21 February 2019

News Flash

पिंपळपान : तगर

जीर्ण ज्वरात जेव्हा वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांच्या प्रकोपामुळे शरीरात शिथिलता येते,

प्रतिनिधिक छायाचित्र

‘तगरं कटुकं तिक्तं कटुपाकं सरं लघु।

स्निग्धोष्ण तुवरं भूतपदापस्मारनाशनम्।

विषचक्षु: शिरोरोगरक्तदोषत्रयापहम्॥’

तगरगंठोडा या नावाने किळसवाणा, दुर्गंधीयुक्त, तपकिरी रंगाचे, सुमारे एक ते दीड इंच लांब व करंगळीएवढय़ा जाड, वेडय़ावाकडय़ा, खडबडीत, मुळय़ा मिळतात. याची झाडे काश्मीर आणि नेपाळात होतात. पिंडीतगर, नत, वक्र  (सं.), तगर (हिं), तगरमूळ (म.), मुष्कवाला (क.), सुगंधाला (पं.), असारून (फा.) तगरगंठोडा (गु) व वेलिरिआना वेलेचि अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या ‘तगरगंठोडय़ात’ एक उड्डनशील तेल, आम्लद्रव्य, राळ आणि गोडूस चवीचे पदार्थ असतात. तेलाला अत्यंत दुर्गंधीयुक्त घाण वास येतो..

तगरगंठोडा वायूहार, संकोचविकाप्रतिबंधक, रक्ताभिसरणास उत्तेजक, मज्जातंतूव्यूहास उत्तेजक, पौष्टिक, चेतनाकारक आणि बाहेरून लावल्यास वेदनास्थापन आणि व्रणरोपण आहे. तगराची झाडे समस्त हिमालय पर्वतरांगा, काश्मीर, गढवाल, कुमाऊं, नेपाळ आदी प्रदेशात पाच ते दहा तुटणारी, वेडीवाकडी आणि उग्रगंधाची असतात. बाजारात काही वेळा काळसर रंगाचे चंदनासारखे वजनदार लाकूड तगर म्हणून विकले जाते. याशिवाय तगर नावाचा पांढऱ्या फुलांचा एक छोटा वृक्ष बघावयास मिळतो. पण तसा तो खरा वृक्ष आहे.

मंदबुद्धी, काहीही काम न करण्याची इच्छा असलेल्या आणि घाबरट मंडळी अकारण डॉक्टरांकडे जाऊन आपले पाय झिजवतात. त्यांना प्रत्यक्षात रक्तदाबक्षय (लो ब्लडप्रेशर) असा त्रास असतो, हृदय कमजोर असते, हिंमत गमावलेली असते. अशा वेळेस काही जण विविध व्यसनांद्वारे खोटी ऊर्जा मिळविण्याचा प्रयत्न करतात. अशी खराब व्यसने करण्याऐवजी तगर पंचांगांचा फांट किंवा काढा घेतल्याबरोबर नाडीचा वेग वाढतो, शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. मेंदूला अधिक बळ मिळते. काही कारणाने शरीरास खूप पीडा होत असल्यास विशेषत: फ्रॅक्चर किंवा अस्थिभंगविकार, क्लेशदायक व्रण याकरिता तगरीच्या मुळांचा काढा घ्यावा. हट्टी आमवातात बाह्योपचारार्थ लेप आणि पोटात काढा घेतल्यास सांध्याचे दु:ख कमी होते. जीर्ण ज्वरात जेव्हा वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांच्या प्रकोपामुळे शरीरात शिथिलता येते, त्यावेळेस तगरपंचांगाचा काढा आणि सुंठ चूर्ण घ्यावे. मानसविकाराचा रोगी खूप बडबड करत असल्यास तसेच प्राणवहस्रोताचे खोकला, दमा अशा विकारांत तगरचूर्ण जरूर वापरावे.

हरी परशुराम औषधालयाच्या अश्वगंधापाक, सारस्वतारिष्ठ, एलादितेल या औषधांत तगर हे एक घटकद्रव्य आहे.

– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

First Published on January 9, 2018 4:26 am

Web Title: tagar flower for effective ayurvedic treatment