पावसाळा आला की श्रावणमासी हर्षमानसी या बालकवींच्या ओळी आठवतात. पण या चोहीकडे दाटणाऱ्या हिरवळीचं कौतुक जास्त दिवस टिकत नाही. कारण मेघाच्छादित आकाश, पावसाळ्यामुळे गढूळ झालेलं पाणी, उन्हाच्या कहराने जमिनीतून निघणारे बाष्प, सगळीकडे खड्डे आणि त्यात चिखल या सर्वाच्या एकत्रित परिणामामुळे रोगराईला सुरुवात होते. त्यामुळे पावसाळा आल्यानंतर आरोग्य सांभाळण्यासाठी विशेष तयारी करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात शरीराच्या वात दोषाचा प्रकोप होतो आणि पुढे शरद ऋतूत वाढणाऱ्या पित्त दोषाचा शरीरात संचय होऊ लागतो. या दोन्ही दोषांमुळे शरीराची पचनशक्ती खूप कमी होते, त्यामुळे पावसाळ्यात प्रामुख्याने पचनाचे विकार होतात. याशिवाय सर्दी, खोकला, ताप, जुलाब, उलटय़ा, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी आणि सर्रास आढळून येणारे डोळे येणे, डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिस, मलेरिया यांसारखे विकार होतात. यातले बरेचसे विकार हे या ऋतूतील बदलामुळे होत असले तरी या विकारांच्या मुळाशी आपले खाणे, पिणे, वागणे हेच कारणीभूत असते. या काळात हवेतला दमटपणा वाढल्यामुळे त्वचेचे विकारही (फंगल इन्फेक्शन)- त्वचेवर खाज, फोड येणे, चट्टे उठणे, पुरळ येणे, पित्ताच्या व्रण येणे खूप प्रमाणात आढळतात.

प्रत्येक ऋतूत, हवामानाशी जुळवून घेण्यासाठी ऋतूचर्या असते, पण आज शहरातच नव्हे तर खेडय़ांमधल्या लोकांचीही जीवनशैली खूप बदलली आहे. दिवसा झोप, रात्रीची जागरणे, मिळेल ते-वेळ मिळेल तेव्हा केवळ जिभेला चविष्ट लागतं म्हणून, पचनशक्तीचा विचार न करता खाणं, पुरेशी विश्रांती न घेणं, व्यायामाचा अभाव, अतिश्रम हेच पाहायला मिळत आहे, तरीही पावसाळ्यात काही नियम आणि सहज करता येणाऱ्या गोष्टी आपल्यासमोर ठेवत आहे. जेवढय़ा जमतील तेवढय़ा अवश्य करून पाहाव्यात.

पावसाळ्यात वात व पित्त वाढू नये असा आहार घ्यावा. पण चातुर्मास नेमका पावसाळ्यात येतो आणि सण व उपासाच्या नावाखाली साबुदाणा, शेंगदाणा, बटाटा, ओला नारळ, सूरण, रताळं, दही यांचे भरपूर सेवन केले जाते. जोडीला पूरणपोळी, मोदकासारखी पक्वान्नं आणि उपास सोडायच्या दुसऱ्या दिवशी खीर, पूरण, शिरा यांसारख्या जडान्नाचेही सेवन केले जाते. पावसाचा आनंद लुटण्यासाठी गरमागरम भजी, वडे, समोसे, पाणीपुरी यांचीही साथ असतेच. मांसाहारी लोक आठवडय़ातून तीन ते चार वेळा तळलेले मासे किंवा चिकन खातात. ऋतूमुळे आधीच पचनशक्ती मंद झालेली असते, वात खूप वाढलेला असतो, पित्तदोष साठायला लागलेला असतो, त्यात ताळतंत्र सोडून वर सांगितल्याप्रमाणे खाणे पिणे सुरू ठेवले तर अपचन आणि अजीर्णामुळे पोटदुखी, जुलाब, आव पडणे, उलटय़ा, अ‍ॅसिडिटीसारखे अनेक विकार होतात. यासाठी या ऋतूत पचायला हलका आहार घ्यावा. या ऋतूत येणारे उपास हे पोट हलके राहण्यासाठी सांगितले आहेत. पावसाळ्यात जुने धान्य वापरावे. गहू-तांदूळ भाजून मग वापरावेत म्हणजे पचायला हलके होतात. स्निग्ध पदार्थाचा वापर जास्त ठेवावा. याचं उत्तम उदाहरण म्हणजे गाईचं तूप. ते रोजच्या जेवणात ठेवावे.

पावसाळ्यात आणखी त्रास देणारा आजार म्हणजे सर्दी, खोकला आणि ताप. यासाठी रोजच्या चहात पाती चहा, आले याचा वापर करावा किंवा धने, जीरे, बडिशेप, काळं मिरी, दालचिनी, आले व पातीचहा पाण्यात उकळवून गाळून तो गरम गरम प्यावा. खोकला कफ जास्त असेल तर या काढय़ात ज्येष्ठमध, तुळशीची पाने टाकावीत. डोकं जड दुखत असेल तर आल्याचा तुकडा ठेचून तो चोथा कपाळावर चोळावा. घसा दुखत असेल, आवाज बसला असेल तर हळद घालून गरम दूध प्यावे. पाव चमचा हळद व पाव चमचा मीठ ग्लासभर गरम पाण्यात विरघळवून त्याच्या गुळण्या कराव्यात. दमेकऱ्यांनी खोबरेल तेलात सैंधव

घालून ते छातीला चोळावे आणि त्यावर गरम पाण्याने शेकवावे किंवा आल्याच्या रसात मध घालून वारंवार चाटण करून व गरम पाणी प्यावे किंवा आले घातलेला पण दूध न घालता कडकडीत कोरा चहा प्यावा.

