|| डॉ. अद्वैत पाध्ये

अल्बर्ट एलिस हे सदसद्विवेक वर्तनोपचार पद्धतीचे प्रणेते, खऱ्या अर्थाने ती जगले होते. ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडे पाषाण’सारखा तो प्रकार खचितच नव्हता. स्वानुभवातून निर्माण झालेली आणि नंतर संशोधनाअंती तयार केलेली, वापरलेली ही पद्धती होती. गेल्या लेखातील डॉ. अंजली जोशी लिखित त्यांच्या चरित्रातील उदाहरणावरून ते आपण पाहिले आहेच.

Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान

बरेचदा जेव्हा आपण निराश होतो किंवा खूप क्रोधित होतो तेव्हा त्या विरूप भावना निर्माण होण्यासाठी आपण त्या वेळी घडलेल्या घटनेला जबाबदार धरतो. एखादा मुलगा परीक्षेत नापास झाला आणि खूप निराश झाला तर आपण घटनेचा प्रत्यक्ष संबंध त्याच्या नैराश्याशी जोडतो. पण तसं नसतं. परीक्षेत दहा मुले नापास झाली तरी सर्वच निराश होत नाहीत. कुरूक्षेत्राच्या युद्धात समोर आपलेच चुलत भाऊ, गुरू, पितामह आहेत, हे सर्व पाचही पांडवांना माहिती होते, पण एकटा अर्जुनच का गर्भगळीत झाला? त्याचा त्या घटनेकडे बघण्याचा अविवेकी दृष्टिकोन त्याला गर्भगळीत करत होता. मला लढायचं आहे, जिंकायचं आहे पण माझ्या आप्तांना हरवून, मारून अजिबात नाही. ते सगळे कायम माझ्याबरोबर असलेच पाहिजेत, असा त्याचा अट्टहास होता. मग श्रीकृष्ण अठरा अध्यायातून (अठरा समुपदेशनाची सेशन्स!) त्याला, युद्ध म्हटले की कोणी तरी विरोधात असणार. जो विरोधात असेल त्याच्याशी योद्धय़ासारखं लढण्याचं कर्म करणं आपल्या हातात आहे आणि युद्ध ही विकासाची संधीच असते- हा विवेकी विचार पटवून देतात व तो युद्धाला तयार होतो.

एलिस काय किंवा अर्जुन काय दोघांनीही – माझं काहीतरी चुकतंय, मला ते बदलायला पाहिजे याचा स्वीकार केला. परिस्थितीला, घटनेला व तिसऱ्यांना दोष देऊन बरेच जण स्वत:ची जबाबदारी घेत नाहीत. या एक प्रकारच्या ‘नाकारण्या’मुळे वरवर बरे वाटते, पण खरी समस्या तशीच राहाते. स्वीकाराची पायरी खूप महत्त्वाची असते. तरच आपण दुसऱ्यांची मदत घ्यायला तयार होतो. आप्त, मित्र वा तज्ज्ञ व्यक्तींशी बोलण्याने आणि त्यांचा सल्ला घेण्याने समस्येची उकल होण्याच्या पहिल्या टप्प्यावर आपण पोहोचतो. पण स्वीकार करताना, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत काही दोष असू शकतात ज्यामुळे आपल्याला त्रास झाला हे भान असणे आवश्यक असते. तरच पुढच्या पायरीवर जाता येते.

पुढची पायरी असते ती म्हणजे आपले अविवेकी विचार ओळखणे. त्यासाठी जेव्हा आपल्या मनात अशी निराशेची किंवा क्रोधाची विरूप भावना येते, तेव्हा आपण नक्की काय विचार करत होतो याचा मागोवा घेणे. तो मागोवा घेतल्यावर, अविवेकी विचार कोणते आहेत ते कळू शकते किंवा तज्ज्ञ आपल्याला सांगू शकतात. बऱ्याचदा आपणच आपल्याशी असा संवाद करत असतो. तो जाणीवपूर्वक तटस्थपणे शोधून काढणे ही खूप महत्त्वाची पायरी आहे. अर्थात समुपदेशकांच्या मदतीने हे सुलभ होऊ शकते.

त्यानंतरची महत्त्वाची पायरी आणि अवघड पायरी असते त्या अविवेकी विचारांना बदलून विवेकी विचार करण्याची सवय लावणे. घटनेचा परिणामाशी संबंध लावण्याची आपली सवय मोडणे, विचारांचे आत्मभान ठेवणे, ते जर अविवेकी असतील तर तिथे विवेकी विचार करणे अशी जागृत, आत्मपरीक्षणाची सवय अंगी बाणवणे आणि वर्तनात फरक आणणे! निश्चयपूर्वक जर आपण सातत्याने प्रयत्न केले तर अशक्य नक्कीच नाही. त्याच्या जोडीला वर्तनोपचाराच्या विविध पद्धतींची जोड द्यावी लागते. वर्षांनुवर्षे अंगी बाणवलेल्या विचारपद्धतीला वेगळे वळण देताना मन शांत राहणे महत्त्वाचे असते आणि म्हणून हायपोथॅलॅमिक उपाय म्हणून स्नायू शिथिलीकरणाचे व्यायाम, एक्सपोझर व रिस्पॅरन्स प्रिव्हेंशन यांसारख्या उपायांची जोड दिली तर विचार आणि वर्तनाला मुरड घालण्याचे प्रशिक्षण आपोआप मिळत जाते.

एक लक्षात ठेवले पाहिजे की स्वभावातून असलेली विचारपद्धती पूर्ण बदलणे शक्य नसते (हा पण विवेकी विचार व भान!). त्यामुळे एखाद्या तणावदायी घटनेनंतर आपसूक मूळ पद्धतीप्रमाणे पहिला विचार/ अविवेकी विचार केला जाऊन विरूप भावना निर्माण होऊ  शकतात. पण मग लगेच आत्मभान आणून विचारांना वळवता येणे/ वळवणे हेच या विवेकी भानात अपेक्षित आहे. अविवेकी विचार ‘विलय’ पावून वाहवत जाण्याऐवजी ‘विलग’पणे, तटस्थपणे अविवेकी विचारांना तपासून, ओळखून, ते बदलून रुळावरून घसरलेली गाडी पुन्हा अनुरूप भावनांच्या रुळांवर आणता आली, म्हणजे आपोआप आनंदाच्या डोहात आपण तरंगू शकतो. पण तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे ‘तुका म्हणे मना।  पाहिजे अंकुश।। नित्य नवा दिस। जागृतीचा।’ हे जमणे आवश्यक आहे. थोडक्यात, सारांश सांगायचा तर असा

संवाद हा मनाचा। मनाशीच चाले।।

जागलेपणी करावे। मनन विवेकाचे।।

अविवेक मना बिलगे। तपासीन मी त्याला।।

लढाई अविचारांशी।। करावी लागेल मजला।।

विलय होणे सोपे। विलग होणे कठीण।।

माझे मला जमाया।। दे शक्ती देवराया।।

 

Adwaitpadhye1972@gmail.com