोष्टींची जोड द्यावी. उकाडा होत असताना चटपटीत खावेसे वाटते, पण त्यात तळकट पदार्थ शक्यतो टाळावेत. भुकेपेक्षा दोन घास कमी जेवलेले चांगले.
* डाळी, उसळी या पचायला मुळातच जड असतात. तेव्हा डाळी आणि उसळी शिजवताना त्यात आले किसून वा ठेचून घालावे. नेहमी घालतो त्यापेक्षा थोडी जास्त हळद व हिंग घालावा. शिवाय नंतर वरून दालचिनीची पूड घालावी.
* डाळींपासून पुरणपोळी, शिरा, हलवा असे गोड पदार्थ करताना त्यात जायफळ, वेलची पूड व थोडी सुंठ जरूर घालावी.
* जड जेवणानंतर ओवा-बडिशेप व काळे मीठ गरम पाण्याबरोबर घ्यावे.
* जेवणात पराठय़ांऐवजी शक्यतो फुलके आणि ज्वारीच्या भाकरीला प्राधान्य द्यावे.
* उन्हाळ्यातच मिळणारा आंबा जरूर खावा, परंतु आमरसात मिरपूड व साजूक तूप घालून घ्यावे.
* चटपटीत चाट पदार्थ या दिवसात फार खावेसे वाटतात. पण सारख्या तळलेल्या पुऱ्या खाणे बरोबर नाही. चाटचे पदार्थ पुऱ्यांऐवजी खाकरा वापरून करून पाहा. चांगली चव तर मिळतेच पण फार तळकटदेखील होत नाही.
* दुपारच्या वेळी काकडीला मीठ व चाट मसाला लावून खावे. लाह्य़ा खाव्यात.
* सकाळी उठल्यावर दुधी भोपळ्याचा रस (घरी काढलेला व ताजा) पाव कप प्यावा.

dr.sanjeevani@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 2:27 am

Web Title: summer diet 2
Next Stories
1 प्रकृ‘ती’ : गर्भाशयावरील गाठी
2 आयुर्मात्रा : ऋतू वसंत
3 साखर ताब्यात तर मधुमेहही आवाक्यात
Just Now!
X