आता परीक्षांचे दिवस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. परीक्षा देणाऱ्या पाल्याला कोणताही पदार्थ पटकन पचेल असाच करून द्यावा. त्यात हिरव्या मुगाचा लाडू, तांदळाचा लाडू, नारळाची वेलची-अक्रोडयुक्त वडी, खजूर-राजगिरा वडी (विशेषत मुलींसाठी), स्थूल आणि जास्त भूक लागणाऱ्या मुलांसाठी साळीच्या लाह्य़ांचा लाडू, चिवडा दिल्यास त्यांच्या तोंडास चव येते. मुलांनी मका खाण्यापेक्षा मक्याच्या भाजलेल्या लाह्य़ा काही प्रमाणात सेवन करायला हरकत नाही. तळलेले पदार्थ घरगुती असले तरी टाळलेले बरे. कुरमुरे, शेंगदाणे टाळावेत. मुलांनी शक्यतो दिवसभर उकळून गार केलेले पाणी जमल्यास चांदीच्या पात्रातून सेवन करावे. बुद्धिवर्धन होते. डाळिंबांचे दाणे, मोसंबी, अल्प प्रमाणात द्राक्ष, अंजीर ही फळे स्मृती वाढवतात. मैद्याची बिस्किटे पोट फुगवून ढेकर निर्माण करत असल्याने टाळावी. मुलांनी दिवसभरात एखाद्या वेळी अक्रोड खाण्यास हरकत नाही.

परीक्षार्थीसाठी पथ्य

दही, दह्य़ाचे पदार्थ परीक्षार्थीना शक्यतो देऊ नयेत. खरे तर महाराष्ट्रात लोणी-साखर, दुधाची साय आणि साखर देण्याची प्रथा आहे. उत्तम अग्नी असल्यास दही-साखर पचते, अन्यथा कफवृद्धी होते. आले, कोथिंबीर टाकलेले ताक लोण्यासह द्यावे. अगदी उष्णता असल्यास त्यात कोकम सरबत टाकून द्यावे. ज्या मुलांना उन्हाचा त्रास होतो, त्यांनी दोन्ही नाकपुडय़ात आतल्या बाजूने तूप लावावे. रात्री झोपताना दोन्ही नाकपुडय़ांमध्ये गाईचे चांदीच्या पात्रातील तूप सोडावे. इंद्रियांना बल प्राप्त होते. डोळ्यांचे बल वाढते हे शास्त्रसिद्ध सत्य आहे. परीक्षार्थीनी डोक्याला नारळाचे तेल नियमित लावावे. जमल्यास ब्राह्मी, माका यांनी सिद्ध केलेले तेल लावल्यास खूप फायदा होतो. सलाडमध्ये पत्ता कोबी, बीट, गाजर, ब्रोकोली, उकडलेले मटार, उकडलेला मुळा, मिरेपूड टाकून सेवन करावे. कोणतेही फ्रूट सलाड सेवन करू नये. रायत्याचा वापरही टाळलेला बरा. पित्त वाढून अपचन होण्याची शक्यता असते.