17 February 2019

News Flash

वेदनादायी मूतखडा

पोटाचा आकार कमी करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे हे या आजारात महत्त्वाचे ठरते.

प्रतिनिधिक छायाचित्र

– डॉ. अनिरुद्ध ढोकरे, मूत्रपिंड विकारतज्ज्ञ.

पुरेसे पाणी न प्यायल्याने शरीरावर होत असलेल्या विविध परिणामांपैकी एक म्हणजे मूतखडय़ाचा आजार. काही वेळा आकाराने लहान असलेले खडे मूत्रविसर्जनावाटे बाहेर पडल्याचे लक्षातही येत नाही. मात्र त्यांचा आकार वाढला की मूत्रपिंडात किंवा मूत्रमार्गात अडकल्याने त्रास सुरू होतो.

मूतखडे कसे होतात?

रोजच्या चौरस आहारातील काही सत्त्वांचे विघटन न झाल्याने ते मूत्रपिंडात अडकून त्याचे रूपांतर खडय़ात होते. साधारणपणे अनेकांच्या मूत्रपिंडात कॅल्शियम ऑक्झालेटचे खडे तयार होत असले तरी कॅल्शियम फॉस्फेट, युरिक अ‍ॅसिड स्टोन, सिस्टाईन स्टोन असे स्टोनचे प्रकार आहेत. रोज पुरेसे (साधारण आठ ते दहा ग्लास) पाणी न प्यायल्याने बहुतेकांना मूतखडय़ांचा त्रास होत असल्याचे आढळून येते. कमी पाणी प्यायल्याने मूत्रातील युरीन आम्ल सौम्य होत नाही. आम्लाची तीव्रता वाढल्याने खडे तयार होण्याची प्रक्रिया सुरू होते. वजन वाढणे, मधुमेह, रक्तदाब वाढल्याने, मूत्रमार्ग संसर्ग यामुळे तसेच काही आनुवंशिक आजार असल्यासही मूतखडय़ांचा आजार होतो. कॅल्शिअम तसेच ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण अतिरिक्त झाल्यासही मूतखडे होऊ शकतात. काही वेळा हे खडे आकाराने लहान असल्याने मूत्रमार्गावाटे बाहेर पडतात आणि लक्षातही येत नाहीत. मात्र त्यांचा आकार वाढल्यावर मूत्रपिंडातून मूत्राशयाच्या दिशेने खाली सरकत असताना नळीत अडकला किंवा मूत्रपिंडामध्येच राहून मूत्रविसर्जन प्रक्रियेवर परिणाम होऊ  लागला की त्रास जाणवण्यास सुरुवात होते. कोणत्याही वयात हा आजार उद्भवू शकतो, मात्र ३० ते ५० या वयातील रुग्ण अधिक असतात. स्त्रियांपेक्षा पुरुषांना मूतखडय़ाचा त्रास अधिक होतो.

उपचार

किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर पहिल्या टप्प्यात औषधोपचाराने आणि आजार बळावल्यास अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पीसीएनएल (परक्युटन्स नेफ्रोलिथ्रोफी), यूआरएसएल (युरेट्रोस्कोपिक रिटारव्हायल ऑफ स्टोन ) आणि ओपन नेफ्रोलिथोटोमी या लहान शस्त्रक्रियेतून हे खडे काढले जातात. मूतखडय़ांचा त्रास वेळीच लक्षात न आल्यास मूत्राशय निकामी होऊन डायलिसीस आणि पुढील उपचारांना सामोरे जावे लागते.

हे करावे

*   दिवसातून भरपूर पाणी प्यावे. सतत पाणी पिण्यामुळे खडा विरघळून त्याचा आकार कमी होईल. आकार कमी झाल्यावर मूत्रमार्गावाटे खाली सरकत खडा बाहेर पडू शकतो.

*   वारंवार पोटदुखी होत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने सोनोग्राफी करून औषधोपचार घेणे गरजेचे आहे.

*   आहारात कॅल्शियम अ‍ॅक्झालेट स्टोन असणाऱ्यांना टोमॅटो, पालक, बीट, जंकफूड, शेंगदाणा, अक्रोड तर युरीक अ‍ॅसिड स्टोन असणाऱ्यांना मांसाहारी जेवण, मद्य, कडधान्य, काही डाळी टाळण्याचा उपाय सुचवला जातो.

*   पोटाचा आकार कमी करणे आणि वजन नियंत्रणात ठेवणे हे या आजारात महत्त्वाचे ठरते.

*   आनुवंशिक आजार तसेच ‘प्रायमरी हायपर ऑक्साल्यूर’ यात लहान मुलांमध्ये मूतखडय़ाचा त्रास होतो.

*   बहुतांश रुग्णांना संत्री, सफरचंद, पीच, केळी, लिंबू यांचे सरबत पिण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून शरीरात सायट्रेटची पातळी राखली गेली तर कॅल्शियम आणि अ‍ॅक्झालेट एकत्र येत नाहीत.

*    पुरेसे पाणी पिणे, वेळेवर मूत्रविर्सजन करणे, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणे, वजन कमी करणे या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास मूतखडय़ाची तक्रार उद्भवणार नाही.

लक्षणे – पोटात एकाच ठिकाणाहून अत्यंत तीव्र कळा येतात. उलटी झाल्याची भावना होते, लघवीमधून रक्त जाते ही मूतखडय़ाची सुरुवातीची लक्षणे आहेत. काही वेळा मूत्राचे प्रमाण कमी होणे, मूत्रविसर्जन करताना जळजळ होणे, सतत लघवीला होत असल्याची भावना होणे आणि संसर्ग असल्यास ताप येण्यासारखी काही लक्षणेही दिसून येतात. अशा स्थितीत रुग्णाने डॉक्टरांशी संपर्क साधत पोटाची सोनोग्राफी करत तातडीने त्यानुसार औषधोपचार सुरू करावेत.

First Published on July 3, 2018 3:37 am

Web Title: treatment urinary stone symptoms diagnosis prevention and causes