scorecardresearch

मन:शांती : व्यवसोपचार अत्यावश्यक उपाय

व्यवसोपचारासाठी जेव्हा रुग्णाला पाठवले जाते, तेव्हा त्याची आधी संपूर्ण माहिती घेतली जाते.

मन:शांती : व्यवसोपचार अत्यावश्यक उपाय
(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अद्वैत पाध्ये

व्यवसोपचार हा शब्दच जरा वेगळा वाटतो ना? व्यवसायाचे उपचार की व्यवसायासाठी उपचार? आपल्याला भौतिकोपचार (फिजोओथेरपी) माहिती आहे. म्हणजे आपला एखादा अवयव फॅक्चर झाला असेल किंवा अर्धागवायूचा झटका आला असेल तर शरीराचा पीडित भाग/अवयव पुन्हा कार्यरत करण्यासाठी जे उपचार केले जातात, त्याला भौतिकोपचार म्हणतात. त्यासाठी व्यायामप्रकार, विविध यंत्र वा उपकरणे वापरून त्या पीडित अवयवाला कार्यरत केले जाते.

पण जेव्हा मन किंवा मेंदू हा पीडित असतो तेव्हा व्यवसायाचे प्रकार, कामासारखे विविध प्रकार वापरून ते मन, मेंदू पुन्हा कार्यरत करण्यासाठी जे उपचार करतात, त्याला व्यवसोपचार म्हणजेच अ‍ॅक्युपेशनलथेरपी म्हणतात. विशिष्ट प्रकारे त्या व्यक्तीला तपासून मगच अविकसित भागाला विकसित किंवा पीडित भागाला /मनाला पुन्हा कार्यरत होऊन तसेच राहण्यासाठी विविध उपाय योजले जातात. हे वैयक्तिक, छोटा गट किंवा मोठय़ा गट पातळीवर करता येतात.

इ. स. पूर्व १०० मध्ये ग्रीक डॉक्टर अ‍ॅस्लेपियाडेस याने मनोविकाराने ग्रस्त रुग्णांना माणुसकीच्या पातळीवर जाऊन (अन्यथा त्या काळात क्रूर उपचार करायचे) पहिल्यांदा मालिश, व्यायाम संगीत यांचा यशस्वी उपयोग केला. नंतर रोमन डॉक्टर सेल्सस यानेही संगीत, प्रवास, संवाद, व्यायाम यांचा त्याच्या रुग्णांसाठी छान उपयोग केला. परंतु त्या काळात जास्त क्रूर उपचारच दिले जायचे. अठराव्या शतकात डॉ. फिलिप पिनेल यांनी या रुग्णांची साखळदंडातून प्रथम सुटका केली आणि त्यांना कामात गुंतवायला तसेच काही करमणुकीच्या गोष्टीत गुंतवायला सुरुवात केली.

इलिनॉर क्लार्क सिंगेल, ज्यांना व्यवसोपचाराची जननी म्हणून संबोधण्यात येते. त्यांनी ‘नॅशनल सोसायटी फॉर प्रमोशन ऑफ ऑक्युपेशनल थेरपी’ची स्थापना केली. सवयी बदलाचे प्रशिक्षण हा त्याचा गाभा होता. या संस्थेचे १९१७ मध्ये अमेरिकनथेरपी असोसिएशन असे नामकरण झाले. १९२१ मध्ये या उपचारांना ‘ऑक्युपेशनलथेरपी’ असे अधिकृत नाव देण्यात आले. मग नंतर त्याचा अधिकृत शिक्षणक्रम १९३०पर्यंत तयार करण्यात आला तर त्याचे पहिले पाठय़पुस्तक १९४७ मध्ये तयार केले गेले.

या व्यवसोपचारांची तत्त्वे ठरवण्यात अमेरिकेतील मनोविकारतज्ज्ञ डॉ. अ‍ॅडॉल्फ मेयर तसेच विल्यम्स टश डंटन यांचा मोठा सहभाग आहे.

