स्त्रिया आणि कंबर यांचा अगदी अन्योन्य संबंध आहे. सौंदर्याच्या दृष्टीने कंबर जेवढी महत्त्वाची, तेवढेच महत्त्व शरीराच्या आरोग्यासाठीही कमरेला आहे. पूर्ण शरीराचा तोल सांभाळणारी ही रचना आहे. कंबर कसून कामाला लागणे किंवा कंबर वाकणे अशा उक्तींनी आपली बलशक्ती किती आहे याचा अंदाज येतो तर अशी ही कंबर जेव्हा दुखायला लागते तेव्हा तिचे महत्त्व कळते.

कंबर म्हणजे नेमके काय?

MGIMS Wardha Bharti 2024
Wardha Jobs : महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था अंतर्गत चार पदांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख
Mahanirmiti Koradi Bharti 2024
Nagpur Jobs : महानिर्मिती कोराडी येथे १९६ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
South East Central Railway Bharti 2024
SECR Bharti 2024 : १०वी, ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी! रेल्वे अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच अर्ज करा
Like daughter even daughter in law can get job on compassionate basis
मुलीप्रमाणेच सुनेलासुद्धा अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळू शकते…

आपल्या पाठीच्या मणक्याच्या शेवटाकडील भाग- ज्यात पाच मणके आणि पाच त्रिकास्थी (लंबर वर्टीब्रे आणि सॅक्रम वर्टीब्रे) तसेच  त्रिकास्थी आणि मणक्याचे सांधे, तेथील मांसपेशी, स्नायुबंधने, संवेदना पुरवणाऱ्या नसा, ओटीपोटातील अवयव (मूत्रपिंड, गर्भाशय, प्रोस्टेट ग्रंथी इत्यादी) मज्जारज्जू ह्या सर्वाचे एकत्रित गणित म्हणजे आपली कंबर.

कंबरेचे कार्य

शरीराच्या वरील भागाचे वजन सांभाळणे, बसणे-उठणे, उभे राहणे अशा क्रियांना मदत करणे, वाकणे- वळणे अशा क्रिया सहजतेने होण्यास मदत करणे, चालताना नितंबाचा सांधा फिरण्यास मदत करणे, पाठीच्या मणक्यांना आधार देणे, वजन उचलण्याच्या क्रियेत सहभागी होणे, ओटीपोटातील अवयवांचे संरक्षण करणे इत्यादी.

कंबरदुखीची कारणे

बसण्याची चुकीची पद्धत, संगणकासमोर अधिक काळ काम करणे, अयोग्य खुर्ची असणे. मांसपेशी आणि स्नायुबंधने अधिक ताणले गेल्याने होणारी दुखापत, कमरेचा अति आणि चुकीच्या पद्धतीने वापर, कोणत्याही प्रकारच्या आघाताने होणारी दुखापत या सर्व कारणांमुळे होणारी कंबरदुखी ही तीव्र स्वरूपाची असते. हे दुखणे तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ टिकणारे असेल तर त्याला जुनाट कंबरदुखी म्हटले जाते. रुग्णाचा इतिहास जाणून घेणे व अस्थीची परीक्षा करण्यास क्ष-किरण चाचणी करून निदान केले जाते.

उपाय / सूचना

पुरेशी विश्रांती, वेदनाशामक व सूजनाशक औषधे, गरम शेक, पेशी शैथिल्यासाठी मलमे तसेच तीव्र वेदना कमी झाल्यानंतर योग्य व्यायाम करावा आणि फिजिओथेरपी घ्यावी.

*   मीठ गरम करून पुरचुंडीत बांधून शेक करता येतो.

*   डॉक्टरांच्या सल्ल्याने कमरेला साहाय्यक पट्टे वापरता येतात.

नसांचे तडतडणे

कमरेच्या ठिकाणी असणाऱ्या पाठीच्या मणक्यातून बाहेर पडणाऱ्या नसा अनेक कारणांनी दुखावतात. यामुळेही कंबरदुखी उद्भवते.