पावसाळ्यात बऱ्याचदा अंगावर लहान मोठे, लालसर, खूप खाजणारे किंवा दाह होणारे असे शीतपित्त येते. आमसूल पाण्यात कुस्करून ते पाणी या पित्ताच्या व्रणाना चोळावे किंवा खोबरेल तेलात कापूर किंवा तूप पातळ करून त्यात मिरपूड घालून ते त्वचेवर चोळावे.

ओले कपडे दिवसभर अंगावर राहिल्याने त्वचेवरच्या घामामध्ये चिकटपणा वाढतो आणि त्यामुळे अनेक प्रकारचे त्वचारोग होतात. घराबाहेर पडल्यावर जातानाच भिजायला झाले तर कपडय़ाचा जोड बरोबर ठेवावा. संध्याकाळी घरी आल्यावरही स्वच्छ आंघोळ करावी. पावसाने ओले झालेले कपडे नुसते वाळवून न घालता ते धुऊन मगच वापरावेत.

आधी सर्दीने सुरू होणारा ताप वाढत जाणे, डोकं खूप दुखायला लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगावर गोवरासारखे लाल पुरळ येणे, सांधे दुखणे, आखडणे ही लक्षणे अजिबात अंगावर काढू नयेत. पावसात साचलेले पाणी, तुंबलेल्या गटारांचे पाणी, चिखलाचे पाणी यामध्ये बराच वेळ चालून यावे लागल्यास पावले, बोटे यांची विशेष काळजी घ्यावी.

हा पावसाळा निरोगी राहून त्याचा आनंद लुटायचा असेल तर आपल्या आहार, विहार आणि आचारणात योग्य ते बदल करावे लागतील.

सहलींवर नियंत्रण

पावसाळा आला की वर्षां सहलींचे पेव फुटते. आबालवृद्ध खाण्याचे सर्व नियम धाब्यावर बसवून मजा करून येतात आणि घरी आल्यावर दुसऱ्याच दिवशी दवाखान्यात रांग लावतात. दिवसभर पावसापाण्यात भिजून ओले कपडे अंगावरच सुखवायचे, धबधब्याखाली बसून दारू प्यायची, तळलेले पदार्थ, मांसाहार, थंड पेयांचा पोटावर अत्याचार करायचा, या सर्व गोष्टी भविष्यामध्ये शरीरात कायमचे वास्तव्य करणाऱ्या विकारांना निर्माण करायला कारणीभूत ठरतात.

हे करा!

*      फिल्टरमधून आलं असलं तरी पाणी किमान १० मिनिटे उकळवून मगच प्यावे. चहाच्या टपरी, उघडय़ावरची हॉटेल्स किंवा धाबे, पाणीपुरीच्या गाडय़ा येथील पाणी पिऊ नये.

*      दूध कोमटच आणि हळद व सुंठ घालून प्यावे.

*      ताकसुद्धा धने- जीरं- सैंधव घालून घ्यावे. रात्रीचे ताक घ्यायचे असल्यास ते गरम करून घ्यावे.

*      गव्हाचे फुलके, ज्वारी-बाजरीची भाकरी, फोडणी देऊन केलेली कडधान्यांची कढणे, मुगाचे वरण, मूग-मटकी, * चवळी, दूधी, कोबी, तोंडली, पडवळ, भेंडी, घेवडा, फरसबी, शेवग्याच्या शेंगा यांसारख्या भाज्या खाव्यात.  पालेभाज्या शक्यतो टाळाव्यात. भजी खावीशी वाटली तर मुगाचे पीठात ओवा घालून तयार करावीत. गरम वरणभातावर तूप अवश्य घ्यावे. पचनासाठी पुदिना, आले, लसूण, पांढरा कांदा यांचा वापर करावा.

*      पावसाळ्यात लोक सुकी मासळी खातात किंवा शीतगृहांमध्ये अनेक दिवस ठेवलेले मासे खाल्ले जातात. या दोन्हींचा पावसाळ्यात त्रासच होतो. चिकन-मटण पचवायला पचनशक्ती खूप चांगली लागते, त्यामुळे हे खाणेसुद्धा कमी प्रमाणात व स्वत:ची पचनशक्ती ओळखूनच खाल्ले पाहिजे.

आमवात

पावसाळ्यात आमवात नावाचा संधीरोग बळावतो. सांधे सुजणे, आखडणे, सर्व अंग ठणकणे, सतत तापाची कणकण, पायात गोळे येणे, बोटे वाकडी होणे असे त्रास होतात. या लोकांनी सुंठ उकळवून ते पाणी कोमट असतानाच आणि दिवसभर प्यावे. सर्व सांधे वारंवार शेकवावे. तेलाने सांधे रगडू नये, सुका शेक (वीट, वाळू, ओवा, मीठ यांचा) द्यावा. जेवणापूर्वी सुंठ -गूळ- तुपाची गोळी किंवा आले सैंधव खावे. याचा उपयोग सांध्यांप्रमाणेच पावसाळ्याच्या पचनाच्या तक्रारींसाठीही होतो.