‘‘व्यवसायाचा/कामाचा आपल्या आरोग्यावर, निरोगीपणावर सकारात्मक परिणाम होत असतो. व्यवसायामुळे एक आकृतिबंध आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी तयार होतो आणि वेळेचे नियोजन होते. त्यामुळे वैयक्तिक व सामाजिक, सांस्कृतिकदृष्टय़ा जीवनाला अर्थ प्राप्त होतो, तसेच व्यक्ती म्हणून पण एक विकास होतो,’’ असे त्या दोघांचे म्हणणे होते. त्यासाठी व्यक्ती, त्यांचे कामाचे स्वरूप आणि ज्या वातावरणात काम होते, त्या वातावरणाचे स्वरूप, या तीन गोष्टींचा उपचार सुरू करण्यापूर्वी अभ्यास केला जातो.

हे व्यवसोपचार वैयक्तिक वा गटपातळीवर केले जातात. स्किझोफ्रेनिया, नैराश्य, चिंता, मंत्रचळेपणा, बुलिमिया यांसारखे मनोविकार तसेच स्वमग्नता/ऑटिझम, अध्ययन अक्षमता असे लहान वयातील मेंदूविकासविषयक विकार तसेच वृद्ध वयात स्मृती/ज्ञानभ्रंश (डिमेन्शिया) अशा विकारात या थेरपीचा/उपचारांचा खूप चांगला उपयोग होतो.

व्यवसोपचारासाठी जेव्हा रुग्णाला पाठवले जाते, तेव्हा त्याची आधी संपूर्ण माहिती घेतली जाते. थेरपीच्या दृष्टीने आवश्यक ती तपासणी केली जाते. मग कोणत्या प्रकारची कामे/उपाय वापरावे लागतील, कोणत्या प्रकारची कामे/उपाय वापरावे लागतील, किती काळ करावे लागतील याची चाचपणी केली जाते. कोणती कौशल्ये त्यांच्यात विकसित करावी लागतील याचा हा अंदाज घेतला की मग उपचार सुरू केले जातात आणि मधूनमधून प्रगतीचा आढावा घेतला जातो. त्याप्रमाणे गरज वाटल्यास उपचारात बदल केले जातात आणि योग्य तेवढा परिणाम साध्य झाल्यास उपचार बंद केले जातात.

तरुण वयात आलेल्या स्ट्रोकमुळे एका तरुणाला नैराश्य आले होते. कारण आता तो कामावर जाऊ  शकत नव्हता. त्याच्या बौद्धिक कार्यावर परिणाम तर झालाच होता पण स्वत:च्या दैनंदिन गोष्टीदेखील तो करू शकायचा नाही. त्यामुळे तो अबोल, चिडचिडा झाला होता. अर्थात कुटुंबावर पण तसाच चिंतेचा परिणाम झालाच होता. त्यामुळे त्याला आणि कुटुंबीयांना औषधोपचार, समुपदेशन याबरोबरच त्याला व्यवसोपचार सुरू करण्यात आले आणि एक वर्ष अबोल, चिडचिडा असलेला तो तरुण पुन्हा हसू, बोलू लागला. स्वत:ची काळजी घेऊ  लागला.

स्वमग्न मुले, चंचल मुले, नैराश्य आलेली मुले, अध्ययनक्षम मुले यांच्यात तर व्यवसोपचारामुळे खूपच चांगला फरक पडतो. स्मृतिभ्रंशाच्या सुरुवातीच्या काळात जर व्यवसोपचारांची जोड देण्यात आली तर त्यांच्या बौद्धिक कार्यक्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो.

स्किझोफ्रेनियासारख्या दीर्घकालीन विकारात जर या उपचारांची जोड वैयक्तिक वा गटपातळीवर देण्यात झाली तर त्यांचा जणू पुनर्जन्मच होतो. लहान मुलांना ऑटिझमची शक्यता वाटत असेल तर अगदी तीन वर्षांच्या आधीपण हे उपचार (फक्त) दिले तर विकास चांगल्या पद्धतीने होऊ  शकतो असे आढळून आले आहे. थोडक्यात, प्रतिबंध, उपचार व पुनर्वसन या तीनही पातळ्यावर व्यवसोपचार नितांत उपयुक्त ठरतात.

Adwaitpadhye1972@gmail.com

मराठीतील सर्व लोकआरोग्य ( Lokarogya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या