23 February 2019

News Flash

हृदयाजवळचा  स्टेंट

अर्थात स्टेंट लावण्याचा पर्याय निवडण्याआधीची स्थिती ही बहुधा आपत्कालीन असते.

हृदयाजवळचा  स्टेंट

आपल्या जवळच्या व्यक्तीच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली की मग अनेकदा अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, स्टेंट, बायपास.. असे शब्द कानावर पडू लागतात. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये अडथळा असल्यास डॉक्टरांकडून स्टेंट बसवून घेणे किंवा बायपास करण्याचा सल्ला दिला जातो. हे शब्द आधीही ऐकण्यात आले असले तरी त्याक्षणी त्यांनी नेमकी माहिती आणि त्यावरून उपायांच्या पर्यायाबाबत निर्णय घेताना अस्वस्थता येते. स्टेंट हा त्यापैकीच एक शब्द. गेल्या वर्षभरात किमती आणि त्यावरून वैद्यकीय क्षेत्रात उडालेला गोंधळ यामुळे स्टेंट हा शब्द वारंवार बातम्यांमधून येत राहिला. स्टेंट म्हणजे नेमके काय व त्याचा हृदयाशी नेमका काय संबंध हे लक्षात आले की उपचारपद्धतीबाबतचे अनेक समज-गैरसमज दूर होऊ  शकतात.

स्टेंट म्हणजे काय?

स्टेंट म्हणजे स्प्रिंगप्रमाणे प्रसरण पावणारी बारीक नळी. अनेकदा कोलेस्टेरॉल किंवा अन्य कारणांमुळे हृदयाकडील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे येतात. रक्तवाहिन्यांना आधार देत, रक्ताच्या वहनासाठी पोकळी ठेवण्याचे काम स्टेंट करतात. कॅथररच्या साहाय्याने रक्तवाहिन्यांच्या आतल्या बाजूने स्टेंट ठेवला की प्रसरण पावत तेथे नीट बसतो. हा स्टेंट साधारण २ ते ४ सेंटिमीटपर्यंत असतो. रक्तवाहिन्यांच्या गुठळ्यांच्या आकारानुसार किती सेंटिमीटरचा स्टेंट लावावा हे ठरवले जाते.

अर्थात स्टेंट लावण्याचा पर्याय निवडण्याआधीची स्थिती ही बहुधा आपत्कालीन असते. हृदयाला होत असलेला रक्तपुरवठय़ात अडथळे येत असल्याने रुग्ण आलेला असतो. मात्र कोणत्या रक्तवाहिन्यांमध्ये कुठे आणि किती अडथळा आहे, हे आधी तपासावे लागते. त्यासाठी अँजिओग्राफी केली जाते. त्याचप्रमाणे स्ट्रेस टेस्ट आणि एकोकार्डिओग्राफीमधून रक्तवाहिन्यांमधील गुठळ्यांचे कुठे, कसे परिणाम झाले आहेत, ते लक्षात येते, असे हृदयशल्यचिकित्सक डॉ. बिपिनचंद्र भामरे यांनी सांगितले.

हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये (करोनरी आर्टरिज) गाठी निर्माण झाल्या आहेत का, हे पाहण्यासाठी अँजिओग्राफीची विशिष्ट पद्धत आहे. आपल्या शरीरात हृदयापासून निघालेली महारोहिणी रक्तवाहिनी छातीपर्यंत आणि पुढे बेंबीजवळ येते. तिथे तिचे दोन भाग होऊन एक भाग उजव्या पायात व एक भाग डाव्या पायात गेलेला असतो. अँजिओग्राफीत यातील बहुतांश वेळा उजव्या मांडीच्या रक्तवाहिनीतून एक सूक्ष्म रबरी नळी हृदयाभोवतीच्या रक्तवाहिन्यांमध्ये ढकलली जाते. या नळीचे जे टोक बाहेरच्या बाजूला असते त्यातून

‘क्ष-किरण’ तपासणीसाठी औषध घातले जाते आणि त्याच वेळी वेगवेगळ्या कोनांनी अंतर्गत चित्रण घेतले जाते. ही तपासणी हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गुठळी आहे की नाही याचे निदान करते. नेमक्या कोणत्या रक्तवाहिनीत, कुठे आणि किती टक्के ‘अडथळा’ आहे, एकाहून अधिक रक्तवाहिन्यांत गुठळ्या आहेत का, याची माहिती या तपासणीत कळते. रक्तवाहिन्यांमध्ये ७० टक्क्यांहून जास्त गुठळ्या असतील तर स्टेंट लावण्याचा सल्ला दिला जातो, अशी माहिती डॉ. भामरे यांनी दिली.

रक्तवाहिन्यांचा आतल्या स्तराला या गुठळ्या चिकटलेल्या असतात. त्यामुळे या गुठळ्या बाजूला गुठळ्या बाजूला केल्यावर रक्तवाहिनीचा आतला स्तर कमकुवत होऊन त्या आकुंचन पावण्याचा धोका असतो. या रक्तवाहिन्यांना आधार देण्यासाठी आणि पुढील गुठळ्याचा धोका टाळण्यासाठी स्टेंट बसवला जातो. स्टेंट लावण्यापूर्वी झालेली गुठळी कशा प्रकारची आहे. याची तपासणी केली जाते. जर या गुठळीत जास्तीत जास्त कॅल्शिअमचे प्रमाण असेल तर अशा अडथळ्यासाठी स्टेंट लावला जात नाही. कॅल्शिअममुळे आजूबाजूची जागा टणक झालेली असले आणि अशा गुठळीत स्टेंट घातला तर स्टेंटही कडक होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांना बायपास करण्याचा सल्ला दिला जातो. त्याशिवाय रक्तवाहिनीत चारपेक्षा जास्त ठिकाणी गुठळ्या झाल्या असतील तर इतके स्टेंट घालण्यापेक्षा बायपास करणे सोयीचे ठरते. मात्र तीन ते चार ठिकाणी गुठळ्या असतील तर स्टेंटचा पर्याय निवडला जातो, असे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तिलक सुवर्णा म्हणाले.

