लहान वयापासूनच आपल्यापैकी अनेकांना सूर्यनमस्कारांची ओळख होते. दहा योगासने एकदम करवून घेणाऱ्या या व्यायाम प्रकाराचे व्यायामासाठी अनेक फायदे आहेत. मात्र हे फायदे मिळण्यासाठी ते योग्य प्रकारे व नियमितपणे घालायला हवेत.

’ सूर्यनमस्कार जलदगतीने केल्यास तो एक चांगला व्यायाम ठरू शकतो. पण कमी गतीने सूर्यनमस्कार केल्याचेही फायदे आहेतच. प्रत्येक सूर्यनमस्कारात दहा योगासने आहेत. जेव्हा आपण दहा सूर्यनमस्कार घालतो तेव्हा शंभर योगासने पूर्ण केल्यासारखी असतात. सूर्यनमस्कारात प्राणायाम व दीर्घ श्वसनाच्या व्यायामाचाही भाग आहेच. त्यामुळे अचूक सूर्यनमस्कार घालता येत असतील तर प्राणायामचाही फायदा मिळतो.
’ उन्हात उभे राहून सूर्यनमस्कार घातले तर ‘ड’ जीवनसत्त्व शरीराला मिळते. हल्ली या जीवनसत्त्वाची कमतरता अनेकांना असते. दिवसभर वातानुकूलित गाडीतून फिरणे, वातानुकूलित कार्यालयात बसून काम करणे यात ‘ड’ जीवनसत्त्व मिळतच नाही. ते मिळवण्यासाठी सूर्यनमस्कारांची वेळ फायद्याची ठरते.
’ स्थूलपणा, हृदयविकार, मधुमेह व उच्च रक्तदाब या सर्व आजारांपासून बचाव करण्यासाठी सूर्यनमस्कारांचा व्यायाम मदत करतो.
’ हृदयविकार असलेले आणि अगदी अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया झालेले रुग्णदेखील डॉक्टरांच्या सल्ल्याने सूर्यनमस्कार सुरू करू शकतात. महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात हाडे ठिसूळ होणे, वजन वाढणे या समस्यांवरही त्यांचा फायदा होतो. लहान मुलांमधील स्थूलपणामध्येही डॉक्टरांच्या सल्ल्याने सूर्यनमस्कार घातल्यास मदत होते.
’ सूर्यनमस्कार व्यक्तीच्या ‘मेटॅबोलिक रेट’वर परिणाम करतात. व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स २५च्या आत असणे आवश्यक आहे व सूर्यनमस्काराने तो त्या पातळीत ठेवणे शक्य होऊ शकते.
’ शरीर लवचिक होणे, मेद कमी होणे, रोगप्रतिकारशक्ती वाढणे, दमश्वास वाढणे व भूक आटोक्यात येणे यासाठी सूर्यनमस्कार चांगले. अर्थात त्याचे फायदे ते नियमित केले तरच मिळू शकतात.
’ कोणताही आजार नसलेल्या व्यक्तीने रोज २५ ते ३० सूर्यनमस्कार घातले तर चांगले. हे सूर्यनमस्कार मिनिटाला दोन या वेगाने केवळ १५ मिनिटांत होऊ शकतात. अर्थात हे एकदम जमणार नाही. ज्यांना अजिबात सवय नाही त्यांनी केवळ २ ते ३ सूर्यनमस्कारांनी सुरुवात करावी व दर आठवडय़ाला एक सूर्यनमस्कार वाढवत न्यावा.
’ आजार असलेल्या व्यक्तींनी मात्र आधी त्या आजारासाठी वैद्यकीय उपचार घेऊन बरे वाटू लागल्यानंतर सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात करावी. गुढघे, पाठ, मान, कंबर, पोट यातले काहीही दुखत असेल तरी आधी वैद्यकीय उपचार, आहारासाठी मार्गदर्शन व बरे झाल्यानंतर सूर्यनमस्कार हीच पद्धत योग्य.
’ सूर्यनमस्कार हा योगासनांचा लोकप्रिय प्रकार असला आणि बऱ्याच जणांचा सूर्यनमस्कार आपले आपणच सुरू करण्याकडे कल असला तरी ते योग्य पद्धतीने घातले जाणे गरजेचे ठरते. ही योग्य पद्धत केवळ योगासनांची पुस्तके वाचून वा चित्रे पाहून समजते असे नाही. त्यामुळे तज्ज्ञ योगशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार शिकून घेणे चांगले. पुस्तक वाचून पोहणे जसे जमत नाही, तशी योगासनेही पुस्तके वाचून योग्य प्रकारे करता येतात असे नाही. त्यामुळे ती शिकून घ्यायला हवीत. सूर्यनमस्कार घातल्यावर हात-पाय-पाठ दुखत असेल तर सूर्यनमस्कार करताना काहीतरी चुकत असू शकते. त्यासाठीही ते आवश्यक.
’ टेकडीवर, बागेत, घरात, बाल्कनीत अशा कोणत्याही ठिकाणी एका मॅटवर सूर्यनमस्कार घालता येतात, त्यासाठी वेगळे कपडे खरेदी करावे लागत नाहीत, खर्च येत नाही हा आणखी एक फायदा. योगासने शक्यतो सकाळीच करावीत. पण ज्यांना सकाळी कामावर जायची वा इतर काही घाई असते त्यांनी संध्याकाळीही घातले तरी चालू शकते. जेवणानंतर सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी चार तासांचा वेळ जाऊ द्यावा. तर सूर्यनमस्कारांनंतर १५-२० मिनिटांनी जेवले तर चालू शकते.
’ योगासने व सूर्यनमस्कार करताना आहाराच्या नियोजनाकडेही लक्ष द्यायला हवे. सात्त्विक, पौष्टिक व संतुलित आहार चांगला. दिवसभरात पाणीही पुरेसे प्यायला हवे.
डॉ. नितीन उनकुले, योग थेरपिस्ट Nitin.Unkule@gmail.com

nashik 60 lakh machinery stolen marathi news
यंत्रसामग्री चोरीचा गुन्हा दाखल होण्यासाठी पाच वर्षे फरफट, दिंडोरी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तक्रारदाराचा संशय
MPSC interview
‘एमपीएससी’च्या मुलाखतीत गुण वाढवून देण्यासाठी ‘निनावी’ फोन, पडद्यामागे कोण…
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
arrest
रंग लावण्यासाठी अल्पवयीन मुलीला घरातून खेचून आणले; विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत आरोपीला अटक