कचरा हा सामाजिक बदलांचे प्रतीक आहे. शहरात वाढत जाणारा कचरा व कचरा टाकण्यासाठी अपुरी पडणारी जागा ही समस्या गेले दशकभर धगधगत आहे. शहरातील लोकांना कचरा करायचा असला तरी तो त्यांना त्यांच्या आजूबाजूला नको असतो. शहराच्या सीमेलगत राहणाऱ्यांनी दीड कोटी जनतेच्या कचऱ्याची दरुगधी का सहन करावी हादेखील प्रश्नच आहे. मात्र तरीही त्यावर काही उत्तर काढण्यासाठी फारसा पुढाकार घेतला जात नाही, हेदेखील वास्तव आहे.
एकीकडे कचऱ्याचा आकार वाढत जात असतानाच त्यातील घटकांमुळेही नवीन समस्या निर्माण होत आहे किंवा या समस्यांची नव्याने जाणीव होत आहे. प्लास्टिकचा कचरा हा त्यापैकीच एक. मुंबईत किंवा अगदी लहान शहरांमध्येही येणाऱ्या पुरांमध्ये प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांचा प्रचंड मोठा हातभार असतो. एकूण कचऱ्याच्या तुलनेत प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण अवघे दीड टक्का असते. मात्र हे प्लास्टिक मोठमोठी गटारे तुंबवते. शिवाय प्लास्टिक जाळल्याने होणारे प्रदूषण हा आणखी एक प्रकार. त्यामुळे अगदी दोन- चार वर्षांपूर्वीपर्यंत प्लास्टिकच्या कचऱ्याबाबत अनेकदा चर्वितचर्वण करून झाले आहे.
आता या प्लास्टिकची जागा घेतलीय ती ई-कचऱ्याने. ई-कचरा हा काही फारसा नवीन प्रकार नाही. घरगुती इलेक्ट्रॉनिकच्या वापरात नसलेल्या वस्तू-पंखा, वॉशिंग मशीन, वायर, शीतकपाट यांचा इलेक्ट्रॉनिक कचऱ्यात समावेश होतो. मात्र दशकभरापूर्वी सुरू झालेल्या मोबाइल व संगणक क्रांतीमुळे ई-कचऱ्याचा राक्षस वाढला आहे. दरवर्षी नवीन मॉडेल घेऊन जुन्या मोबाइलला कचऱ्याचा डबा दाखवणाऱ्या या पिढीमुळे हा कचरा एकदम चर्चेत आला. किंबहुना सर्वात वेगाने वाढणाऱ्या कचऱ्याच्या घटकांमध्ये ई-कचऱ्याचा क्रमांक सर्वात वरचा आहे.
भारतात दरवर्षी तब्बल ३० लाख टन ई-कचरा गोळा केला जातो. त्यात अर्थातच शहरांचा वाटा ६० टक्कय़ांहूनही अधिक आहे व शहरांमध्ये पहिला क्रमांक लागतो तो मुंबईचा. त्यापाठोपाठ दिल्ली व बंगलोर आहेत. राज्यातही महाराष्ट्र व त्यानंतर तामिळनाडूमधून ई-कचरा सर्वात जास्त निर्मिला जातो. तेलंगणा, उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश आणि पंजाबमधूनही ई-कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. एकूण कचऱ्याच्या तुलनेत सध्या ई-कचऱ्याचा वाटा दहा टक्के आहे. दरवर्षी ई-कचऱ्याच्या प्रमाणात तीन ते चार टक्के वाढ होत आहे. मोबाइल तसेच संगणक हा ई-कचऱ्यातील प्रमुख भाग असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे या ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीचे तंत्रच फारसे प्रगत नाही. आपल्याकडे ई-कचऱ्याच्या समस्येने उग्र रूप घेतल्यावर त्याबाबत नियमावली आली ती २०११ मध्ये. २०१२ मध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली. मात्र अजूनही अनेक शहरात ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत योग्य यंत्रणा नाही. देशात सर्वाधिक प्रमाणावर ई-कचरा टाकणाऱ्या मुंबईत आता कुठे ई-कचऱ्यासाठी एक केंद्र सुरू झाले आहे. विलेपार्ले येथील हे केंद्र सार्वजनिक-खासगी भागीदारीतून सुरू करण्यात आले आहे. ई-कचरा गोळा करण्यासाठी खासगी कंपन्या पुढे येण्यास उत्सुक आहेत. कारण ६० टक्के इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचा पुनर्वापर शक्य असतो. मात्र तरीही कोणत्याही संकलन केंद्रांच्या अनुपलब्धतेमुळे लाखो टन कचरा इतर कचऱ्यासोबत कचराभूमीवर (डम्पिंग ग्राऊंड) जातो.
इलेक्ट्रॉनिक उपकरणात वापरली जाणारी रसायने ही शरीरासाठी अत्यंत त्रासदायक असतात. त्यातच काही वेळा हा कचरा गोळा करणारे रद्दी व्यावसायिक त्यातून धातू मिळवण्यासाठी ही यंत्रे वितळवतात. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील प्रदूषकांचे प्रमाणही कित्येक पटीने वाढते. आधीच अशुद्ध हवेत जगत असलेल्या महानगरातील नागरिक या आणखी एका त्रासाला सामोरे जातात. अर्थात तरीही ई-कचऱ्याविषयी अजूनही म्हणावी तशी जागृती झालेली नाही. मुळात कचरा ही आपली जबाबदारी आहे हेच लोकांच्या पचनी पडत नाही. त्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीत पुढाकार घ्यायला किती जण सरसावणार ही शंकाच आहे.
प्राजक्ता कासले prajakta.kasale@indianexpress.com

Mom Finds Three Month Old Baby Rarest Cancer In Eyes By Mobile Flash Light What Are Signs Of Cancer Seen In Eyes Be Alert
मोबाईलचा फ्लॅश वापरून आईने बाळाला झालेला कॅन्सर ओळखला, काय होती लक्षणं, तुम्हीही काय काळजी घ्यावी?
indias first hydrogen powered ferry
विश्लेषण : पंतप्रधान मोदींकडून हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या देशातील पहिल्या बोटीचे उदघाटन, काय आहेत वैशिष्ट्ये? जाणून घ्या…
Maha Metro, Nagpur, decrease, Metro fare, 33 percent, March 1 2024,
नागपूरकरांसाठी गुड न्यूज, मेट्रोचा प्रवास होणार स्वस्त
quarantine ship in mauritus
मॉरिशसमध्ये अख्खे जहाजच केले क्वारंटाईन; ३,००० हून अधिक लोक अडकले समुद्रात; नेमके प्रकरण काय?