रेडीक्युलोपथी : दोन मणक्यांमधील उशीच्या बाहेरील कडेच्या भागाला इजा पोचल्याने जेलीसदृश भाग बाहेर पडून नसांना तडतड निर्माण होते. नितंब भागापासून पायापर्यंत वेदना जातात. सहसा एकाच बाजूला वेदना होतात. साध्या हालचालींनीही वेदनांची तीव्रता वाढते. शिंक, खोकला, उचकी यानेही वेदनेची कळ उठते. पायांत मुंग्या येतात व बधिरता जाणवते, लघवीचे नियंत्रण राहात नाही. विद्युत चुंबकीय आलेखाने (इलेक्ट्रोमॅग्नेटिक ग्राफ) निदान करता येते.

*   कडक स्वरूपाच्या अंथरुणाचा वापर केला जातो.

*   पूर्ण विश्रांतीची गरज असते.

*   डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधे व पट्टय़ाचा वापर करावा.

हाडांचे अतिक्रमण

कण्याचे आकुंचन झाल्याने आतील भागावर दाब निर्माण होतो आणि एक मणका दुसऱ्या मणक्यापेक्षा वर/खाली सरकतो. काही वेळा नसा जेथून बाहेर पडतात ते छिद्र अरुंद होते. चालून आल्यावर वेदना होतात आणि विश्रांतीनंतर बरे वाटते. यात सायटिकाचाही त्रास होऊ  शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य तो व्यायाम करावा. काही वेळेला कण्यामध्ये स्टिरॉइडचे इंजेक्शनही  दिले जाते. कोणत्याही उपायाने बरे वाटले नाही की शस्त्रक्रिया करून हाडांची स्थिती पूर्ववत केली जाते.

हाडांची व सांध्यांची परिस्थिती

जन्मजात परिस्थिती- एका पायाची लांबी ही दुसऱ्या पायापेक्षा कमी असते. अशा वेळी शरीर डाव्या/उजव्या बाजूला झुकलेले दिसते. ब्रेसेस दिले जातात अथवा शस्त्रक्रिया करून यावर मात करता येते. काही वेळा मणक्याचा विशिष्ट भाग हा अस्तित्वातच नसतो.

दैनंदिन वापराने होणारी झीज – वय वाढत जाते तसे सांध्यामधील उशीच्या मध्यभागातील पाणी व प्रथिने कमी होतात. उशी पातळ व कमजोर होऊ  लागते. यामुळे दोन मणक्यांमधील जागा कमी होऊन नसांवर दाब येतो. ठरावीक ठिकाणीच वेदना असतात.

*   क्ष-किरण तपासणीने निदान करता येते.

*   विश्रांती, व्यायाम, वेदनाशामक गोळ्या व पट्टे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावे.

*   सांध्यात इंजेक्शनद्वारे पाणीसदृश द्रव भरला जातो.

*   उशीचे आरोग्य व गुबगुबीतपणा वाढवण्यासाठी काही वेळा औषधांचाही उपाय लागू पडतो.

हाडाला किंवा सांध्याला होणारी दुखापत

ही दुखापत सहसा हाड मोडणे (फ्रॅक्चर) या स्वरूपाची असते. नितंब भागाचे हाड किंवा मणक्याचे वा अनेक मणक्यांचे हाड आघातामुळे तुटणे किंवा हीच हाडे ठिसूळ होऊन त्यांना चिरा पडणे / काही भाग तुटणे यामुळे ही कंबरदुखी उद्भवते. कॅल्शियम, ड-जीवनसत्त्व, फॉस्फरस, क-जीवनसत्त्व यांची सततची कमतरता हाडांना ठिसूळ (ऑस्टिओपोरोसिस) बनवते. अधिक काळ स्टिरॉइड घेतल्यावरही हाडे ठिसूळ होतात व तुटू शकतात. वेगवेगळ्या शस्त्रक्रियांनी मणके सांधता येतात.

