एकांगी विचार करून अल्पकाळासाठी यश मिळाल्यासारखे वाटले तरी दीर्घकाळासाठी उपयोगी पडतो, तो सारासार विचार. पर्यावरणालाही हेच तत्त्व लागू पडते.

नॅनो टेक्नॉलॉजी हा या दशकातील परवलीचा शब्द. अणूमध्येच ब्रह्मांड सामावलेले आहे अशा अर्थाचे तर किती तरी दाखले पुरातन काळापासून दिले जातात. पुरातन कशाला, जगातील सर्व देशांच्या संशोधकांनी एकत्र येऊन विश्वनिर्मितीचे कोडे सोडवण्यासाठी ‘गॉड पार्टकिल’ या अतिसूक्ष्म कणाचाच तर शोध घ्यायचे ठरवले. तर अशा या अतिसूक्ष्म कणांनी एकीकडे संशोधन, तंत्रज्ञानात महाकाय प्रकल्पांची उभारणी होत असतानाच माणसाच्या आरोग्याबाबतही हे सूक्ष्म कण मोठी भूमिका बजावत असल्याचे समोर येतेय.

कालपासूनच दिल्लीमध्ये सम-विषम गाडय़ांचा प्रयोग सुरू झाला आहे. निम्म्या दिल्लीकरांच्या गाडय़ा घरात बंदिस्त ठेवण्यासाठी कारणीभूत ठरलेत ते सूक्ष्म कण म्हणजे पर्टक्यिुलेट मॅटर (पीएम). ही संकल्पना आपल्यासाठी नवी असली तरी त्याबाबत जगात गेली तीन दशके अभ्यास सुरू आहे. आपल्याकडे आताआतापर्यंत केवळ धूलिकण असेच सरसकट म्हटले जात होते. आता त्यात पीएम १० आणि पीएम २.५ असे दोन विशिष्ट प्रकार जमा झालेत. नेहमीप्रमाणेच याची सुरुवात झाली ती अमेरिकेत. १९८७ पूर्वी तिथेही प्रदूषण मोजण्याचे एक मापक म्हणून धूलिकण हाच निकष होता. पण सर्वच धूलिकण काही मानवासाठी घातक नसतात, असे लक्षात आले. १० मायक्रॉनपेक्षा अधिक मोठे कण तर नाकातील केसांमध्येच अडकून बाहेर जातात. त्यामुळे १० मायक्रॉनपेक्षा कमी व्यासाच्या कणांचे हवेतील मोजमाप सुरू झाले. अर्थात तेवढय़ावर शांत बसतील ते संशोधक कसले.. त्यामुळे या कणांचाही पाठपुरावा केला गेला आणि मग पुढचे सत्य लक्षात आले. या दहा मायक्रॉनपेक्षाही २.५ मायक्रॉनपेक्षा कमी व्यास असलेले अतिसूक्ष्म कण हे अत्यंत त्रासदायक आहेत. कारण श्वासातून ते पार फुप्फुसापर्यंत तर पोहोचतातच, शिवाय आपल्या रक्तात मिसळून संपूर्ण शरीरभर फिरतात. त्यामुळे १९९७ नंतर या कणांनाही प्रदूषण मापनात मानाचे स्थान मिळाले.

शरीरात वाट्टेल तिथे जाणे या कणांना साध्य होते ते त्यांच्या सूक्ष्म आकारामुळे. मायक्रॉन म्हणजे मीटरचा दशलक्षावा भाग. एका मीटरच्या पट्टीत एकमेकांच्या बाजूला ठेवले तर एक मायक्रॉनचे दहा लाख कण सहज मावतील. आपल्या केसांच्या टोकाचा व्यास हा ७० मायक्रॉन असतो. म्हणजेच केसाच्या टोकावर एक मायक्रॉन व्यासाचे साधारण एक हजार कण राहतील. हे कण केवळ घन स्वरूपात असतील असेही नाही. ते द्रव स्वरूपात, मिश्रण स्वरूपातही असू शकतात.

निसर्गत: धूळ असतेच हवेत. वाऱ्यामुळे उडणारी माती, ज्वालामुखीतून बाहेर पडणारा धूर, जंगलात लागलेला वणवा यातून हे कमी-अधिक आकाराचे कण हवेत मिसळत असतातच. मात्र मानवाच्या हालचाली आणि कामे त्यांचे प्रमाण अनेक पटींनी वाढवतात. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, बांधकामे, कारखाने ही त्याची प्रमुख कारणे. शेतीसाठी जमीन जाळणे, थंडीसाठी शेकोटी पेटवणे यातूनही हे कण बाहेर पडतात. कोणते कण शरीराला किती हानीकारक आहेत, हवेत नेमक्या कोणत्या प्रकारच्या कणांची किती संख्या आहे, हे पाहणे आजमितीला तरी शक्य नाही. मात्र या कणांमुळे आणि कोणताही अडथळा छेदण्याची क्षमता असलेल्या त्यांच्या आकारामुळे त्यांचा धोका प्रचंड आहे. म्हणजे साध्या सर्दी-खोकल्यापासून दम्यापर्यंत हे कण कारणीभूत ठरतातच. मात्र जगभरात विविध ठिकाणी होत असलेल्या संशोधनावरून हृदयविकार व कर्करोगासाठीही हे कण घातक ठरत असल्याचा मतप्रवाह आहे.

एका घनमीटरमध्ये या सूक्ष्म कणांचे प्रमाण कितपत असावे, याबाबत प्रत्येक देशाचे निकष वेगळे आहेत. भारतात पीएम २.५ किंवा पीएम १० हे १०० मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक असल्यास त्रासदायक व ४०० मायक्रोग्रॅमपेक्षा अधिक कण धोक्याचे असल्याचा निकष मानला जातो. मात्र या धूलिकणांच्या प्रमाणावरून त्यांच्या धोक्याची कल्पना येणार नाही, असाही सूर उमटू लागला आहे. हवेत नेमके कोणते धूलिकण आहेत आणि त्यांचा शरीराला किती त्रास होईल हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत हे निकष सर्वमान्य होणार नाहीत. सध्या तरी या सर्वच सूक्ष्म कणांकडे गांभीर्याने पाहावे लागेल.

prajakta.kasale@expressindia.com