काळजी केसांची!

कांद्याचा रस काढून केसांना लावावा. केसांची मुळे पुनर्जीवित होऊन नवे केस येण्यास मदत होते.

प्रतिनिधिक छायाचित्र

स्त्री, सौंदर्य आणि केस या अगदी आपल्या जिव्हाळ्याच्या गोष्टी आहेत. केसांची काळजी घेणे हे लहानपणी आई करते आणि नंतर मोठेपणी अनेक कारणांनी त्याकडे दुर्लक्ष होते आणि मग अचानक कधीतरी जाणवते .. केस गळत आहेत, पिकताहेत, रुक्ष झालेत इत्यादी.

विशेषत: चाळिशीच्या आसपास अशा तक्रारी अधिक प्रमाणात जाणवू लागतात. स्त्रियांवरील कुटुंबाची जबाबदारी, करिअर, प्रवास, मानसिक ताणतणाव, प्रदूषण, जंकफूड अशा वातावरणात तिचे स्वत:कडे झालेले दुर्लक्ष केसांच्या समस्यांच्या स्वरूपात समोर उभे राहते. मग प्रश्न पडतो, हे थांबवता येईल का? होय. आपण त्याची कारणे जाणून घेतली, योग्य उपचार योग्य वेळी करून घेतले व खबरदारी घेत राहिलो तर या केसांच्या तक्रारीवर आपण मात करू शकतो.

तक्रारी आणि त्यासाठी घेण्याची काळजी

केसांच्या तक्रारी

केस गळणे, अकाली केस पांढरे होणे, केस रुक्ष व राठ होणे, केसांमध्ये गुंता होत राहणे, केस चिकट होणे, केसांची टोके दुभंगणे, केसांचा चमकदारपणा कमी होणे, केस निर्जिव आहेत असे वाटणे, केस लालसर होणे, केसांमध्ये कोंडा होणे, उवा-लिखांचा संसर्ग होणे, केस विरळ होणे इत्यादी.

चुकीचा आहार

चौरस आहाराचा अभाव, जंकफूडचे आकर्षण, धावपळीची जीवनशैली यामुळे जीवनसत्त्वे, मूलद्रव्ये व प्रथिनांची कमतरता निर्माण होते आणि केसांना पुरेसे पोषण न मिळाल्याने तक्रारींची सुरुवात होते. त्यासाठी आहारामध्ये शेंगावर्गीय भाज्या, फळे, दूध, दही, ताक, हिरव्या पालेभाज्या, मोडाची धान्ये, मका इत्यादी अधिक प्रमाणात घ्यावे. यातून केसांना आवश्यक असलेली जीवनसत्त्वे (बी-३, बी-५, बी-९, बी-१२, क व ई जीवनसत्त्व ), लोह, प्रथिने व कॅल्शियम पुरेशा प्रमाणात मिळू शकतात. जीवनसत्त्वांच्या / लोह- कॅल्शियमच्या गोळ्या व इंजेक्शनेही घेता येतात.

* कांद्याचा रस काढून केसांना लावावा. केसांची मुळे पुनर्जीवित होऊन नवे केस येण्यास मदत होते.

* तीळ + दाणे + सुके खोबरे + कढीपत्ता सम प्रमाणात एकत्र करून चटणी करावी आणि जेवणात घ्यावी. केसातील पुरेसे रंगद्रव्य निर्माण होण्यास यामुळे चालना मिळते आणि अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.

* खजूर भिजवून, वाटून- गूळ, मीठ व जिरे घालून केलेली चटणी रोज आहारात घ्यावी.

प्रदूषण आणि तीव्र सूर्यप्रकाश

वातावरणातील घातक वायू व धूळ केसांना हानीकारक ठरते. उघडय़ा जागी कामे लागणे वा कामासाठी अधिक काळ प्रवास करावा लागणे या दोन्ही प्रसंगी प्रदूषणाचा केसांशी अधिक संपर्क येतो. सूर्याची अतिनील किरणे (वश् फं८२) यांनीसुद्धा केस कोरडे व निष्प्राण होतात. गुंता अधिक होतो, केस लवकर पांढरे होतात. अशा वेळी केसांना ओलावा आणि स्निग्धता आवश्यक असते.

* साजूक तूप, लाल भोपळा, पपई, बटाटा, शेंगदाणे, बदाम, अंडी इत्यादीचा अधिक प्रमाणात आहारात समावेश करावा.

* खोबरेल तेल ४ चमचे + ई जीवनसत्त्वाचे तेल (बाजारात मिळते) १ चमचा एकत्र करून रात्री केसांना लावावे आणि मुळांना मालिश करावे, सकाळी केस धुवावे. ओल्या केसांनी बाहेर फिरू नये. धूळ केसांना चिकटते.

* आवळा पावडर + मेंदी पावडर सम प्रमाणात एकत्र पाण्यात कालवून वरून केसांना अर्धा तास लावून ठेवावी.

* कोरफडीच्या गरात लिंबाचा रस घालून केसांना लावावा.

* केळीच्या गरात मध घालून केसांना लावावे.

* दही + अंडय़ाचा पांढरा बलक हा केसांना लावावा.