सांध्याची सूज (आथ्र्रायटिस) 

मणक्यांचे एकमेकांना जोडणारे सांधे, मणका व त्रिकास्थी सांधे तसेच त्रिकास्थी व नितंब भागाचे हाड यांचा सांधा अशा विविध सांध्यांना येणारी सूजदेखील कंबरदुखीसाठी जबाबदार ठरते. सांध्यांचा चुकीचा वापर, अतिवापर किंवा सांध्यांवरील सतत येणारा दाब, सोरायसिस, रीअ‍ॅक्टिव्ह आथ्र्रायटिस, इरिटेबल बॉवेल, अशा अनेक कारणांनी सूज येऊ शकते.

*   प्रामुख्याने सूजनाशक औषधे दिली जातात.

*   गरम शेक करण्याने तात्पुरता फायदा होतो.

इतर काही करणे..

मूत्रपिंडाचे रोग – जंतुसंसर्ग, मूत्रपिंडदाह, मूतखडे, अपघातामुळे मूत्रपिंडाला मार लागून तेथे रक्त साकळणे याचाही कंबरदुखीशी जवळचा संबध असतो. सोनोग्राफी करून निदान पक्के करता येते.

गर्भारपण – गर्भाचे वजन व स्नायुबंध शैथिल्य यांमुळे गर्भारपणात कंबर दुखते.

गर्भाशयाचे आजार , गर्भाशयातील फायब्रॉइड तसेच एंडोमेट्रियोसिस, ओटीपोटातील जंतुसंसर्ग, अपेंडिक्सची सूज, कोलायटिस, कोणताही जीवाणूसंसर्ग तसेच क्षयरोगाचा संसर्ग, नागीण या सर्व व्याधींचा संबंधही कंबरदुखीशी असू शकतो. त्या त्या व्याधीची प्राथमिक चिकित्सा प्राधान्याने करावी लागते.

काही सूचना

* कुशीवर झोपताना दोन गुडघ्यांच्या मध्ये उशी घ्यावी. पोटावर शक्यतो झोपू नये. पाठीवर झोपताना पायांखाली उशी ठेवावी. गादीला खड्डे पडलेले नसावेत.

*   एप्सम सॉल्ट गरम पाण्यात घालावे. त्यात टॉवेल बुडवून कमरेला शेक करावा / बाथटबमध्ये गरम पाण्यात एप्सम सॉल्ट घालून १५-२० मिनिटे पडावे.

* कापूरयुक्त नारळाच्या तेलाने मालिश / लवंगयुक्त तीळ तेलाने मालिश केल्याने पेशींची ताठरता कमी होते.

* बर्फाचा शेक तात्पुरती बधिरता निर्माण करतो व वेदना कमी जाणवतात.

* योगासने शिकून घेऊन करावीत. यामुळे वेदना जाणवण्याचे प्रमाण कमी होते.

* मांडीच्या पाठीमागच्या मांसपेशींवर ताण यईल असा व्यायाम करावा.

*  चांगल्या दर्जाची व पावलांना योग्य अशी पादत्राणे वापरावीत.

* आहारात पुरेशी प्रथिने (डाळी, उसळी) कॅल्शियम (दूध, दही, पालक) क-जीवनसत्त्व (लिंबू, आवळा, टोमॅटो, ताक) यांचा समावेश करावा, तसेच उन्हात ३०-४० मिनिटे वेळ घालवावा. त्यातून ‘ड’ जीवनसत्त्व मिळते.

*  अधिक काळ जाणवणारी कंबरदुखी / तीव्र कंबरदुखी याकडे दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने एक्सरे, एम. आर. आय. या तपासण्या करून निदान जाणून घ्यावे आणि त्याप्रमाणे योग्य ती औषध योजना / शस्त्रक्रिया करावी.

 डॉ. संजीवनी राजवाडे dr.sanjeevani@gmail.com