News Flash

अविवेकी विचारांचा मागोवा

शेवटी त्याने ही टोचणी थांबवण्याचा निर्धार केला.

|| डॉ. अद्वैत पाध्ये

महाविद्यालयामध्ये वादविवादात भाग घ्यायला अल्बर्ट कचरायचा, एवढेच काय पण वाद होण्याच्या भीतीने इतरांशी बोलणेही टाळायचा किंवा उपाहारगृहात गेल्यावर त्याच्याकडे कमी पैसे असूनही मित्रांसाठी कॉफी मागवायचा, पण जवळचे पैसे उगाचच संपवल्यामुळे स्वत:वर चिडायचा. त्या कॉफी पिण्याचा आनंदही फार काळ टिकायचा नाही. सतत टोचणी लागायची.

शेवटी त्याने ही टोचणी थांबवण्याचा निर्धार केला. स्वत:ची प्रत्येक कृती तपासून पाहिली. गरज नसताना मी खर्च का करतो याचे उत्तर शोधताना मनात ठाण मांडून बसलेले विचार बाहेर काढले. लोक काय म्हणतील? मित्र काय म्हणतील? या विचारांमुळेच सतत वायफळ खर्च सुरू होता. या विचारांची पाळेमुळे मग त्याने खणून काढायचे ठरवले. लोकांची मर्जी संपादन करणे किंवा त्यांची नाराजी ओढवून न घेणे हे जीवनात अत्यावश्यक होते का? त्या गोष्टीला महत्त्व दिल्याने आपली बेचैनी वाढते आहे व आपल्याला जे हवे आहे ते आपण करू शकत नाही. तसेच आपण काही केले की दोन्ही बाजूने लोक बोलतात, हा अनुभव होता.

त्याने स्वत:ला प्रश्न विचारायला सुरुवात केली की आपण नक्की कशा प्रकारचे वर्तन केले तर लोकांना आवडेल? अशा वर्तनाचे काही निकष आहेत का? सर्वाची मर्जी सतत सांभाळता येतेच का?, या सगळ्याचा विचार करता त्याच्या लक्षात आले की सर्वच्या सर्व लोकांना पसंत पडेल असे वर्तन अस्तित्वात नसतेच. सर्व लोकांनी आपली सतत प्रशंसा केलीच पाहिजे असा विश्वातील कोणताही नीतीनियम सांगत नाही. ही आपला अट्टाहास आहे. आणि माझी कमतरता लोकांपुढे आली तरी त्यावरून मी नालायक आहे हे सिद्ध होत नाही. माझ्या असंख्य निर्णय किंवा कृतींपैकी एखादी कृती अयोग्य किंवा असमाधानकारक झाली तर लगेच माझ्यावर कोणी ‘बेजवाबदार’पणाचा शिक्का मारला तर ती अतिशयोक्ती आहे. त्यामुळे त्याने ठरवले की वागताना शक्यतो लोक नाव ठेवणार नाहीत याची दक्षता घेईन पण नाव ठेवले तरी स्वत:ला अस्वस्थ करून घेणार नाही.

पुढल्या वेळेस तो मित्रांबरोबर उपाहारगृहात गेला. तिथून बाहेर पडताना दाराजवळ रिकामे तिकीट (अनेक देशांमध्ये ही पद्धत आहे. उपाहारगृहात जेवण घेतले की त्याची नोंद या तिकीटावर केली जाते) दाखवायची लाज बाळगली नाही. तिथून सहज बाहेर आला. मग लक्षात आले की आपण ज्या गोष्टीचे अवडंबर माजवत होतो ती इतरांच्या खिजगणतीतही नव्हती. ना कोणी टिंगल केली, ना कोणी उपहासाचा कटाक्ष टाकला! त्याचे त्यालाच खूप मोकळे वाटले. आपल्याला ज्याची लाज वाटते त्या कृत्यावरून आपण स्वत:चेच मूल्यमापन करून स्वत:वर ‘कमअस्सल’ असल्याचा शिक्का मारत असल्याचे त्याच्या लक्षात आले. आपण फक्त कृत्याचे मूल्यमापन करायचे, संपूर्ण व्यक्तिमत्वाचे नाही, असे त्याने ठरवले.

पूर्वी वाटेत लघवी लागली की बाहेर स्वच्छतागृह असलेल्या कॅफे शोधायला सुरुवात करायचा, मात्र बाहेर स्वच्छतागृह असलेले फार कमी कॅफे होते. आत टॉयलेट असणाऱ्या कॅफेत फक्त लघवीला जाऊन काही न खाता रिकामे तिकीट दाखवायची लाज वाटायची. यावर मात करण्यासाठी आता त्याने सतत अशा कॅफेमध्ये लघवीसाठी जायला सुरुवात केली. प्रवेशद्वारापाशी रिकामे तिकीट दाखवले की कॅशिअर्सच्या विविध प्रतिक्रिया अनुभवायला सुरुवात केली. या प्रतिक्रिया / टीका / हसणे माझ्या कृतीला आहे, मला नाही असे स्वत:ला समजावायला सुरुवात केली आणि मग लाजेची भावना कमी होऊ  लागली.

या सर्व गोष्टीतील हा जो अल्बर्ट आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून नंतरच्या जीवनातील प्रसिध्द मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस आहे. स्वत:च्या दोषांवर स्वत:च्या विचारात व वर्तनात बदल करून बदल घडवण्यासाठी त्यांनी सतत स्वत:हून जे प्रयत्न केले त्याचाच परिपाक म्हणजे त्यांनी अभ्यासाअंती मांडलेली उपचार पद्धती, विवेकी वर्तनोपचार पध्दती किंवा आरइबीटी (रॅशनल इमोटिव्ह बिहेविअर थेरपी) म्हणजेच मनात निर्माण होणारी लाजेची, चिंतेची, कुचंबणेची विरूप भावना व अशा गोष्टी टाळण्याचे वर्तन हा आपल्याच अविवेकी विचारांचा परिणाम असतो. प्रत्यक्ष घटनेपेक्षा त्या घटनचा विचार करण्याच्या अविवेकी विचारपध्दतीमुळे विरूप भावना निर्माण होतात व त्यामुळे अयोग्य/ अविवेकी वर्तन घडते, असा त्याचा सिध्दांत होता. ए+बी =सी (ए = अ‍ॅण्टिसीडण्ट इव्हेन्ट, बी = बिलीफ सिस्टिम, सी = कॉन्सेक्युअन्स)

विरूप भावना मनात सतत निर्माण होत राहिल्यावर आपली कृती/वर्तन, त्यामागचे विचार अल्बर्ट सतत तपासून पाहायचा व आपले अविवेकी विचार शोधायचा. त्यांच्या जागी विवेकी विचार शोधून मग आपले वर्तन बदलण्यासाठी वर्तनोपचारातील पद्धतींची जोड द्यायचा व स्वत:मध्ये योग्य बदल घडवण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न करायचा!

Adwaitpadhye1972@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 1:15 am

Web Title: unreasonable views
Next Stories
1 मुलांमधील अतिचंचलता
2 वर्तनोपचार
3 मधुमेह : काय खावे?
Just Now!
X