वर्तनोपचार

पाव्हलॉव्ह या शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला.

|| अद्वैत पाध्ये

पाव्हलॉव्ह या शास्त्रज्ञाने एक प्रयोग केला. त्याने एका कुत्र्याला पिंजऱ्यात बंद केले आणि फक्त भूक लागल्यावर भाकरी द्यायला सुरुवात केली, नंतर काही दिवसांनी भाकरी देतेवेळी तो घंटा वाजवू लागला. सुरुवातीला भूक लागली की कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटायची. नंतर पाव्हलॉव्हने गंमत केली, त्याने फक्त घंटा वाजवली पण भाकरी दिली नाही, तरीही घंटेच्या आवाजानेच कुत्र्याच्या तोंडाला लाळ सुटल्याचे त्याला आढळून आले. म्हणजेच घंटा वाजली की भाकरी मिळणार हे समीकरण हळूहळू कुत्र्याच्या मेंदूत एवढे घट्ट बसले की फक्त घंटेच्या आवाजानेच त्याला भूकेची संवेदना होऊ  लागली आणि तोंडाला लाळ सुटू लागली. म्हणजे ज्या गोष्टीमुळे खरी संवेदना व्हायची आणि परिणाम लाळ सुटण्यात झाला. मूळ गोष्ट आणि तटस्थ गोष्ट (घंटा) एकत्र दिल्यावर, तोच परिणाम नंतर फक्त तटस्थ गोष्टीमुळे पण होऊ  लागला. म्हणजे मूळ गोष्टीच्या बरोबरीने होणाऱ्या तटस्थ गोष्टीशी मेंदू परिणामाची जोडणी होत होती. लहानपणापासून आपल्या मेंदूला अशा पद्धतीने कळत नकळत आपण प्रशिक्षित करतो वा तो होत असतो. उदा. जेव्हा एखाद्या लहान मुलाला त्याचे बालरोगतज्ज्ञ इंजेक्शन देतात तेव्हा ते रडते. नंतर पुन्हा साधे तपासायला आत नेले तरी ते रडू लागते, म्हणजे डॉक्टर/त्यांचे केबिन आणि इंजेक्शन हे समीकरण डोक्यात घट्ट बसते. इंजेक्शन नंतरच्या रडण्याचा परिणाम, नुसत्या खोलीत जाण्याने वा डॉक्टरांच्या दर्शनाने/नावानेही होऊ लागतो.

काही वेळा आई ओरडल्यावरच मूल विशिष्ट काम करणे थांबवते, तशी सवय लागते. किंवा आपण खूप ओरडलो, रडलो, फेकाफेक केली की आपल्याला हवी ती वस्तू मिळते असे कळल्यावर मुलाला तशी सवय लागते. या सर्व शिकण्याला, मानसशास्त्रीय भाषेत लर्निग थिअरी असं म्हणतात आणि त्याचाच उपयोग करून वेगवेगळ्या वर्तनोपचार पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.

मनोविकारात विचार, भावना व वर्तन यामध्ये बदल घडत असतो. वर्तनाने व भावनाविष्काराने तो दिसत असतो व त्या दृश्य परिणामाला कमी करण्यासाठी औषधांच्या जोडीने वर्तनोपचार पद्धती वापरल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो.

एकदा एक बाई उपचारांसाठी आल्या होत्या. सिनेमा पाहायला सिनेमागृहात गेल्या असताना त्यांना अचानक मळमळू लागले. घाम फुटला, चक्कर आल्यासारखे वाटू लागले, डोके दुखायला लागले. कसाबसा सिनेमा संपला आणि त्या डॉक्टरांकडे गेल्या. अ‍ॅसिडिटीमुळे त्यांना हा त्रास झाला होता, त्यावरची गोळी घेतल्यावर बरे वाटले. पण नंतर त्या सिनेमागृहात जायला टाळू लागल्या. काही काळाने तर घरातसुद्धा काळोखात बसायला त्यांना भीती वाटू लागली. घराची दारे बंद असली की भीती वाटणे, मळमळणे, चक्कर आल्यासारखे वाटणे असा सगळा प्रकार होऊ  लागला आणि भीतीचे प्रमाण वाढत गेले. एकटे घरी राहायची पण भीती वाटू लागली.

