सातवीत शिकत असलेल्या इराने कधी नव्हे ते एकटय़ाने शिबिराला जाण्याचा हट्ट केला. शिक्षिका बरोबर होत्या, पण आईसोबत असतानाही इराचा पाहुण्यांकडे मुक्काम टाळत असत. कारण तसे फार मोठे नव्हते, पण इराच्या आईच्या दृष्टीने बरोबर होते. मी जेव्हा या बाबतीत समुपदेशन करायचो तेव्हा इराच्या आईचा हिरमुसलेला चेहरा आणि उत्तर ठरलेले. ‘डॉक्टर ! अहो मी आई आहे म्हणून समजून घेते. तुम्हाला हिची रात्री अंथरुणात लघवी करण्याची समस्या माहीतच आहे.’ या वेळी इराच्या आईने बॉल माझ्या कोर्टात टाकला. ‘कसा हट्ट पुरवायचा हिचा. तीन महिने आहेत अजून. तुम्हीच काय ते ठरवा.’

तीन महिने आणि इराची अंथरूण ओले करण्याची समस्या. मुश्कील जरूर है! पर नामुमकीन नही! खरं तर अनेक मुलामुलींना ही समस्या असते, पण पाचव्या वर्षांपर्यंत सहसा याला उपचारांची गरज नसते. पण आता इराचे वय वाढले होते आणि आता मामला शिबिराचाही होताच की. पुस्तकातील व्याख्या म्हणते की, पाचव्या वर्षांनंतर आठवडय़ातून दोनदा असे सलग तीन महिने मूल अंथरूण ओले करत असेल तरच उपचार करावेत. आता ही वेळ मात्र इराच्या आईला व्याख्या समजून सांगण्याची नव्हती. पुस्तकाइतकाच रुग्ण आणि त्याची उपचारांची गरज, काळजी महत्त्वाची, हेही वैद्यकीय पुस्तकच सांगते.

सुरुवातीला एक साधी चाचणी करू व इराला लघवीचा जंतुसंसर्ग नसल्याची खात्री करून घेतली. मुलींमध्ये मूत्रमार्ग लहान असल्याने लघवीचा जंतुसंसर्ग जास्त प्रमाणात अढळतो. बऱ्याचदा अंथरूण ओले करणे हे लघवीच्या जंतुसंसर्गामुळे असते. इराची ही तपासणी नॉर्मल असल्याने हा प्रश्न निकाली निघाला. इराच्या आईचे लक्ष आता मी काय औषध लिहून देतो याकडे होते, पण मी पेन आणि कागद इराच्या आईकडे फिरवला आणि फर्मान सोडले, चला लिहा. तिच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य अधिक गहिरे होण्याआधीच मी सांगितले, अहो, यासाठी सुरुवातीला कुठलेच औषध द्यायचे नाही. सांगतो त्या सूचना लिहून घ्या.

इराला उद्यपासून संध्याकाळी सहानंतर कॉफी, चहा नाही. संध्याकाळी सहानंतर पाणी पिण्याचे प्रमाण आधीपेक्षा कमी. म्हणजे बंद नाही. रात्री झोपताना लघवी करायला गेलो की, बाथरूमच्या बाहेर आल्यावर परत लघवी करायला जायचे. इरा म्हणाली, अहो हे काय. मी तिला समजावून सांगितले. तू गंमत तर बघ. तुला परत तेवढीच लघवी होईल. याला डबल वॉईडिंग असे म्हणतात. आपण लघवी केल्यानंतरही काही लघवी मूत्राशयात साचून असते. यामुळे ती लघवी बाहेर पडते. आता मी तिला रोज रात्री एक संकल्प करायला सांगितले. आज रात्री मी अंथरूण कोरडे ठेवेन. संकल्प सकारात्मक आहे हे मुद्दामून इराच्या लक्षात आणून दिले. इराचे आई-वडील इरानंतर दोन-एक तासांनी झोपायचे. ते झोपण्याअगोदर इराला झोपेतून उठवून एकदा लघवी करायला लावायची. हे जरा अवघड वाटले, पण इराच्या आईने ठाम होकार दिला.

या उपचारांना स्टार टेक्निक असे म्हणतात. एक वेगळे कॅलेंडर घ्यायचे. ज्या रात्री इराने अंथरुणात लघवी केली नाही त्या दिवसांवर लाल स्केच पेनाने स्टारची खूण करायची आणि महिन्याअखेर स्टार मोजायचे. किती स्टार झाले तर काय बक्षीस मिळणार हा करार मात्र आई, बाबा आणि इराने आधीच करून ठेवायचा. या गोष्टी तीन महिने केल्या तरी इरा बरी होऊ  शकते हे ऐकून आईला हायसे वाटले. पण डॉक्टर औषधे? मी या प्रश्नाची वाटच पाहत होतो. मी मिश्कीलपणे समजावून सांगितले, अहो औषधे आहेत यासाठी! पण त्यांचा वापर ती सुरू असेपर्यंतच टिकतो. औषधे बंद केली की, पहिले पाढे पंचावन्न! आता सांगितलेल्या गोष्टी नीट केल्या की, सहसा औषधांची गरज पडत नाही.  दोघी बाहेर जाताना, मी आईला परत बोलावून घेतले. हे पाहा शेवटची सूचना! याबद्दल ईराशी मुळीच चर्चा करायची नाही. तिला रागवायचे नाही. तिला न सांगता, कुठलाही बाऊ  न करता चादर बदलायची. गेल्या आठवडय़ात इराच्या फेसबुक वॉलवर तिच्या शिबिरातील स्पर्धा जिंकल्याचे फोटो पहिले. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पहिले. धन्यवाद डॉक्टर, असे इराचे शुभेच्छापत्रही मिळाले.

amolaannadate@yahoo.co.in