भारतातील तरुणांमध्ये सध्या पक्षाघात हा आजार वाढत आहे. लठ्ठपणा, मधुमेह, अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान ही त्याची प्रमुख कारणे आहेत. याशिवाय ताणतणावाची जीवनशैलीही पक्षाघातासाठी कारणीभूत ठरू शकते. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात पक्षाघात होणाऱ्यांपैकी २० टक्के रुग्ण चाळिशीखालील वयाचे आहेत. हा आजार झालेल्या रुग्णांपैकी ३० टक्के रुग्णांचा मृत्यू होतो, तर ३० टक्के नागरिकांना अपंगत्व येते.

मानवी शरीरात एकाच वेळी एक किंवा अनेक स्नायू कार्य करत नसतील तर अशा स्थितीला पक्षाघात म्हणतात. यात शरीरातील स्नायू लुळे होतात. मेंदूला इजा झाल्यास पक्षाघात होतो. या स्थितीत संवेदी चेतांनाही धक्का पोहोचला तर बाधित भागातील संवेदनाही नाहीशा होतात. बदलत्या जीवनशैलीसह वाईट सवयींमुळे सध्या देशात तरुणांमध्ये पक्षाघाताचे प्रमाण वाढत आहे. मेंदूतील चेतापेशींना ऑक्सिजन आणि ग्लुकोजचा नियमित पुरवठा होणे आवश्यक असते. काही कारणाने रक्तपुरवठा थांबला तर चेतापेशींचे कार्य थांबते. अशा चेतापेशी ज्या अवयवाचे किंवा स्नायूंचे नियंत्रण करतात, त्या अवयवांच्या हालचालींवर परिणाम होतो आणि पक्षाघात होतो. काही वेळा अचानक रक्तदाब वाढल्यास मेंदूमधील रक्तधमनीत गळती होऊन अंतर्गत रक्तस्राव होतो. त्यामुळे चेतापेशींवरील दाब वाढून पक्षाघात होतो. मज्जारज्जू आणि मेंदू यांना जोडणाऱ्या भागामध्ये रक्तस्राव झाल्यास पक्षाघाताबरोबर मृत्यूही ओढवतो.

हा आजार सध्या भारतातील तरुणांमध्ये वाढत आहे. लठ्ठपणा, मधुमेह, अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान हे त्याला प्रमुख कारण आहे. याशिवाय ताणतणावाची जीवनशैलीही पक्षाघातासाठी कारणीभूत ठरू शकते. कामाच्या वेळा, आहार व आरामाकडे झालेले दुर्लक्ष, अपुरी झोप यामुळे तरुणांमध्ये पक्षाघातासारखे आजार वाढीस लागत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार भारतात पक्षाघात होणाऱ्यांपैकी सुमारे २० टक्के रुग्ण हे चाळिशीखालील वयाचे असतात. गावखेडय़ात राहणाऱ्या लोकांच्या तुलनेत शहरातील लोकांमध्ये, महिलांमध्ये पक्षाघाताचा धोका अधिक आहे. या आजारामुळे ३० टक्के नागरिकांचा मृत्यू होतो. तर ३० टक्के नागरिकांना अपंगत्व येते.

पहिल्या चार तासांत औषधोपचार फायद्याचा

पक्षाघाताचा झटका आल्यावर पहिले तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात मेंदूमधील गाठ विरघळण्यासाठी योग्य औषधोपचार केल्यास बहुतांश रुग्णांमधील मेंदूचे कार्य २४ तासांत सुरळीत होऊ  शकते. मात्र त्यासाठी रुग्णाला पक्षाघाताचा झटका आला आहे किंवा मेंदूच्या कोणत्या भागात समस्या उद्भवली आहे ते पाहावे लागते. रुग्णाचे सीटी स्कॅन आणि रक्त तपासण्या केल्यावर त्याच्यावरील उपायांची दिशा निश्चित केली जाते. या काळात उपचार करण्यात आले नाहीत तर मात्र पक्षाघातामुळे शरीराचा लुळा पडलेला भाग योग्य पद्धतीने काम करण्यासाठी चार ते सहा महिनेही लागतात व त्यानंतरही मेंदू पूर्ण क्षमतेने काम करण्याची शक्यता कमी असते.

मेंदूला इजा झाल्यास पक्षाघाताची लक्षणे

मेंदूचे शरीराच्या विविध भागांवर नियंत्रण असते. मेंदूमधील कोणत्या भागात इजा किंवा गाठ  झाली त्यावर या व्यक्तीला पक्षाघातामुळे होणारी लक्षणे अवलंबून असतात. पक्षाघातामुळे या व्यक्तीची हालचाल, संवादातील समन्वय, शरीराअंतर्गत अवयवातील समन्वय आदींपैकी एक किंवा अनेक क्रियांवर परिणाम होऊ  शकतो. काही वेळा हातपाय लुळे पडणे, बोलताना जीभ अडखळणे, तोल जाणे, चेहऱ्याला वाक येणे आदी अशी लक्षणे दिसू शकतात.

पक्षाघात टाळण्यासाठी..

उच्च रक्तदाब, धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, तंबाखूचे व्यसन, व्यायामाचा अभाव यामुळे पक्षाघात होऊ शकतो. हा होतो. रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवून या वाईट सवयी सुधारल्यास धोका टळू शकतो.

– डॉ. चंद्रशेखर मेश्राम,  मेंदूरोगतज्ज्ञ, नागपूर</p>

(शब्दांकन- महेश बोकडे)