04 March 2021

News Flash

पिंपळपान : गोखरू

गाईच्या पायाला गोखरूचा काटा टोचतो म्हणून गोक्षुर व खुरांचा वेध घेतो म्हणून गोखरू असते नाव पडले आहे.

गोक्षुरं शरणं गच्छामि। माम रक्षतु गोक्षुर:।।

डॉ. वा. ग. देसाई यांच्या मते zygophylleoe (झायगोफिलिए) या वर्गात गोखरूचा समावेश आहे. हा वर्ग उष्ण कटिबंधात परंतु सुक्यात जमिनीत होतो. गोखरू पसरणारे लहान औषधी ट्रेलिंग प्लँट आहे. या वर्गात क्षुप आणि झाळकट वृक्ष आहेत. या वर्गाचे सताप वर्गाशी साम्य आहे. भारतात सर्वत्र रेती प्रदेशात, रूक्ष जमिनीत, कोकणात कातळावर, राजस्थान, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कच्छ, काठेवाड, बिहार, बंगाल, तामिळनाडू असा सर्वत्र होतो. दक्षिण भारतात समुद्रकाठी होतो. मराठवाडय़ात क्वचित प्रसंगी उकिरडय़ावर, पडीक जमिनीत होतो. गोखरूच्या फळांच्या आकारापेक्षा किंचित लहान चपटय़ा आकाराची फळे असणारे क्षुद्र गोखरू किंवा क्षुद्र सराटे ही एक जात सर्वत्र आढळते. त्याचा औषधांत उपयोग नाही. बडा गोखरू या नावाने ओळखले जाते. याला नेमके चार काटे असतात. या प्रकारांखेरीज हसक नावाची एक जात सिंध, पंजाब, बलुचिस्तान आदी प्रदेशांत आढळते. याचे फळ एका टोकास जाड व दुसऱ्या टोकास निमुळते असून त्यास पंख व दोन बिया असतात. गोखरूचे मूळ बारीक असून चिकट व जास्तीत जास्त लांबी १२ सेंटिमीटर, रंग फिक्कट उदी, चव गोडसर तुरट, किंचित सुगंध असतो. मुळापासून चार ते पाच नाजूक फांद्या निघून त्या जमिनीवर सपाट पसरलेल्या असतात, त्या लोहयुक्त असतात.

गाईच्या पायाला गोखरूचा काटा टोचतो म्हणून गोक्षुर व खुरांचा वेध घेतो म्हणून गोखरू असते नाव पडले आहे. काटे असतात म्हणून कण्ट, फळाची सहा अंगे असतात म्हणून त्यास षडंग, काहींना तीन काटे असतात म्हणून त्रिकण्ट, उसासारखा गोड वास मुळांना येतो म्हणून इक्षुगन्धा, गोखरूचे काटे चवीने गोड म्हणून स्वादुकण्टक, फळे काटेरी असतात म्हणून त्याल कण्टफल असे म्हणतात.

औषधांत प्रामुख्याने फळे व मुळे असतात. चूर्णाकरिता फळे काढय़ासाठी मुळांचा विशेषत्वाने उपयोग केला जातो. संपूर्ण पंचांग ताजे असल्यास त्याचे गुण अधिक असतात. नेहमीच्या वापरासाठी लहान गोखरूचे फळ वापरावे. त्यात शोधन गुण अधिक असतात. बडा गोखरूमध्ये पिच्छिल्ल गुण अधिक आहेत. त्यामुळे त्याचा वापर रसायन, पुष्टिकारक योग, मधुमेह, मूतखडा, प्रदर इत्यादी विकारांत विशेष लाभप्रद आहे. गोखरू, मधुर रस, शीतवीर्य मधुर विपाक, स्निग्ध, गुरू, बल्य गुणाचे आहे. चरकसंहितेप्रमाणे गोखरूचा उपयोग कृमिघ्न, अनुवासनोपग, मूत्रविरेचनीय व शोथहर म्हणून सूत्रस्थान अ. ४ मध्ये सांगितला आहे.

