|| अर्चना रायरीकर, आहारतज्ज्ञ
हिवाळ्यातल्या गुलाबी थंडीत दमछाक होत नाही, खूप घाम येत नाही. त्यामुळे मग दिवसभर ताजेतवाने वाटते. एकीकडे वातावरणात बदल होत असतानाच दुसरीकडे शरीरातही अनेक बदल घडत असतात. त्वचा आणि केस कोरडे होणे, जास्त भूक लागणे, कमी तहान लागणे आदी बदल होतात.




हिवाळ्यात अन्नपचन लवकर होत असते. त्यामुळे भूकही अधिक वेळा लागते. जसा हा ऋतू व्यायामाला उत्तम, तसाच तो पचनासाठी पण उत्तम. पण ज्यांचे वजन वाढत चालले आहे, त्यांनी मात्र सांभाळून! हवेतील बदलामुळे काहींना सर्दी, ताप, खोकला आदी संसर्ग होण्याची भीती असते आणि त्यामुळे या दिवसांत आपली प्रतिकारशक्ती चांगली राहण्याची गरज असते.
त्वचा आणि केस कोरडे पडत असल्यावर जसे बाहेरील शरीरावर उपाय केले जातात, त्याचप्रमाणे आंतरशरीराचीही योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. या दिवसात मुख्य म्हणजे पाणी कमी प्यायले जाते. पाणी कसे आवर्जून प्यायले जाईल, याची काळजी घ्यायला हवी. थंड पाण्याऐवजी साधे पाणी, गरम किंवा कोमट पाणी, सूप, ग्रीन टी असे शरीराला गरमपणा देणारे पदार्थ आहारात घ्यावेत. त्वचा कोरडी पडू नये म्हणून आहारात योग्य प्रमाणात तेल, तूप, लोणीचा समावेश असावा. आवश्यक चरबीयुक्त पदार्थही शरीरात जाणे गरजेचे आहे. तेलासोबतच खोबरे, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या, सूर्यफुलाच्या बिया याचाही आहारात समावेश करावा. त्वचा आणि केसाचा कोरडेपणा घालवण्यासाठी तेलाप्रमाणेच जीवनसत्त्व ई, ओमेगा, झिंक, सेलेनियम हेही आवश्यक असतात.
या दिवसात आवळा भरपूर प्रमाणात मिळत असतो. आवळ्यात जीवनसत्व सी असते, ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते, पचन चांगले होते आणि केस आणि डोळेही चांगले राहतात. घरी केलेला ताजा आवळारस अतिशय उत्तम! या दिवसात घरी आवळा किसून त्याची सुपारी किंवा सेंद्रिय गूळ वापरून त्याचा मोरावळा तयार करू ठेवता येऊ शकतो. या दिवसात अनेक ताज्या भाज्या, फळे येतात. संत्री, मोसंबी, गाजर आणि इतर फळे, पालेभाज्या यातदेखील अधिक प्रमाणात जीवनसत्त्व सी आणि अ असते. हे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. साखरेपेक्षा जर उत्तम आणि शुद्ध मध मिळाला तर वापरायला हरकत नाही, कारण त्यानेही प्रतिकारशक्ती वाढते.
हिवाळ्यात आहारामध्ये कोणत्या बाबी खाऊ नयेत असे पदार्थ फार कमी आहेत. त्यामुळे समतोल आहार हाच उत्तम आहार. मात्र ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी हा नियम लागू होत नाही. आहार आणि व्यायाम यांचा योग्य मेळ साधल्यास वजन कमी करणेही शक्य आहे. या दिवसांत खूप भूक लागते म्हणून जंक किंवा फास्ट फूडवर भर न देता घरी तयार केलेले पदार्थ पोटभर खावेत. वजन वाढवण्याची इच्छा असलेल्यांसाठी हा उत्तम काळ आहे. या काळात हरभरे, हुरडा, हिरवे वाटाणे, लालबुंद गाजर, स्ट्रॉबेरी, तुती अशा अनेक रंगीबेरंगी डोळ्यांना सुखावणाऱ्या नैसर्गिक पदार्थाची बाजारात रेलचेल दिसते. तेव्हा यातील अधिकाधिक पदार्थाचा आहारात समावेश करावा.