मन:शांती : घेऊन औषधे, राहू आनंदे!

नैराश्य हा २१व्या शतकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विकार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

स्वामी विवेकानंदांना एकदा एका व्यक्तीने प्रश्न विचारला कि, ‘‘दुनिया में क्या खोना सब से बुरा है?’’ तर स्वामीजींनी तात्काळ उत्तर दिले, ‘‘वो आशा ही खोना जिससे हमे लगता है कि हम कुछ कर सकते है!’’ म्हणजेच निराशा ही खूप मोठी नुकसान करणारी गोष्ट आहे हे नक्की!

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे नैराश्य हा २१व्या शतकातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा विकार आहे. भारतात आज नैराश्याचे प्रमाण जवळजवळ ३६ टक्के आहे. त्यामुळे नैराश्याच्या विकाराचा आणि उपचारांचा आपण गांभीर्याने विचार करणे खूप गरजेचे आहे. या विकारात झोप न येणे, भूक न लागणे, उदास वाटणे, कशात उत्साह न वाटणे, या सर्वामुळे कामावर न जाणे, काम नीट न होणे आदी लक्षणांमुळे व्यक्तीच्या पर्यायाने देशाच्या कार्यशक्तीवर परिणाम होत असतो. काही वेळा आत्महत्येचेही विचार येतात/ आत्महत्या केली जाते यामुळे समाजस्वास्थ्यही बिघडते.

अनेक वर्षांपूर्वी हिप्पोक्रोटसने नैराश्याचे वर्णन मेलानकोलिया असे केले होते. शरीरात ब्लॅक बाईलचे प्रमाण वाढल्याने हा विकार होतो, असे त्याचे म्हणणे होते. म्हणजे शरीरातील कोणत्यातरी रासायनिक असंतुलनाचे त्याने सूतोवाचच केले होते. बरोबर ६० वर्षांपूर्वी बनी आणि डेव्हिस या शास्त्रज्ञांनी नैराश्याचा विकार हा मेंदूतील सिरोटोनिन, डोपामिन आणि नॉर एप्रिनेफिन या जीवरासायनिक संप्रेरकांच्या कमतरतेमुळे होतो, असे सर्वप्रथम सांगितले. त्यानंतर क्षयाच्या उपचारावरील आयसोनायझाईड या औषधावर संशोधन चालू असताना इप्रोनायझा डे या औषधाची १९५८ साली पहिल्यांदा निर्मिती झाली आणि संप्रेरकांचे प्रमाण वाढवणारे हे औषध नैराश्यावरील उपचारांचा मैलाचा दगड ठरले.

त्याच वेळी क्लोरप्रोमॅझिन या स्किझोफ्रेनियावरील औषधावरूनच पुढे त्याच विकारावर आणखीन दुसरे औषध शोधण्याचा प्रयत्न चालू असताना, इमिप्रामिनचा शोध लागला. डॉ. रॉलॅड कुन यांनी स्किझोफ्रेनियाच्या रुग्णातील नैराश्यासाठी त्याचा उपयोग केला आणि त्याला चांगले यश मिळाले, त्यांना पुन्हा उर्जितावस्था आली, ते संवाद साधू लागले आणि त्यांचा थकवा कमी झाला, असे डॉ. कुन यांनी नमूद केले. इमिप्रामिन हे आता ट्रायसायक्लिक वर्गातील औषध मानले जाते. त्याच वर्गात पुढे झप्रिटीप्टीलिन, नॉरट्रीप्टीलिन, क्लोमिप्रामिन वगैरे औषधे आली. या औषधांचा इतर रिसेप्टर्स हिस्टीमिनवर ही परिणाम होतो. त्यामुळे या औषधांचे चक्कर, झोप येणे, स्मरणशक्तीवर परिणाम होणे, बद्धकोष्ठ होणे, लघवी तुंबणे वगैरे दुष्परिणाम दिसतात. परंतु तरीही ही औषधे नैराश्याच्या लक्षणांवर खूपच छान परिणाम करतात.

त्यानंतर मग सिरोटोनिनचे प्रमाण वाढवणारी सिरोटोनिनचे मेंदूच्या पेशीमध्ये होणारे शोषण रोखणाऱ्या आणि त्याच्या रिसेप्टर्सची कार्यक्षमता वाढवणाऱ्या औषधांची निर्मिती झाली. १९७४ मध्ये फ्लुओक्सेटीन हे औषध नैराश्याच्या लक्षणांवर चांगला परिणाम करणारे औषध आढळून आले. विशेषकरून आत्महत्येचे विचार रोखायला त्याची परिणामकारकता आढळून आली. नंतर त्या वर्गात सरट्रॅलिन, फ्लुऑक्सामिन, पॅरोक्सेरी अशी अनेक औषधे आली. त्यानंतर आलेल्या एससिटॅलोप्राम या वर्गातील औषधांनी परिणामांसाठी लागणारा काळ कमी केला. त्यामुळे ते जास्त वापरले जाऊ  लागले.

त्यानंतर याच तीन संप्रेरकांपैकी कोणत्याही दोन संप्रेरकांवर संयुक्तपणे परिणाम करणारी मिटीझेपिन, ट्रॅझ्ॉड्रोन, डय़ुलॉक्सेटीन अशी अनेक औषधे आज नैराश्यावर उपचार करण्यासाठी उपलब्ध आहेत. या औषधांचे पण काही दुष्परिणाम दिसतात. ते तात्पुरते किंवा उपचाराच्या सुरुवातीच्या काळात जास्त दिसतात. पण नंतर कमी वा बंद होतात.

औषध हे आपल्या भल्यासाठी असते. ते परिणामकारक असते म्हणून उपचारासाठी उपलब्ध असते. अनेकदा अनेकजणांना नैराश्य आलेले मान्य असते पण उपचारांची गरज लक्षात येत नाही. कित्येकदा रुग्ण म्हणतात, मला अजिबात झोप येत नव्हती, कामात लक्ष लागत नव्हते, उत्साह वाटत नव्हता, भूक लागत नव्हती खूप नकारात्मक विचार यायचे पण वाटायचे होईल आपोआप कमी, कशाला घ्यायचे औषध? पण खरी गोष्ट अशी असते काही वेळा काही लक्षणे थोडी कमी होतातही पण ती तात्पुरती असू शकतात नंतर पुन्हा उसळून डोके वर काढू शकतात व आपल्या क्षमतेवर जास्त वाईट परिणाम करू शकतात. ताप आला की आपण लगेच औषध घेतले की लवकर बरे वाटते. तसेच नैराश्यामुळे शारीरिकच नाही तर मानसिक थकवा पण येतो; जो व्यक्तीला जास्त गलितगात्र करू शकतो जास्त काळासाठी! पण त्यावरदेखील लवकर व डॉक्टर सांगतील तितका काळ उपचार घेतले तर या विकारातून आपण लवकर बरे होऊ  शकतो!

-डॉ. अद्वैत पाध्ये -Adwaitpadhye1972@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Depression and its treatment