18 November 2017

News Flash

पिंपळपान : दूर्वा

चिघळलेल्या जखमा भरून येण्याकरिता दूर्वाचा स्वरस असलेले रोपण तेल उत्तम काम देते

वैद्य प. य. वैद्य खडीवाले | Updated: August 31, 2017 3:06 AM

‘आधी वंदू तुज मोरया!’ असे म्हणून तुम्ही-आम्ही सर्व जण एखाद्या नवीन उपक्रमाला मोठय़ा उत्साहात सुरुवात करीत असतो. आयुर्वेद व वनस्पतिप्रेमी मराठी वाचकांकरिता, अनेकानेक वनस्पतींची उपयुक्त माहिती देण्याचा अल्प प्रयत्न मी ‘श्रीगणेश’ वंदन करून करीत आहे. तुम्हा-आम्हा सर्वाच्याच जीवनात अतिशय श्रद्धेचे स्थान असणाऱ्या श्रीगणेशाची आवडती भगिनी दूर्वा आहे, हे मी सांगावयास नकोच. दिवसेंदिवस शहरीकरण गणितीश्रेणीने वाढत आहे. आता लहान-मोठय़ा शहरांच्या भोवती मोकळी जागाच दिसत नाही. पाच-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत तरी लहान-मोठय़ा शहरांच्या बाहेर खूप मोठी मोकळी मैदाने असत. अशा मैदानांत किंवा शेताच्या बांध्यावर हटकून असणारी वनस्पती ‘हरियाली’. याचे कारण असे सांगतात की, निसर्गानेच श्रीगणेश पूजनाकरिता ही खासकरून व्यवस्था केलेली आहे.

धार्मिक कारणाव्यतिरिक्त दूर्वाचा खास वापर हा मल व मूत्रसंबंधित अतिउष्णतेच्या विकासाकरिता प्राचीन काळापासून सर्वत्र होत आहे. लघवीतून वा मलप्रवृत्तीच्या वेळी त्या इंद्रियांची आग होणे किंवा रक्त जाणे, याकरिता ताज्या हिरव्यागार दुर्वाचा रस सत्त्वर गुण देतो. मात्र दूर्वा म्हणजे गवत नव्हे, याची जाण प्रत्येकाने ठेवली पाहिजे. ज्या दूर्वाना किंवा हरियालीला तुरे फुटलेले नाहीत, अशीच दुर्वा औषधी उपयोगाची आहे. विविध प्रकारच्या त्वचाविकारांत दूर्वा स्वच्छ धुऊन, वाटून त्यांच्या पानांचा चटणीसारखा लेप बाहेरून लावावा. पोटात दूर्वाचा ताजा रस पाव कप दोन वेळा घ्यावा. मायभगिनींच्या अत्यार्तव या नेहमीच्या समस्येत ताज्या दूर्वाचा रस घेतल्याबरोबर दोन दिवसांत आराम पडू शकतो. यामुळे प्रवाळ, मोतीभस्मासारखी महागडी औषधे लागत नाहीत. गणेशप्रसाद व गणेशकृपा अशी दोन पर्यायी औषधे अनुक्रमे प्रवाळ व व कामदुधाकरिता वापरतो. त्याकरिता ‘भावनाद्रव्य’ म्हणून दूर्वाचा स्वरस आवश्यक असतो. केसांची आग होणे, शांत झोप न लागणे, केस तुटणे व अशांत झोपेकरिता जपाकुसुमादि तेल केसांना नियमितपणे लावले जाते. त्यातील एक प्रमुख घटक दूर्वा आहे. चिघळलेल्या जखमा भरून येण्याकरिता दूर्वाचा स्वरस असलेले रोपण तेल उत्तम काम देते. अत्यार्तव समस्येमध्ये गर्भाशय पिशवी काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. अशा अवस्थेत दुर्वाघघृत निश्चयाने त्वरित गुण देते.

First Published on August 31, 2017 3:06 am

Web Title: use of durva grass in ganesh puja