15 December 2018

News Flash

‘कामा’ची गोष्ट : गुप्तरोग

लैंगिक संबंधांतून विशिष्ट जंतू, विषाणू किंवा बुरशीची (फंगस) लागण झालेल्या रोगांना गुप्तरोग म्हटले जाते

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

 

लैंगिक संबंधांतून विशिष्ट जंतू, विषाणू किंवा बुरशीची (फंगस) लागण झालेल्या रोगांना गुप्तरोग म्हटले जाते. या सदराच्या मागील भागात ‘सिफीलीस’ या आजाराची माहिती आपण घेतली. आता अशाच आणखी काही गुप्तरोगांविषयी..

गनोरिया

याला प्रमेह किंवा परमा अशीही नावे आहेत. मनुष्यजातीला माहीत असलेला हा सर्वात प्राचीन असा गुप्तरोग. मोझेस, प्लेटो आणि अरिस्टोटल यांच्या लिखाणांमध्ये या आजाराचा उल्लेख आढळतो. १८७९ साली या रोगास कारणीभूत असलेले हे जंतू शोधण्यात यश आले. गनोरीयाचा संसर्ग चुंबनापासून ते संभोगापर्यंत, विविध प्रकारच्या लैगिंक संबंधांमधून होतो. संसर्ग झाल्यानंतर २ ते १० दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. लघवी करताना जळजळ, वेदना होणे अशी लक्षणे निर्माण होतात. मूत्रवाहिनीचा दाह होऊन तिला सूज येते आणि जननेंद्रियातून पांढरट पू येऊ  लागतो. ताप येणे, सांधे दुखणे, लघवी तुंबणे ही लक्षणेही उद्भवू शकतात. वेळीच इलाज न केल्यास रोग जननसंस्थेतील इतर अवयवांमध्ये पसरत जाऊन व्यक्तीमध्ये कायमचे वंध्यत्व येते. जननसंस्थेशिवाय रक्तावाटे रोग हृदय आणि मेंदूपर्यंत पोहोचून प्राणघातकही ठरू शकतो. आजार झालेल्या अवस्थेत स्त्री गरोदर राहिल्यास तो तिच्या अर्भकामध्ये पसरून त्यास अंधत्व येऊ  शकते.

५० टक्के स्त्रियांमध्ये तर १० टक्के पुरुषांमध्ये संसर्ग होऊनही कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. लक्षणे गुप्त राहिलेल्या स्त्री किंवा पुरुषांकडून इतरांना मात्र या रोगाचा संसर्ग होऊ  शकतो.

गनोरियाचे निदान करण्यासाठी जननेंद्रियातून निघणाऱ्या स्रावाची सूक्ष्मदर्शक तपासणी करावी लागते. गनोरियाचा इलाज तसा खूपच सोपा झाला आहे. पेनीसिलीन आणि टेट्रासाइक्लीन या सिफीलीससाठी उपयोगी पडणाऱ्या औषधांचा गनोरियावरही उत्तम गुण येतो. त्याखेरीज क्वीनोलोन्स आणि अलीकडच्या काळात निघालेली इतर अनेक औषधे गनोरियाचा इलाज करण्यासाठी वापरली जातात.

हर्पीस

जननेंद्रियाचा हर्पीस हा एचएसव्ही या विषाणूच्या संसर्गामुळे होतो. हा गुप्तरोग पूर्णपणे कधीच बरा होत नाही. मात्र कालपरत्वे या रोगाचे स्वरूप स्वत:हून सौम्य होत जाते.

संभोग, मुखमैथुन, गुदमैथुन किंवा तत्सम लैंगिक वर्तनाद्वारे या रोगाची लागण होते. विषाणूंचा संसर्ग झाल्यानंतर २ ते ३० दिवसांत कधीही रोगाची लक्षणे निर्माण होऊ  लागतात. सुरुवातीस जननेंद्रियावर वेदनामय अशा १० ते २० लहान पुटपुळ्यांचा एक पुंजका निर्माण होतो. त्याचबरोबर ताप, डोकेदुखी, अंगदुखी ही लक्षणे व्यक्त होतात. ताप, डोकेदुखी ही लक्षणे साधारण एक आठवडाभर राहतात पण पुटकुळ्या मात्र तीन आठवडे राहतात. पुटकुळ्या फुटून त्या ठिकाणी लालसर असे व्रण तयार होतात. हे व्रण २ ते ३ आठवडय़ांत स्वत:हून भरून येतात.

यानंतर हर्पीसचे विषाणू मज्जारज्जूच्या तळाशी जाऊन तिथे सुप्त अवस्थेत अनेक वर्ष लपून राहतात. यानंतर वेळोवेळी उचल खाऊन ते हर्पीसची लक्षणे पुन्हा पुन्हा व्यक्तीमध्ये निर्माण करत राहतात. एका वर्षांत साधारणपणे ३ ते ४ वेळा, असे अनेक वर्ष व्यक्ती हर्पीसने पीडित राहते. हर्पीसच्या विषाणूंना समूळ नष्ट करू शकतील, अशी औषधे अजून तरी मिळालेली नाहीत.

हर्पीस असलेली स्त्री गरोदर राहिल्यास होणाऱ्या बाळाला त्याचा संसर्ग होऊ  शकतो. असे मूल जन्मजात विकलांग आणि विकृत असण्याची दाट शक्यता असते.

अन्य रोग

* हर्पीसव्यतिरिक्त विषाणूंमुळे होणारे आणखीन दोन गुप्तरोग आहेत. एक म्हणजे वेनेरियल वॉर्टस् आणि दुसरा मोल्युस्कम् काँटॅजिओसम्. या रोगांसाठी मराठीत अजून वेगळी नावे नाहीत. एड्स व हिपॅटायटिस-बी हेसुद्धा विषाणूंमुळे होणारे व लैंगिक संबंधांतून संसर्ग होणारे प्राणघातक आणि असाध्य असे रोग आहेत.

* मृदूव्रण, ग्रॅन्यूलोमा इंग्वायनेल तसेच लिंफोग्रॅन्यूलोमा व्हेनेरीयम हे गुप्तरोगही आपल्या देशात अनेक वेळा पाहायला मिळतात. हे तिन्ही रोग जंतूंमुळे होणारे असून त्यांना औषधांनी पूर्ण बरे करणे आज शक्य झाले आहे.

* गुप्तरोगांवर स्वत:हून उपाय करून घेऊ  नयेत. स्वत:हून केलेले उपाय प्राणघातकही ठरू शकतात. या रोगांचा उपचार भोंदू डॉक्टर किंवा वैदू यांकडून घेणे कटाक्षाने टाळावे. तज्ज्ञ आणि प्रशिक्षित डॉक्टरांकडूनच तपासणी व उपचार करून घ्यावेत.

* कंडोम वापरल्याने गुप्तरोग होत नाहीत असा प्रचार केलेला नेहमी पाहायला मिळतो. मी वैयक्तिकरीत्या याच्याशी सहमत नाही. कंडोमचा वापर करूनही एड्स व इतर गुप्तरोग झाल्याची असंख्य उदाहरणे मी पाहिली आहेत. स्वत:ला गुप्तरोग झालेला असण्याचा संशय मनात आल्यास योग्य डॉक्टरांकडे जाऊन योग्य त्या तपासण्या करून घेणेच योग्य.

-डॉ. राजन भोसले, लैंगिक विज्ञानतज्ज्ञ.

rajanbhonsle@gmail.com

First Published on March 13, 2018 3:57 am

Web Title: venereal disease