माणसाचे शरीर हे अनेकविध गोष्टींची एकत्र सुसंगत कार्यप्रणाली आहे. विविध अवयव, पेशी, मांसपेशी, हाडे, रक्त, रसायने, अंत:स्राव.. एक ना अनेक! या साऱ्यांचे एकसंध काम सुरू राहणे आवश्यक असते. यासाठी शरीराच्या निरनिराळ्या हालचाली होणे गरजेचे असते. आपल्याला दृश्य स्वरूपात जाणवणाऱ्या हालचाली म्हणजे चालणे, धावणे, हातांनी कामे करणे, जेवणे, मान वळवणे, उठणे, बसणे, वाकणे इत्यादी. यामध्ये प्रमुख सर्व सांधे सहभागी होतात. आपल्या हाडांची टोके ज्या ठिकाणी एकत्रित येतात आणि त्यांना सुरक्षित कवच निर्माण होऊन त्या ठिकाणी हालचाल करणे शक्य होते असा भाग म्हणजे सांधा. खांदा, गुडघे, मनगट, बोटे, मज्जारज्जू, जबडा, छातीच्या फासळ्या इत्यादीचा यामध्ये समावेश होतो. या हाडांच्या टोकांना पातळ आवरण असते, ज्यायोगे हाडे घासली जात नाहीत. तेथे द्रव पदार्थ असतो, ज्यामुळे सांधे सहज हलू शकतात आणि बाहेरील आघात पचवले जातात. मांसपेशी हाडांच्या टोकांना दोरीप्रमाणे असणाऱ्या रचनेने बांधलेल्या असतात. यातील एक किंवा अधिक रचनांना काही कारणांनी दुखापत झाली की सांधेदुखीचा त्रास उद्भवतो. बहुतेक वेळेला चाळिशीच्या आसपास हे दुखणे जाणवू लागते. अनेक स्त्रिया सांधेदुखीने त्रस्त होतात आणि रोजची कामे करणेसुद्धा अवघड होऊन बसते.
सामान्य कारणे आणि उपाय
पातळी १ – विश्रांती महत्त्वाची. ६ आठवडय़ात शक्ती पूर्ववत होते. बर्फाचा शेक करावा. डॉक्टरांनी सांगितलेले व्यायामप्रकार करावेत. फिजिओथेरपिस्टचा सल्ला घ्यावा.
पातळी २ – यामध्ये बहुतेक वेळा ब्रेसेस/ टेपचा आधार दिला जातो आणि सांध्यावरील भार/ ताण कमी केला जातो. बरे होण्यासाठी ६ ते १२ आठवडे लागतात. फिजिओथेरपी आणि योग्य व्यायाम डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे.
पातळी ३ – अशा प्रकारची दुखापत सर्जरीने बरी करता येते. त्यानंतर सांधा पूर्ववत होण्यास ३-४ महिने लागतात. नंतर नियमित व्यायामही करावा लागतो.
* विश्रांती तसेच बर्फाचा शेक द्यावा.
* डॉक्टरांच्या सल्ल्याने सूजनाशक औषधे द्यावीत.
* फिजिओथेरपी सल्ल्यानुसार करावी.
* आहारात काळे मिरे, सुंठ, मूग, शेवग्याच्या शेंगा यांचा वापर अधिक करावा.
* दुधी + मेथीची पाने + तुळशीची पाने यांचे सूप करून प्यावे. वरून मिरपूड घालावी.
* सांध्याची लवचीकता टिकवण्यासाठी सोपे व्यायाम करणे गरजेचे असते. पाण्यात चालणे हादेखील पायांसाठी उत्तम व्यायाम आहे. सांध्यातील द्रव काही वेळा काढावा लागतो.
* हलके मालीश करावे.
* मीठ गरम करून पुरचुंडीत बांधावे आणि शेक करावा.
* शेवग्याची पाने पाण्यात उकळून घ्यावीत. या गरम पाण्यात टॉवेल बुडवून शेक करावा.
* हळद + गरम पाणी रोज दोन वेळा घ्यावे. हल्ली हळदीची कॅप्सूलही मिळते.
* आहारात लसूण अधिक वापरावी.
