सर्दी, नाक गळणे थांबले की सुरू होतो खोकला! घसा दुखणे, खवखवणे, गिळताना त्रास होणे, कोरडा खोकला किंवा सतत ढास लागणे, खूप वेळ खोकून थोडासा कफ पडणे या सगळय़ा तक्रारी सुरू होतात.
घशाच्या सर्व तक्रारींसाठी एक ग्लास गरम पाण्यात पाव चमचा हळद आणि पाव चमचा मीठ मिसळून त्याच्या दिवसातून तीन वेळा गुळण्या करणे. आवाज बसला असेल तर हळद-मिठाबरोबर ज्येष्ठमध पावडर किंवा नुसत्या ज्येष्ठमधाच्या गुळण्या करणे. सतत ढास लागत असेल तर ज्येष्ठमधाच्या कांडय़ा चावून त्या तोंडात ठेवून चघळणे किंवा हळद व गुळाच्या छोटय़ा छोटय़ा गोळय़ा करून त्या चघळणे. लवंगेचा तुकडा व खडीसाखर चघळावी किंवा एकतारी साखरेचा पाक (पाव वाटी) करून त्यात एक बेहडा उगाळून मिश्रण करून तो पुन्हा उकळवून ठेवणे आणि तो एकेक चमचा दिवसातून तीन ते चार वेळा सावकाश चाटवणे. थंडी जाईपर्यंत रोजच्या चहात आले टाकावे किंवा आल्याची वडी खाऊन वर गरम चहा प्यावा.