सुश्रुताचार्यानी गोखरूचा उपयोग वाताश्मरीभेदनासाठी सांगून, लघु पंचमुळे, कण्टक पंचमुळे, विदारीगंध व वीरतर्वादि गणांत गोखरूचा समावेश केला आहे. औषधीसंग्रह या पुस्तकात गोखरूचा उपयोग स्नेहन, वेदनास्थापन, मूत्रजनन, संग्राहक व बल्य म्हणून सांगितला आहे. डॉ. वा. ग. देसाई यांच्या मते गोखरू शीतस्वभावी असून मूत्रपिंडास उत्तेजक व मूत्रेन्छियाच्या श्लेष्मल त्वचेवर रोपणकार्य होते. गोखरू मूत्रल असल्यामुळे अनुलोमक आहे. लहान प्रमाणात दिल्यास ग्राही व मोठय़ा प्रमाणावर दिल्यास सारक गुणाचा लाभ होतो. गोखरूच्या बस्तिशोधन या कार्यामुळे तो हृदय आहे. गोखरू वृष्य, गर्भस्थापक, शीतवीर्य असूनही वातपित्तशामक आहे. गोखरूत वेदनास्थापन हा गुण अल्प प्रमाणात आहे.

गोखरू दीर्घकाळ पडून राहिल्यास कीड लागते. असे गोखरू वापरू नये. गोखरूच्या विशेष कार्याचा अनुभव भारतभर खेडोपाडी अडाणी लोकांपासून ते ज्ञानी लोकांपर्यंत सर्वच जण आपापल्या परीने घेत असतात. गोखरूचे शरीरात विविध प्रकारे कार्य चालते. पण प्रामुख्याने चार महत्त्वाचे गुणच शरीरातील विविध स्रोतसांच्या रोगांवर अ‍ॅण्टीबायोटिक्सपेक्षाही व्यापक वाईट स्पेक्ट्रमसारखे काम करताना दिसतात. मूत्रोत्पत्ति, शोथहर, कृमिघ्नता, शीतवीर्य या गुणांमुळे किमान पंचवीस रोग व लक्षणांवर गोखरूचा अनिवार्य वापर आहे.

गोक्षुर: शीतलो बल्यो मधुरो बृंहण: मत:

बस्ति शुद्धि करो वृष्य: पौष्टिकश्च रसायन:।

ताज्या हिरव्यागार गोखरूच्या काटय़ावरून चालण्याचा एक अनोखा अनुभव मी एकदा पुणे – नाशिक रस्त्यावरील एका घाटात आमची बस बंद पडलेली असताना घेतला. कसातरी वेळ काढायचा म्हणून घाटातील माळरानांतील खूप खूप हिरवेगार गोखरू असलेल्या शेतात आनवाणी चाललो. ते कोवळे व हिरवे असल्यामुळे गोखरूचा एकही काटा मला टोचला नाही.

शरीरात सर्वसाधारणपणे मलमूत्राची उत्पत्ती पचकक्रियेनंतर किट्ट निर्मितीतून होत असते, अशी रचनाआहे. पण माझ्या दीर्घकाळच्या अनुभवांत दोन द्रव्ये- गोखरू व लाह्या या एखाद्या विहिरीतील जिवंत झऱ्यासारखी, पाण्यासारखी भरपूर मूत्रोत्पती मूत्रपिंडात तयार करताना दिसतात. त्यामुळे शरीरात कुठेही सूज असली तरी ती सूज लगेच आटोक्यात आणायला गोखरुचा ‘तुरत दान महाकल्याण’ असा उपयोग हातो. आधुनिक वैद्यकातील लॅसिक्स या औषधाचा खूप मोठा वापर आहे, पण त्याचे काही काही काळाने  दुष्परिणाम दिसून येतात. विशेषत: हृदरोगी व मधुमेही रुग्णांची मूत्रपिंडे लवकरच निकामी होताना आढळतात. या अ‍ॅलोपॅथिक औषधाऐवजी गोखरू, गोक्षुरादि गुग्गुळ व रसायन चूर्ण या औषधांची सुयोग्य निवड मूत्रपिंडाला कदापि हानी पोहचू देत नाही.