* सुंठेच्या काढय़ातून एक चमचा एरंडेल तेल रात्री घेता येईल.
वातरक्त (गाऊट) – यात युरिक आम्लाची पातळी वाढलेली असते. सांध्याच्या ठिकाणी लाली असते. गरम स्पर्श जाणवतो. युरिक आम्लाचे स्फटिक अधिक झाल्यास त्याची गाठ सांध्याच्या ठिकाणी जाणवते.
* बेकिंग सोडा अर्धा चमचा पाण्यातून दोन वेळा घ्यावा. यात लिंबू पिळून घ्यावे.
* सुंठ + हळद + गूळ (१:२:८) प्रमाणात मिश्रण करून त्याच्या शेंगदाण्याच्या आकाराच्या गोळ्या कराव्यात. या २ गोळ्या दिवसातून २-३ वेळा खाव्यात.
* अननस खावे. यातील ब्रोमेलेन सूज कमी करण्यास उपयुक्त ठरते.
* क-जीवनसत्त्व (लिंबू, आवळा, संत्रे, मोसंबी, हिरव्या पालेभाज्या इ.) अधिक प्रमाणात घ्यावे.
* युरिक आम्ल कमी करण्यास विशिष्ट औषध घेणे गरजेचे असते.
इतर काही कारणे
* गालगुंड, इन्फ्लूएंझा, कावीळ, हाडांचा जंतुसंसर्ग, डेंग्यू, चिकनगुनिया इत्यादीमध्येही सांधेदुखी असते. त्यात प्रामुख्याने त्या-त्या आजाराचा इलाज करावा लागतो.
* ऑस्टियोपोरोसिसमध्येही सांधेदुखी जाणवते. कॅल्शियम, फॉस्फरस, ‘क’ जीवनसत्त्व, ‘ड’ जीवनसत्त्व याचा उपयोग डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावा. आहारात स्रोत दुग्धजन्य पदार्थ, अंडी, भाज्या, फळे इत्यादी.
* याव्यतिरिक्त मुडदूस, सांध्याचा अतिवापर, मांसपेशींच्या तक्रारी, विषाणूजन्य विकार, हाडांच्या टोकांची होणारी झीज, कमजोरी इत्यादी कारणांनीसुद्धा सांधेदुखीची तक्रार निर्माण होऊ शकते.
* छातीच्या फासळ्या, पाठीचे मणके या सांध्यांचे आजार सांधेदुखीमध्ये समाविष्ट होतात.
महत्त्वाचे
* शक्तीनुसार नियमित चालावे, धावावे आणि इतर व्यायाम करावा.
* मांसपेशीच्या बळकटीसाठी तसेच लवचीकतेसाठी योगासने करावीत. शरीराच्या तौलनिक भारासाठी व्यायाम शिकून घ्यावेत. सायकलिंग करताना हेल्मेट, जेलचे पॅडिंग केलेले मोजे घालावेत. वजन उचलण्याची सवय ठेवावी.
* दुखऱ्या सांध्याला कापूर, मेंथॉल तसेच कॅपसेसीन हे घटक असणारे मलम वापरावे. तात्पुरते बरे वाटते.
* आहारात पुरसे कॅल्शियम, फॉस्फरस, प्रथिने तसेच जीवनसत्त्व ‘क’, जीवनसत्त्व ‘ड’ यांचा वापर करावा.
* डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रक्त, लघवी यांची तपासणी तसेच गरजेनुसार एक्स रे, एम.आर.आय. इत्यादी करून घ्यावे. यामुळे निदान योग्य होण्यास मदत होते आणि त्याप्रमाणे चिकित्सा करता येते. औषधे, मालीश आणि व्यायामाची सांगड उपयुक्त ठरते.
* वेदनाशामक औषधांचा वापर गरजेपुरताच करावा. आपल्याच मनाने कोणतेही औषध सतत घेत राहणे अत्यंत धोक्याचे आहे.
* पट्टे, ब्रेसेस, मोजे इत्यादी साहाय्यक साधने तसेच काठी किंवा वॉकर यांचा आधार घ्यावा.
काही वेळेला सांध्याच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रिया करणेही गरजेचे असते.
डॉ. संजीवनी राजवाडे dr.sanjeevani@gmail.com
