डॉ. संदीप जाधव, मानसोपचारतज्ज्ञ

लहान मुलांमधील व्हिडीओ गेम खेळण्याची सवय सामान्य वाटत असली तरी या सवयीमुळे मुलांच्या वागणुकीतील बदलाबरोबरच अनेक मानसिक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे घरात कायम व्हिडीओ गेममध्ये डोके खुपसून बसलेल्या मुलांकडे जागरूकतेने पाहण्याची आवश्यकता आहे.

मुलांमधील व्हिडीओ गेमचे व्यसन सोडवण्यासाठी ते व्यसन लागण्यामागील कारणे शोधणे आवश्यक आहे. कारण व्हिडीओ गेमकडे आकर्षित होणाऱ्या मुलांमध्ये मस्तीखोरपणा, चंचलता आदी लक्षणे असल्याचे दिसून येते. ही मुले हुशार असतात, मात्र अभ्यासातील गती कमी असल्याने फार काळ त्यांचे मन अभ्यासात रमत नाही. काही मुलांना शाळा, घरात किंवा मित्रांमध्ये मानहानीकारक वागणूक मिळत असते, तर काही मुलांमधील अतिरिक्त ऊर्जा व्हिडीओ गेम खेळण्याच्या रूपात बाहेर येत असते. अशी मुले व्हिडीओ गेमच्या आहारी जातात.

व्हिडीओ गेममध्ये आभासी जग असते. यामध्ये जिंकण्यासाठी फार मेहनत करण्याची आवश्यकता नसते. तर काही तासांच्या गेममधून कौतुक व गुण मिळत असतात. आणि यशस्वी झाल्याची भावना वाढीस लागत असते. मात्र प्रत्यक्षात यश मिळविण्यासाठी मेहनत करावी लागते. त्यामुळे अभ्यासात किंवा सामान्यज्ञानात मागे राहिलेल्या मुलांना व्हिडीओ गेमचा

आधार वाटू लागतो. अनेक लहान मुलांमध्ये अध्ययन अक्षमता असते. या आजाराचे निदान झालेले नसले की ‘मुलं अभ्यास करीत नाहीत’, अशी पालकांची समजूत होते. त्यातून अभ्यासातील बारकावे लक्षात न आल्याने मुलांचे लक्ष लागत नाही आणि ही मुले व्हिडीओ गेम किंवा तत्सम गोष्टींकडे वळतात. आभासी जगात राहण्याचा आनंद मिळत असल्याने ही मुले प्रत्यक्षात मेहनत करण्याचा कंटाळा करतात व व्हिडीओ गेमच्या जगात रमतात. व्हिडीओ गेमच्या व्यसनाचा मुलांच्या मानसिक आरोग्याबरोबर वैयक्तिक आयुष्यात बऱ्याच पातळ्यांवर परिणाम होतो.

वर्तणूक दोष

व्हिडीओ गेमच्या आहारी गेलेल्या मुलांच्या वर्तणुकीवर विपरीत परिणाम होत असतो. ही मुले अधिक एकलकोंडी होताना दिसतात. अनेकदा ही मुले कुटुंबात किंवा मित्र-परिवारासोबत असतानाही एकांतात व्हिडीओ गेम खेळत असतात. त्यातून स्वार्थीपणा वाढीस लागतो, तर आभासी जगात राहिल्याने सद्य:परिस्थितीबाबत मुले अनभिज्ञ राहतात. त्यामुळे प्रत्यक्षात एखादी घटना घडली तर ती कशी हाताळावी हे लक्षात येत नाही. बहुतांश व्हिडीओ गेम हे आक्रमक असतात. त्या खेळात दोन गटांमधील स्पर्धा, जिंकण्याची धडपड सुरू असते. व्हिडीओ गेम काल्पनिक असतात, पण काही वेळानंतर मुलांना या गोष्टी खऱ्या वाटू लागतात. काही दिवसांपूर्वी ब्लू व्हेल या खेळाबाबत खूप चर्चा सुरू होती. या खेळातील आभासी जगात मुले हरवून जातात आणि खेळाच्या मागणीनुसार स्वत:ला त्रास करून घेतात. सातत्याने अशा प्रकारचे गेम खेळल्याने वागणुकीत चिडचिडेपणा येण्याची शक्यता असते. मानसिकदृष्टय़ा कमकुवत असलेली मुले यामध्ये अडकतात. यातून अभ्यासातील रस कमी होतो. व्हिडीओ गेमच्या अधीन गेल्याने आजूबाजूच्या मित्रमंडळींशी संवाद कमी होतो. वाचन कमी होते. लोकांशी संभाषण कमी झाल्याने समाजाशी हळूहळू संपर्क कमी होतो. या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम मुलांच्या वैयक्तिक आयुष्यावर होतो. आपल्या मुलाला व्हिडीओ गेमचे व्यसन लागले आहे हे कळल्यानंतर पालक मुलांना व्हिडीओ गेमपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी मुले हट्ट करतात. अनेकदा ही मुले व्हिडीओ गेम खेळण्यासाठी पालकांना उलट उत्तरे देतात व वेळप्रसंगी खोटेही बोलतात. व्हिडीओ गेम खेळत असताना मेंदूमध्ये जैविक बदल होत असतात. ज्यामुळे भावनिक नाते संपुष्टात येते. मुलांच्या वागणूक दोषाची सुरुवात लहानपणापासून होत असते. हट्ट करून किंवा रडून एखादी गोष्ट मिळण्याची मेंदूला सवय लागलेली असते. पालकांनी लावलेली ही सवय मोठेपणी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे मुलांमध्ये व्हिडीओ गेम किंवा तत्सम बाबींचे व्यसन लागू नये यासाठी लहानपणापासूनच मुलांची वाढ योग्य प्रकारे करणे आवश्यक ठरते.