थोडक्यात झालेला त्रास व काळोख (सिनेमागृहातील), बंद सभागृह या गोष्टींचे समीकरण घट्ट बसले. त्रास अ‍ॅसिडिटीमुळे झाला होता तरी! त्यामुळे नुसता काळोख, बंद घर, मग एकटे घरी राहणे या सर्वाचीच भीती वाटू लागली होती. त्या विचारानेच त्यांची स्वायत्त चेतनासंस्था (सिम्पथेटिक नव्‍‌र्हस सिस्टीम) उद्दीपित व्हायची. मग धडधड, मळमळ, चक्कर ही साखळी सुरू व्हायची. त्यासाठी त्यांची परास्वायत्त चेतनासंस्था (पॅरासिम्पथेटिक नव्‍‌र्हस सिस्टीम) उद्दीपित करणे गरजेचे होते. त्यामुळे धडधड वगैरे कमी होणार होती. त्यांना स्नायू शिथिलीकरणाचा व्यायाम शिकवण्यात आला. मग तो जमू लागल्यावर, त्याचा उपयोग करून काल्पनिक पातळीवर वरील गोष्टी (काळोख, घर, सिनेमागृह) अनुभवायला लावून त्या वेळी मन शांत कसे ठेवायचे ते शिकवले. त्यासाठी त्या भीतीचा चढता क्रम लावायला लावला (घर, काळोख, सिनेमागृह असा) नंतर हळूहळू प्रत्यक्ष पातळीवर ते अनुभवायला लावून त्या वेळी शांत कसे राहायचे ते शिकवले. अर्थात  औषधांची जोड होतीच. परिणामस्वरूप त्या चार पाच महिन्यांतच पूर्ण बऱ्या झाल्या.

काही जणांना स्वच्छतेचा मंत्रचळ असतो. त्यांना त्या अस्वच्छ गोष्टींना प्रत्यक्ष अनुभवायला लावून स्वच्छतेचा अतिरेक थांबवणे शिकवले जाते (एक्स्पोजर अ‍ॅण्ड रिस्पॉन्स प्रिव्हेन्शन).

घृणा निर्माण करणे, शिक्षा देणे वगैरे इतरही पद्धती विविध विकारांसाठी वापरता येतात. लहान मुलांमधील काही अयोग्य वर्तन सुधारण्यासाठी त्यांच्या चांगल्या वागण्याला प्रोत्साहन देण्यासाठी ‘स्टार मून’ ही पद्धत वापरली जाते. लक्ष वेधण्यासाठी केलेल्या रडारडीला वा तत्सम वर्तनाला कमी करण्यासाठी टाइमआऊट पद्धत वापरली जाते, म्हणजे मूल सकाळी उठल्या उठल्या उगाच रडत बसत असेल, तर त्याकडे लक्ष देणे, समजावणे यांनी ते वाढते. त्याऐवजी एका खुर्चीवर भिंतीकडे तोंड करून (रडणे थांबेपर्यंत) बसवले तर ते थांबू शकते.

परंतु या वर्तनामागे, भावनेमागे विचार करण्याची चुकीची पद्धत, घरातील चुकीची हाताळणी वगैरे गोष्टी पण कारणीभूत असतात. त्यासाठी सद्विवेक वर्तनोपचार पद्धत, कुटुंब समुपदेशन यांची जोड पण द्यावी लागते. पण एकूणच वर्तनोपचार ही महत्त्वाची मानसोपचार पद्धती आहे यात शंका नाही!

काही वेळा आई ओरडल्यावरच मूल विशिष्ट काम करणे थांबवते, तशी सवय लागते. किंवा आपण खूप ओरडलो, रडलो, फेकाफेक केली की आपल्याला हवी ती वस्तू मिळते असे कळल्यावर मुलाला तशी सवय लागते. या सर्व शिकण्याला, मानसशास्त्रीय भाषेत लर्निग थिअरी असं म्हणतात आणि त्याचाच उपयोग करून वेगवेगळ्या वर्तनोपचार पद्धतीचे नियोजन करण्यात आले आहे.

adwaitpadhye1972@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लोकआरोग्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Human behavior

ताज्या बातम्या