गोखरू शीतवीर्य असल्याने त्याचा वापर शरीरात कदापि बलक्षय होऊ देत नाही. शरीरातील मृदू अवयवांची हानी होऊ देत नाही. त्याचबरोबर त्याच्या कृमिघ्न या गुणामुळे मूत्रवह स्त्रोतसात मलसंचितीला आणि त्याच्या वाढीला आळा बसतो. आधुनिक भाषेत ज्याला इन्फेक्शन म्हणतात अशा तऱ्हतऱ्हेच्या इन्फेक्शनवर गोखरू फारच परिणामकारक काम करतो. त्यामुळे विविध स्रोतसांचे कार्य शेवटपर्यंत चांगले ठेवण्याकरिता तीन वनस्पती उत्तम काम करतात. आवळकाठी, गोखरू व गुळवेल. यातीन वनस्पतींपासून तयार केलेले रसायन चूर्ण, म्हणूनच कोणाही व्यक्तीला शंभर वर्षांचे निरोगी- निरामय आयुष्य जगण्याला मदत करते. पुनर्नवा ही वनस्पती शोथहर म्हणून सर्वमान्य द्रव्य आहे. पण पुननर्वा शरीरात मूत्रोत्पत्ती करत नाही. त्याच्या मुळांच्या वापराने शरीरातील आपद्रव्य-जलद्रव्य आवाहन केल्यासारखे मूत्रपिंडात येऊन सूज कमी होते. शेवटी शेवटी पुनर्नव्याचा अधिक वापर, नेका ऑप्टिमम गुण द्यायला कमी पडतो, पण गोखरूच्या बाबतीत असे घडत नाही.

मधुमेह विकारात गोक्षुरादि गुग्गुळ तीन गोळय़ा व रसायन चूर्ण एक चमचा बारीक करून घेतल्यास मूत्रपिंडाचे रक्षण होते. मूत्रप्रवृत्ती एकाच वेळेस खळखळून, साफ व फोर्सने व्हावयास मदत होते. मधुमेहात शिलाजित, लोह व अन्य कडू, तुरट, तिखट रसाची द्रव्ये मूत्राचे वेग, उत्पत्तीवर नियंत्रण आणत असतात. अशा वेळी त्या औषधांबरोबर या दोन औषधांचा वापर अनिवार्य आहे. विशेषत: चंद्रप्रभा, आरोग्यवर्धिनी या औषधांबरोबर गोक्षुरादि गग्गुळ व रसायन चूर्ण वापरावे. तो एक ‘सेफ्टी व्हॉल्व’ आहे. याच प्रकारे रक्तदाबवृद्धी विकारात गोक्षुरादि गुग्गुळ व रसायन चूर्ण योजावे. जेथे भरपूर मूत्रोत्पत्ती होऊन वाढता रक्तदाब कमी व्हायला पाहिजे असेल तेथे ही दोन औषधे ‘मस्ट’ आहेत. माझा अनुभव असा आहे की, आरोग्यवर्धिनी व गोक्षुरादि गग्गुळ ही औषधे आयुर्वेदातील ‘जय-विजय’ जोडी आहे. एक औषध यकृत व अन्नवह स्रोतसावर काम करते. दुसरे औषध मूत्रवह स्रोतसाची काळजी घेते. त्याकरिता वाढत्या रक्तदाब विकारात आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि गुग्गुळ व रसायन चूर्ण योजावे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2017 12:51 am

Web Title: zygophylleoe gorukh
Next Stories
1 सतत डोकं दुखतंय.!
2 सूंठ : किती महत्त्वाची?
3 राहा फिट : कृत्रिम अन्नघटकांची आवश्यकता किती?
Just Now!
X