आजारपण व आघात

कोणत्याही आजारात कमी झालेली प्रतिकारशक्ती, आहारमूल्यांची कमतरता, औषधांचे दुष्परिणाम यांचा दुरान्वये केसांवर वाईट परिमाण होतो. थायरॉईड, मधुमेह, अ‍ॅनिमिया, डेंग्यू, विषमज्वर इ. आजारांची औषधे नियमित तर घ्यावीच, पण जोडीला आहारात जीवनसत्त्व ‘ब’, ‘क’ आणि ‘ई’युक्त पदार्थ (लिंबूवर्गीय फळे, शेंगावर्गीय भाज्या, तीळ, दुग्धजन्य पदार्थ, शहाळे इत्यादी) अधिक प्रमाणात घ्यावेत.

रसायनाचा अतिरेक

शांपू, कंडिशनर, केसांचा रंग, केसांची रचना, करण्यासाठी वापरलेली जेल इत्यादी रसायने यांच्या अतिरिक्त वापराने केस कोरडे होतात. डोक्यावरील त्वचासुद्धा आजारी पडते. केसांची मुळे नष्ट होतात. केस पातळ होऊन टक्कल लवकर पडू शकते. या रसायनांची अ‍ॅलर्जीही निर्माण होऊ  शकते. केस लवकर पिकतात.

* स्विमिंग पूलमध्ये जाताना केसांना तेल लावून मग त्यावर टोपी घालावी. रासायनिक रंगानंतर एकदा मेंदी लावावी.

* तीळ तेल + खोबरेल तेल + बदाम तेल सम प्रमाणात एकत्र करून नियमित मालिश करावी.

* १०-१२ दिवसांतून एकदा केसांना लिंबाचा रस चोळावा.

* आहारात अ‍ॅण्टी ऑक्सिडंट पदार्थ (हिरव्या भाज्या, रंगीत फळे आणि प्रथिनेयुक्त पदार्थ, डाळी, उसळी, दूध, दही वगैरे) वापरावे.

स्वच्छता

केस वेळेवर स्वच्छ न धुतल्यास त्यात अडकणारा घाम, धूळ यांमुळे केसांची रंध्रे मोकळी न राहता बंद होतात आणि केस चिकट होऊन केसात कोंडा होतो. चमक कमी होते. केसात गाठी होतात, खाज येते.

* शिकेकाई / सौम्य शांपूने केस आठवडय़ात १-२ वेळा धुवावे.

* कोरडय़ा / गुंतणाऱ्या केसांसाठी कंडिशनर आणि केसांचे सिरम लावता येईल.

* आठवडय़ातून १-२ वेळा रात्री झोपताना तेलाने मालिश करावे.

* उवा आणि कोंडा झालेल्या व्यक्तीचे कपडे / उशी / कंगवा इत्यादी वापरू नये.

मानसिक ताणतणाव

* मनावरील होणाऱ्या आघातांमुळे शरीरात निर्माण होणाऱ्या रसायनांनीही केसांवर परिणाम होऊ  शकतो.

* योग साधना करावी

* दीर्घ श्वसन करावे.

* राग आणि चिडचिड यावर ताबा मिळवावा.

रक्तस्राव

चाळिशीच्या पुढे शरीरातील मासिक पाळीच्या संदर्भात काही बदल घडून येतात. हार्मोन्सची पातळी बदलल्याने केसांची तक्रार उद्भवते. डॉक्टरांकडून तपासणी करून घेऊन मगच उपचार करावेत.

* कॅल्शियम, लोह आणि प्रथिनांचा आहारात पुरेशा प्रमाणात समावेश करावा.

* रोज थोडा तरी व्यायाम करणे अत्यावश्यक आहे.

अपुरी झोप

झोप पुरेशी न मिळाल्यास मेंदूला आणि शरीराला विश्रांती मिळत नाही. त्यामुळे अन्नपचन, चयापचय आणि शोषण या क्रिया व्यवस्थित होत नाहीत. परिणामस्वरूपी पोषणमूल्यांची कमतरता निर्माण होते आणि केसांच्या तक्रारी उद्भवतात.

जंतू किंवा बुरशी संसर्ग

* यामुळे उवा / लिखा होतात, कोंडा होतो, केस गळतात आणि केसांचा पोत खराब होतो.

* मेथीचे दाणे वाटून पेस्ट करावी. त्यात लिंबूरस घालून केसांना अर्धा तास लावून ठेवावे. – कोंडा कमी होतो व त्वचेला आराम मिळतो.

* सीताफळांच्या बियांचे चूर्ण पाण्यात पेस्ट करून लावावे. उवा व लिखांचा नाश होतो. अन्यथा डॉक्टरांच्या सल्ल्याने इतर औषधांचा उपयोग करता येईल.

* आपली तिशी-चाळिशी उलटण्याआधीच स्त्रियांनी केसांकडे लक्ष पुरविले पाहिजे. ही काळजी कायमस्वरूपी घेणे गरजेचे आहे. रोज नुसती पोळी-भाजी न घेता डाळी-उसळी-कोशिंबिरी-ताक-चटणी याची जोड द्यावी.

 डॉ. संजीवनी राजवाडे – dr.sanjeevani@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: How to maintain healthy hair