05 July 2020

News Flash

स्वाइन फ्लू घाबरू नका, जागरूक व्हा!

स्वाइन फ्लू आजाराचा कर्ता ‘एच१ एन१ विषाणू’ आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये स्वाइन फ्लूचे भयप्रस्थ चांगलेच रुंदावले असल्याने साधा ताप जरी आला तरी लगेचच सगळ्या तपासण्या करण्याचा आग्रह रुग्ण करतात. स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव वाढला असला तरी योग्य काळजी आणि वेळेत उपचार घेतल्याने यातून नक्कीच बरे होता येते. त्यामुळे या आजारांबाबतचा गोंधळ वाढवून घेण्यापेक्षा याबाबत अधिक माहिती समजून घेऊ या..

स्वाइन फ्लू आजाराचा कर्ता ‘एच१ एन१ विषाणू’ आहे. मानवी फ्लूचे विषाणू आणि डुकरांमधील फ्लूचे विषाणू यांच्या जनुकीय अदलाबदलीतून या विषाणूची निर्मिती झाली, असे मानतात. २००९ मध्ये मेक्सिको देशात हा विषाणू प्रथम आढळून आला. इन्फ्लूएंझा कुळातील हा नवीनच विषाणू असल्याने जगभर त्याचा झपाटय़ाने प्रसार झाला आणि फ्लू आजाराची जगभर साथ पसरली.

फ्लू विषाणूंची बाधा झाल्यानंतर आपल्या शरीरात तयार होणारी प्रतिकारशक्ती ही काही महिनेच टिकते. त्यानंतर ती नाहीशी होते आणि आपण पुन्हा फ्लू आजाराने बाधित होऊ शकतो. २००९ च्या साथीतून निर्माण झालेली सामाजिक प्रतिकारशक्ती आता लोप पावत आहे. आपल्याकडे या आजाराची प्रतिबंधक लस उपलब्ध असूनही त्याविषयी जागरूकता कमी असल्याने लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू ठरावीक काळानंतर पुन्हा डोके वर काढतो.

स्वाइन फ्लूची लक्षणे

सर्वसामान्यत: स्वाइन फ्लू हा आजार किरकोळ सर्दी-खोकल्याचा आजार आहे. तीव्र ताप, कोरडा खोकला, नाकातून पाणी वाहणे, शिंका येणे, घशामध्ये खवखव होणे, थकवा आणि काही वेळेस जुलाब किंवा पोटदुखी अशी लक्षणे या आजारात दिसतात. सर्वसाधारणपणे चार ते पाच दिवसांत हा आजार बहुसंख्य लोकांमध्ये स्वत:हूनच बरा होतो. काहीच व्यक्तींमध्ये हा उग्र स्वरूप धारण करतो. गुंतागुंतीच्या आजारात मात्र काही विशिष्ट लक्षणे दिसतात. याला सूचक किंवा धोकादायक लक्षणे म्हणतात. यात छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, दम लागणे, अतितीव्र ताप, शुष्कता (डिहायड्रेशन), बेशुद्धावस्था ही लक्षणे दिसायला लागतात.

फ्लूची लक्षणे आढळल्यास काय करावे?

तीव्र ताप, खोकला व सर्दी असल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. शिंका व खोकल्यावाटे निघणाऱ्या घशातील स्रावाच्या फवाऱ्यातून याचे विषाणू पसरतात. त्यामुळे खोकताना/ शिंकताना रुमालाचा वापर करावा. रुमाल उपलब्ध नसल्यास बाहीजवळ तोंड लपवून शिंकावे. जेणेकरून विषाणू अधिक प्रमाणात पसरणार नाहीत. फ्लूची बाधा झालेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. काही वेळेस डेंग्यू, हिवपाप, विषमज्वर यांची लक्षणे आणि स्वाइन फ्लूची लक्षणे यांसारखी दिसू शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्ततपासणी करून आजाराचे अचूक निदान करावे. रुग्णांनी घरी आराम करणे, पथ्ये पाळणे, पोषक आहार घेणे, दगदग टाळणे, पुरेशी झोप घेणे उत्तम! घरातील व्यक्तीला फ्लूचे निदान झाल्यास नातेवाईकांनी घाबरून न जातात्या व्यक्तीची योग्य काळजी घ्यावी. तसेच घरातील अन्य व्यक्तीला फ्लूची लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार सुरू करावेत.

आजाराचे निदान व उपचार

फ्लूची लक्षणे असलेल्या रुग्णांचे लाक्षणिक निदान करून डॉक्टरांकडून त्वरित उपचार करणे रुग्णांच्या दृष्टीने हिताचे असते. या आजारावर ओसेलॅटमिविर म्हणजेच टॅमिफ्लू नावाचे औषध उपलब्ध असून ते सरकारी आणि खासगी तसेच महापालिका दवाखान्यात उपलब्ध आहे. गंभीर/ गुंतागुंतीच्या आजारांमध्ये रुग्ण दवाखान्यात दाखल असल्यास ‘एच१ एन१’ आणि आरटीपीसीआर नावाची घशातील द्रवाची तपासणी करून स्वाइन फ्लूचे निदान करता येते. वेळत निदान आणि उपचार केल्याने यातून पूर्णपणे बरे होता येते. गंभीर लक्षणे दिसू लागल्यानंतर मोठय़ा दवाखान्यांमध्ये नेऊन तात्काळ वैद्यकीय उपचार सुरू करणे गरजेचे आहे.

विशेष काळजी काय?

काही विशिष्ट रुग्णांना फ्लूची बाधा झाल्यास गुंतागुंत संभवते. पाच वर्षांहून कमी वयाची बालके, ६५ हून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती स्त्रिया, प्रतिकारशक्ती कमी असणारे रुग्ण, दम्याचे रोगी आणि दीर्घकाळाच्या आजारांनी ग्रस्त रुग्ण यांना स्वाइन फ्लू झाल्यास विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

लसीकरण

स्वाइन फ्लूवर गुणकारी लस उपलब्ध आहे. परंतु समाजात याबाबत अनभिज्ञता असल्याने याचा फार कमी प्रमाणात वापर केला जात नाही. सुमारे दहा टक्क्य़ांहून कमी नागरिक ही लस घेत असल्याचे निरीक्षण आहे. इंजेक्शनवाटे किंवा नाकात फवारा सोडून ही लस दिली जाते. फ्लूची लागण होण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींना ही लस महापालिकेच्या दवाखान्यात दिली जाते. फ्लूचा धोका टाळण्यासाठी खासगी किंवा सरकारी रुग्णालयातून ही लस घेणे महत्त्वाचे आहे. स्वाइन फ्लूच्या विषाणूंची रचना वारंवार बदलत असल्याने दरवर्षी लसीकरण करून घ्यावे. मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाल्यास समाजाची प्रतिकारशक्ती फ्लूची साथ आटोक्यात येण्यास मदत होईल. तेव्हा स्वाइन फ्लू या आजाराची भीती सोडा, जागरूक व्हा!    – डॉ. भारत पुरंदरे संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2018 2:14 am

Web Title: swine flu h1n1 flu virus
Next Stories
1 संगणकीय नेत्रविकार मोबाइल आणि संगणक
2 गतीचे गीत गाई!
3 रजोनिवृत्ती समस्या
Just Now!
X