11 December 2017

News Flash

बाल आरोग्य : ‘झीका’चे काय करायचे?

मुदतीचा आजार आहे आणि जसा येतो तसाच मुदत संपली की जातोही.

डॉ. अमोल अन्नदाते | Updated: June 15, 2017 12:49 AM

संकेतला कधी तरी होणारा सर्दी-खोकला असल्याचे सांगूनही या वेळी आईवडिलांच्या चेहऱ्यावरचे काळजीचे भाव तसेच होते. आतापर्यंत सर्दी-खोकला हा सहसा कसा विषाणूजन्य असतो आणि एका मुदतीनंतर संपतो हे आता संकेतचे आई-वडील एखाद्या डॉक्टरला समजावून सांगतील इतक्या वेळा मी त्यांना समजावून सांगितले होते, पण तरी या वेळी एवढी काळजी का? प्रिस्क्रिप्शन लिहीत असताना मी स्वत:च विचारले, तुम्हाला अजून काही विचारायचे आहे का? संकेतला अजून दुसरी काही समस्या नाही ना? मग आई बोलू लागली, ‘‘डॉक्टर, सध्या टीव्ही, वर्तमानपत्रात भारतात झीका व्हायरस आला आहे, असे आम्ही बघतो, वाचतो आहोत. तसेच लहान मुलांना याचा जास्त धोका आहे हेही आम्ही ऐकतो आहेत आणि संकेतची लक्षणेही तशीच वाटली. म्हणून जरा भीती वाटते. बाकी काही नाही.’’

‘‘खरं तर स्वाइन फ्लू असो की झीका, अशा कुठल्याही नव्या विषाणूची चर्चा माध्यमांमधून सुरू झाली की प्रत्येक सर्दी-खोकल्याच्या रुग्णांना आपल्याला हा आजार झालेला तर नाही ना अशी भीती वाटणे साहजिक असते. हे बघा, सर्वप्रथम आता झीका या विषाणूच्या तीनच केस सापडल्या आहेत आणि त्याही अहमदाबादमध्ये. म्हणून महाराष्ट्रात याची साथ आली आहे किंवा येईलच असे मानण्याचे मुळीच कारण नाही. जरी महाराष्ट्रात तो आला तरी तो एवढा घाबरण्यासारखा आजार नाही. अहो, इतर कुठल्याही विषाणूसारखा विषाणूच तो! तुम्हाला जसे सर्दी-खोकल्याच्या वेळी सांगतो तसेच झीकाचेही आहे. तोही मुदतीचा आजार आहे आणि जसा येतो तसाच मुदत संपली की जातोही.’’

‘‘पण डॉक्टर, त्यातही सुरुवातीला सर्दी-खोकला होतो, मग आम्ही हा झीका आहे हे कसे ओळखायचे?’’

‘‘शक्यतो आपल्या भागात झीकाचा रुग्ण असल्याशिवाय हा संसर्ग होणे अवघड असते, पण तरीही यात सुरुवातीच्या सर्दी-खोकल्यानंतर अंग दुखणे, डोळे लाल होणे, अंगावर पुरळ येणे, डोके आणि गुडघा तसेच इतर सांधे दुखणे अशी इतर लक्षणेही दिसतात; पण झीकाचा संसर्ग झालेला प्रत्येक रुग्ण गंभीरच होईल आणि प्रत्येकासाठी हा जीवघेणाच ठरेल असे मुळीच नाही. ज्यांची प्रतिकारशक्ती खूप कमी आहे, त्यांच्यामध्येच अशा वेळी आजारात गुंतागुंत होण्याचे, आजार गंभीर होण्याचे प्रमाण जास्त असते आणि हे तर प्रत्येक आजाराच्या बाबतीत तितकेच खरे आहे, म्हणून तुम्ही झीका म्हणजे काही तरी महाराक्षस आहे आणि तो आला तर आपले सर्वाचे काही खरे नाही असा मुळीच विचार करू नका.’’

‘‘डॉक्टर, याला उपचार नाहीत, असे आम्ही ऐकतो.’’

‘‘अहो, त्याला उपचार नाही म्हणण्यापेक्षा तो विषाणूजन्य असल्याने त्याला उपचारांची गरज नाही, असे म्हणा. हो, रुग्णावर लक्ष ठेवण्याची आणि त्याच्या लक्षणांवर उपचारांची मात्र गरज असते, तसेच आजारात काही गुंतागुंत होत असेल तर ते लवकर ओळखून त्याच्यावरही उपचारांची गरज असते.’’

‘‘डॉक्टर, हा कसा पसरतो आणि तो रोखण्यासाठी आम्ही काय करू शकतो?’’

‘‘आपण इतकी वर्षे डेंग्यू, चिकनगुनियाबद्दल ऐकतो आहोत. हे आजार ज्या एडीस डासामुळे पसरतात त्याच डासामुळे झीका पसरतो. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. म्हणून पावसाळ्याआधी आपल्या घरात, घराभोवती आणि छतावर जिथे जिथे पाणी साचण्याची शक्यता आहे, त्याची नियमित स्वच्छता करणे खूप गरजेचे आहे. छतावरची जुनी भांडी, टायर, अडगळीत पडलेले सामान हे सगळे काढून टाकले पाहिजे.’’

‘‘डॉक्टर, यावर काही लस?’’

‘‘बघा, मी परत परत सांगतो, हा विषाणूजन्य आजार आहे. कुठलाही विषाणू हा बहुरूप्यासारखा असतो. तो दर वेळेला वेश बदलून येतो म्हणून याच्यावर लस विकसित करणे अवघड असते. डासांची उत्पत्ती रोखणे हेच सर्वोत्तम लसीकरण असते.’’

amolaaannadate@yahoo.co.in

First Published on June 15, 2017 12:49 am

Web Title: zika virus issue 2