कशाबरोबर काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल बरीच चर्चा होते. बटाटेवडय़ाबरोबर पुदिन्याची चटणी का देतात, किंवा उपवासाच्या पदार्थाना जिऱ्याची फोडणी आवर्जून का घालतात याचा विचार केलाय का कधी?.. एकमेकांबरोबर खाण्यास योग्य असे पदार्थ आणि ‘विरुद्धान्न’ ही संकल्पना काय हे जाणून घेण्याबरोबर अशा काही पदार्थाची उदाहरणेही पाहूयात.

एक पदार्थ दुसऱ्या पदार्थाबरोबर खाल्ल्यानंतर जर त्या पदार्थाचे गुणधर्म एकमेकांना पूरक ठरणार असतील तर ते जरूर बरोबरच खावेत असे म्हटले जाते. एका पदार्थाने आरोग्याला काही त्रास होणार असेल तर त्याबरोबर खाल्ल्या जाणाऱ्या दुसऱ्या पदार्थाने त्या त्रासाला प्रतिबंधही करता येतो. याच्या उलट दोन पदार्थ बरोबर खाल्ल्यामुळे जर त्रास होण्याची शक्यता असेल तर त्याला ‘विरुद्धान्न’ म्हणतात.

नेहमी एकमेकांबरोबर खाल्ले जाणारे पदार्थ –
’ उपवासाची साबुदाण्याची खिचडी, साबुदाणावडा, वऱ्याचे तांदूळ या सगळ्याबरोबर कोकमाची आमटी किंवा सोलकढी जरूर करावी. उपवासाचे पदार्थ म्हटले की दाण्याचे कूट आलेच. दाणे पित्तकर व कोकम पित्तशामक आहे. त्यामुळे दाण्यांना कोकमाची जोड द्यावी. उपवासाच्या पदार्थामध्ये फोडणीत जिरे वापरतात. हे सर्व पदार्थ जड असल्यामुळे जिरे केवळ नावापुरते न घालता पुरेशा प्रमाणात घालावे. त्यामुळे अन्न लवकर पुढे सरकण्यास फायदा होतो.
’ भजी, बटाटेवडे, उडीदवडा-सांबार अशा डाळींपासून बनणाऱ्या पदार्थाबरोबर पुदिन्याची चटणी ‘मस्ट’. डाळी पोटात वायू निर्माण करणाऱ्या करतात आणि पुदिन्यामुळे तो वायू बाहेर टाकण्यास मदत होते.
’ मसालेभात किंवा खूप मसालेदार भाज्यांबरोबर ताजे ताक वा दहीभात जरूर खावा. पोटात जळजळ होणे त्यामुळे टाळता येते.
’ पुरणपोळी आणि कटाची आमटी खातात. पुरणपोळी चण्याच्या डाळीची, शिवाय गोड. चण्याच्या डाळीने काही जणांना पित्त होते, पोटात वायू धरतो, जडत्व येते. त्यात साखरही भरपूर असल्यामुळे कफ वाढून सुस्ती येऊ शकते. कटाच्या आमटीत मात्र मसाले भरपूर घातले जातात. तमालपत्र, काळे मिरे, दालचिनी या सर्व मसाल्यांमुळे पुरणपोळी पचायला सोपी होते.
’ गोड आणि पचायला जड पदार्थाबरोबर गरम पाणी पिणेही फायदेशीर.
विरुद्धान्न्ो
’ दूध आणि मासे एकत्र खाऊ नयेत. दूध आणि मीठ हेही विरुद्धान्न. अनेक जण दूधभात खाताना भातावर मीठ घालतात. पण ते टाळावे. या गोष्टींमुळे त्वचेवर अ‍ॅलर्जीचे चट्टे उठू शकतात, अंगावर खाज येऊ शकते.
’ दुधाबरोबर संत्री, मोसंबी, अननसासारखी आंबटसर फळे नकोत. ही पळे दह्य़ात घालूनही टाळावीत. अनेकदा सर्व फळे घालून दुधातील फ्रुटसॅलड, शिकरण किंवा दही घालून फळांचे रायते केले जाते. या दोन्ही प्रकारचे पदार्थ खाल्ल्यावर अनेकांना जेवणानंतर पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
’ आइस्क्रीमबरोबरही फळे टाळावीत. आंबा, द्राक्षे, संत्री ताजी आइस्क्रीमवर टाकून दिले जाते. पण ही फळे प्रत्येक वेळी पूर्ण गोड असतील असे नाही. त्यानेही काहींना लगेच अंगावर खाज येते.
’ चीझ आणि टोमॅटो किंवा टोमॅटो सॉस हे अनेक पदार्थात एकत्रितपणे वापरतात. पिझ्झ्यावर अनेकांचे हे आवडते ‘टॉपिंग’ असते. पण चीझ दुधापासून बनवलेले असते तर टोमॅटो आम्लधर्मी गुणधर्माचा असतो. हे एकत्र खाल्ल्यामुळे काही जणांना पोट दुखण्याचा त्रास होऊ शकतो.
’ मध आणि साजूक तूप एकत्रितपणे पोळी वा ब्रेडला लावून चांगले लागत असले तरी त्याचे समप्रमाण घेऊ नये. त्यातील एक पदार्थ कमी व दुसरा जास्त घ्यावा. समप्रमाणात तूप व मध खाल्ल्यास मळमळ, उलटय़ा-जुलाब, अंगावर पुरळ येणे, तापाची कणकण येणे, डोके दुखणे असा त्रास काही जणांना होऊ शकतो.
डॉ. संजीवनी राजवाडे dr.sanjeevani@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)