scorecardresearch

लहान मुलांमधील ताप

लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो.

लहान मुलांमधील ताप

|| डॉ. दीपा दिनेश जोशी

लहान मुलांमधील ताप काळजी करायला लावणारा असतो. परंतु अंगाला हात लावून जाणवत जरी असला तरी प्रत्यक्षपणे थर्मामीटरवर मोजणे गरजेचे आहे. हल्ली तर इलेक्ट्रॉनिक थर्मामीटरवर प्रत्यक्षात ताप अंकामध्ये दिसत असल्याने ताप मोजणे सोपे झाले आहे आहे. मुलाला ताप असेल तर डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी ताप किती वाजता व किती आला होता, कोणते औषध दिले, ताप किती वेळात उतरला या सर्व गाष्टींची नोंद एका कागदावर करून ठेवावी. जेणेकरून डॉक्टरांनाही उपचार करणे सोपे होते. ताप मोजण्यापूर्वी थर्मामीटरचा पारा ९८ अंश एफच्या खाली उतरवा. काखेत ताप मोजण्यापूर्वी तो भाग घामविरहित पुसून ठेवा.

तापात घरी काय काळजी घ्यावी?

बऱ्याचदा तापामध्ये विश्रांती पुरेशी असते. जर बाळ तापात पण हसत-खेळत असेल, व्यवस्थित खात-पीत असेल, ताप उतरल्यावर उत्तमपणे खेळत असेल तर हा गंभीर आजार नाही. अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाला पॅरासिटामॉल देण्यास हरकत नाही. तापात बाळ मलूल असेल, उलटी करत असेल, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असेल तर ताप गंभीर आजारामुळे असू शकतो.

ताप कमी करण्यासाठी..

 • खुल्या हवेचा वापर
 • शरीरावरील कपडे ढिले करून मोकळे करावेत.
 • शरीर ओल्या कपडय़ाने पुसून काढावेत.
 • डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तापाचे औषध द्यावीत.

हे करू नका

 • बाळाला स्वेटर, चादर, रगमध्ये गुंडाळू नये.
 • नळाखाली थंड पाण्याचे आंघोळ घालू नये
 • बर्फ घातलेल्या पाण्याने अंग पुसू नका बाळाला ताप कमी होण्यासाठी पॅरासिट२मॉल हेच औषध तापामध्ये देणे योग्य आहे. या औषधाचे सर्वात कमी दुष्परिणाम आहेत. ताप पूर्णपणे कमी येण्यापेक्षा आजारावर नेमके काम करणाऱ्या औषधांची यामध्ये आवश्यकता असते. पूर्णपणे ताप कमी करणेही योग्य नसते. पॅरासिटॅमॉल हे चार ते सहा तासच काम करत असल्याने बाळाचा आजार खरेच कमी होतो का नाही ते समजते. समजा पहिल्या दोन दिवसांत औषध चार वेळा द्यावे लागले. तिसऱ्या दिवशी २ ते ३ वेळा, चौथ्या दिवशी एक ते दोन वेळा औषध दिले म्हणजे बाळाचा आजार कमी होत चालला आहे. विषाणूजन्य आजार सर्वसाधारणपणे तीन ते चार दिवसांत बरे होतात.

तापाची नोंद ठेवता का?

बरेचसे पालक नुसते अंग कोमट लागते, डोकं जरासे गरम लागते, असे म्हणून तापाचे औषध देतात. परंतु बाळाला खरेच ताप आहे का याची खात्री करणे गरजेचे आहे. ताप मोजून त्याची नोंद करा, ताप किती तासांनी येतो, किती वेळात उतरतो, तापाबरोबर थंडी वाजून येते का, या सर्व गोष्टींची नोंद डॉक्टरांकडे जाताना जरूर घेऊन जा. यामुळे तुमचा व डॉक्टरांचा वेळ वाचेल आणि आजाराचे निदान करणे सोपे होईल.

तापामध्ये डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा?

 • तीन महिन्यांखालील बाळाला ताप असेल आणि जरी बाळ खेळत असेल तरी बाळाला गंभीर आजार असू शकतो. त्यामुळे त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
 • तापात लघवीचे प्रमाण कमी होत असेल तर
 • बाळ ग्लानीमध्ये असेल तर
 • सात दिवसांहून अधिक सातत्याने ताप येत असेल तर
 • बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असेल तर
 • बाळाला तापाबरोबर अंगावर पुरळ-चट्टे उठले असतील.
 • तीव्र डोकेदुखी, मानदुखी
 • झटके येत असतील.
 • अशक्तपणामुळे चालता येत नाही.
 • या सर्व गोष्टींमध्ये डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेतला पाहिजे. ताप आल्यावर केवळ तापाला औषध देण्याव्यतिरिक्त इतर गंभीर लक्षणांकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.
 • मुलाला ताप आल्यानंतर घाबरून न जाता त्याच्या हालचालीवर, खेळण्यावर, खाण्यापिण्यावर, लघवीवर लक्ष ठेवावे.

तापाची कारणे

 • जिवाणू, विषाणू, जंतू प्रादुर्भाव
 • सर्दी, खोकला, फ्लूसारखे श्वसनसंस्थाचे आजार
 • लघवीतील जंतुसंसर्ग
 • न्यूमोनिआ, मेंदूज्वर, क्षय,
 • लसीकरणानंतर एक ते दोन दिवस येणारा ताप

drdeepadjoshi@gmail.com

मराठीतील सर्व लोकआरोग्य ( Lokarogya ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या