स्टेंट कसा बसवला जातो?

रक्तवाहिन्यांमध्ये अडकलेल्या गुठळ्या बाजूला करण्यासाठी कॅथररच्या साहाय्याने फुग्याने रक्तवाहिनी फुगवल्यानंतर दुसऱ्या एका फुग्यावर बसवलेला स्टेंट त्या रक्तवाहिनीत आत ढकलला जातो. बरोबर गुठळीच्या जागी हा फुगा फुगवला जातो आणि त्यावरची स्प्रिंग उघडली जाते. यामुळे रक्तवाहिनीच्या बाजूला सरकवले गेलेले स्निग्ध पदार्थ तिथून हलण्यास मज्जाव होतो.

स्टेंट लावल्यानंतर घ्यावयाची काळजी –

स्टेंट लावल्यानंतर पुढील काही दिवस डॉक्टरांकडून घरी आराम करण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर मात्र दैनंदिन कामे करता येऊ  शकतात. स्टेंट लावल्यानंतर जीवनशैली आणि आहारात बदल करणे आवश्यक असते. स्टेंट लावल्यानंतर फास्ट फूड, मेदयुक्त पदार्थ खाणे टाळावे. शरीरात कोलेस्टेरॉल किंवा चरबी वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. यासाठी वजन त्यातही चरबी वाढू नये यासाठी दररोज किमान ४० ते ४५ मिनिटे पायी चालावे. आहारातील तेल, तुपाचा वापर कमी करावा आणि डॉक्टरांनी दिलेली औषधे त्यांच्या सल्ल्यानुसार नियमित घ्यावीत, असा सल्ला हृदयरोगतज्ज्ञ देतात.

स्टेंटचे प्रकार बेअर मेटल स्टेंट

स्टेंटचे तीन प्रकार आहे. पहिला म्हणजे बेअर मेटल स्टेंट, दुसरा ‘ड्रग इल्युडिंग स्टेंट’ आणि तिसरा डिसॉल्व्ह किंवा रक्तात विरघळणारा स्टेंट.

(१० ते १२ हजार रुपये) – बेअर मेटल स्टेंट हे धातूच्या स्प्रिंगसारखे असते. ही स्टेंटची पहिली आवृत्ती. यामुळे रक्तवाहिन्यांना आधार मिळत असला तरी काही महिन्यांनी रक्तवाहिन्यांचा मार्ग पुन्हा अरुंद होण्याचे प्रमाण अनेकदा स्टेंट लावल्यानंतरही यामध्ये कोलेस्टेरॉल जमा होते. यातून पुन्हा रक्तवाहिनीत गुठळ्या तयार होतात. याला साधारण ७ ते ८ वर्षांचा कालावधी जातो. मात्र या स्टेंटचा वापर गेल्या काही वर्षांत कमी झाला आहे.

ड्रग इल्युडिंग स्टेंट

(२८ ते ३० हजार) – मेटल स्टेंटपेक्षा या स्टेंटमुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी आहे. साधारण दहा ते वीस टक्के रुग्णांमध्ये रक्ताच्या पुन्हा गुठळ्या होतात. या स्टेंटमधून औषध स्रवत असते. हे औषध कोलेस्टेरॉल किंवा रक्तपेशींच्या गुठळ्यांना प्रतिबंध करते. त्यामुळे आता सगळीकडे असा ड्रग इल्युडिंग स्टेंटच वापरला जातो. विशेषत: पुन्हा गुठळ्या होण्याची जास्त जोखीम असलेल्या मधुमेही रुग्णांसाठी अशा प्रकारचे स्टेंट उपयोगी पडतात. मात्र क्वचित वेळा स्टेंटमध्ये रक्ताची गुठळी (इन स्टेंट थ्रोम्बोसिस) होण्याचे प्रकार होऊ शकतात. हे प्राणघातक असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्ताच्या गुठळ्यांना प्रतिबंध करणारी औषधे घ्यावी लागतात.

रक्तात विरघळणारा स्टेंट

(सुमारे २ लाख) – हे स्टेंट रक्तवाहिनीमध्ये बसवल्यावर एक ते दीड वर्षांत विरघरळतात. गेल्या काही महिन्यांपासून रक्तात विरघळणाऱ्या स्टेंट वापरण्यास बंदी आहे. त्याचे कारण आर्थिक आहे. गेल्या वर्षी राष्ट्रीय औषध मूल्य निर्धारण प्राधिकरणाने स्टेंटच्या किमतीवर निर्बंध आणले. त्या वेळी या स्टेंटची बाजारातील किंमत तब्बल १ लाख ९५ हजार रुपये होती. मात्र प्राधिकरणाने हे मूल्य ३० हजार रुपयांपेक्षा असू नये असे सांगितल्याने ही स्टेंट पुरवणाऱ्या एकमेव परदेशी कंपनीने ते बाजारातून काढून घेतले. त्यामुळे सध्या तरी हे स्टेंट वापरले जात नसले तरी भविष्यात कमी किमतीत उपलब्ध झाल्यास तोही पर्याय ठरू शकतो.

First Published on January 16, 2018 2:09 am

Web Title: types of stents and their uses