18 November 2017

News Flash

लघवीच्या मार्गाचा जंतुसंसर्ग

लघवी आल्यावर लगेच लघवीला जाणेही गरजेचे असते.

डॉ.अमोल अन्नदाते | Updated: September 7, 2017 1:37 AM

कन्सल्टिंग रूममध्ये आल्या आल्या इराच्या चेहऱ्यावरचे त्रस्त भाव आज काही तरी प्रॉब्लेम नक्की आहे हे स्पष्ट करत होते. रुग्णाकडे फक्त बघून लुक्स गुड, लुक्स बॅड या संकल्पना निदान पद्धतीत रुजल्या आहेत. खरं तर या पालकांनीही शिकून घ्यायला हव्या म्हणजे आजारी मुले लवकर बालरोगतज्ज्ञांकडे आणली जातील. इराच्या आईला याचा नेमका अंदाज असल्याने तिने इराला तापाच्या दुसऱ्या दिवशीच आणले होते. डॉक्टर कालपासून खूप ताप, मळमळ आणि आज सकाळपासून लघवीलापण जरा जळजळ होते आहे. आईच्या या वाक्यातच निदान बऱ्यापैकी स्पष्ट होत होते. पोट तपासून बघितल्यावर ओटीपोटाच्या भागात दाबल्यावर जास्त दुखत असल्याचे जाणवले. बघा लक्षणांवरून तरी लघवीच्या मार्गाचा जंतुसंसर्ग वाटतो आहे. आणि मुलींमध्ये तो जास्त प्रमाणात आढळतो. पण तरीही लघवीची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. थोडय़ा वेळाने लघवीची तपासणी आली. त्यात १० पस सेल्स म्हणजे पेशी आढळून आल्या. बघा सहसा पाचपेक्षा जास्त पस सेल्स जर लघवीमध्ये आढळून आले तर लघवी मार्गाचा जंतुसंसर्ग निश्चित असतो. आपण औषधे सुरू करू या पण त्याआधी आपल्याला लघवीचे कल्चर पाठवणे गरजेचे आहे. कल्चर हा शब्द ऐकून इराची आई जरा गोंधळून गेली. ‘डॉक्टर ही नेमकी काय भानगड आहे आणि ही तपासणी कशासाठी?’ कुठलीही तपासणी पाठवण्याआधी रुग्णांना त्याचे कारण सांगितले तर त्यांना ती तपासणी व  त्याचा खर्च गरजेचा आहे हे पटते. बघा लघवीच्या मार्गामध्ये जंतुसंसर्ग करणारे अनेक जंतू असतात. तसेच त्यांच्यावर कुठले औषध नेमके परिणाम करतात हे ठरवणेही गरजेचे असते. यासाठी नेमके मार्गदर्शन करणारी तपासणी म्हणजे युरीन कल्चर. पण मात्र या तपासणीसाठी लघवी घेताना विशेष काळजी घ्यायला हवी म्हणजे नेमका रिझल्ट मिळतो. आधी लघवीची जागा नीट पाण्याने स्वछ धुवून घ्यावी. मग सुरुवातीची आणि शेवटची लघवी सोडून मध्ये येणारी लघवी लॅबमध्ये मिळणाऱ्या कंटेनरमध्ये पकडावी. या तपासणीद्वारे नेमका कुठल्या जंतुचा संसर्ग झाला आहे आणि नेमके कुठले औषध त्या जंतू ला लागू पडेल हे दोन ते तीन दिवसात कळते. ‘हो डॉक्टर, आपण ही तपासणी नक्की करू. आणि तुम्ही मागे एकदा औषधांना रेझिस्टन्स येतो असे म्हणत होता, तेही आता या तपासणीमुळे टळेल का?’ हो नक्की, नेमके औषध वापरल्यावर रेझिस्टन्सचा प्रश्नच येत नाही. ‘डॉक्टर, लघवीचा संसर्ग असल्यावर लघवीला जळजळ किंवा या मार्गासंबंधित लक्षणे असतातच का?’ नाही, लहान मुलांमध्ये बऱ्याचदा फक्त ताप किंवा ताप आणि उलटय़ा एवढीच लक्षणेही असतात. म्हणून लघवीची तपासणी आणि युरीन कल्चर या दोन तपासण्यांचे लहान मुलांमध्ये तापाचे कारण शोधण्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातच जेव्हा तापाचे नेमके कारण सापडत नसते तेव्हा लघवीमार्गाचा जंतुसंसर्ग हे लक्षात घेण्यासारखे महत्त्वाचे निदान ठरते. ‘डॉक्टर यासाठी औषधे किती दिवस घ्यावी लागतील आणि दुसरी काही काळजी घ्यायची का?’ यासाठी शक्यतो १४ दिवस प्रतिजैविके  म्हणजे अँटीबायोटिक  घ्यावी लागतात. सुरुवातीला उपचार सुरू केल्यावर चार-पाच दिवसांत सगळी लक्षणे कमी होतील पण तरीही १४ दिवसांचा कोर्स पूर्ण केला नाही तर जंतुसंसर्ग परत होण्याचा धोका असतो तसेच नंतर रेझिस्टन्सचाही धोका असतो. भरपूर म्हणजे तहान असेल तेव्हा पुरेसे पाणी पिणे आणि लघवीच्या जागेची स्वच्छता ठेवणे एवढी काळजी घेतलेली चांगली. तसेच लघवी आल्यावर लगेच लघवीला जाणेही गरजेचे असते.

amolaannadate@yahoo.co.in

First Published on September 7, 2017 1:37 am

Web Title: urinary tract infection