प्रवास आणि अस्थिरोग

रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेकदा आपण आरामात झोपून जाण्याचा पर्याय निवडतो.

|| डॉ. नितीन भगली, अस्थिरोगतज्ज्ञ

लाखो वर्षांपूर्वी कधीतरी मानवप्राणी जन्माला आला आणि त्यानंतरची हजारो वर्ष तो पायी, फार फार तर प्राण्यांच्या पाठीवर बसूनच प्रवास करत होता. विज्ञान आणि तंत्रज्ञानानं प्रगती केली आणि प्रवासासाठी अत्याधुनिक वाहनं आली. हा वेग आणि हे तंत्रज्ञान कितीही उपयोगी ठरणारं असलं तरी याचे ‘बाय प्रॉडक्ट्स’ असल्यासारखे अपघात आणि दुखणीही त्याच्या मागोमाग आलीच. दुचाकी, चारचाकी किंवा बसमधूनही आपण रोजच प्रवास करतो. या प्रवासात आपण अशा काही चुका करतो ज्यामुळे अपघात झालाच तर आपल्या शरीरावर गंभीर आणि दूरगामी परिणाम होऊ  शकतात.

स्लीपर कोच गाडय़ांचा प्रवास-

रात्रीच्या वेळी प्रवास करताना अनेकदा आपण आरामात झोपून जाण्याचा पर्याय निवडतो. त्यासाठी स्लीपर कोचचा पर्याय स्वीकारला जातो. स्लीपर कोचमध्ये अनेकदा दोन प्रवाशांची जागा पार्टिशन टाकून विभागली जाते. स्लीपर कोचमधून प्रवास करताना घ्यायची खबरदारी म्हणजे नेहमी बसचालकाच्या दिशेने पाय करून झोपावं. अनेकदा पुरेशा माहितीच्या अभावामुळे आपण स्लीपर कोचमध्ये चालकाच्या दिशेने डोकं करून झोपतो. महामार्गावरच्या प्रवासात भरधाव वेगात असताना अचानक अपघातजन्य परिस्थिती निर्माण झाली तर आपत्कालीन ब्रेक लावला जातो. अशा परिस्थितीत चालकाकडे डोकं करून झोपल्यामुळे डोकं मधल्या पार्टिशनवर आपटून मानेला झटका बसतो आणि कित्येक दिवस त्याचा त्रास सहन करावा लागतो. अपघाताची तीव्रता याहून अधिक असली तर मेंदूला आणि पर्यायाने मज्जासंस्थेला इजा होते. मज्जारज्जू हा नाजूक अवयव दुखावला तर त्यातून अपंगत्व आलेले, सर्व संवेदना हरवलेले किंवा गंभीर परिस्थितीत असलेले रुग्ण सध्या अनेक रुग्णालयांकडे येताना दिसतात. चालकाकडे पाय करून झोपल्यानंतर अशा आपात्कालीन परिस्थितीत पाय पार्टिशनला आपटून काही दुखापत झालीच तर ती बरी करणं मेंदूची दुखापत बरी करण्यापेक्षा सोपं नक्की आहे. स्लीपर कोच बसचा प्रवास करताना नेहमी चालकाकडे पाय करून झोपा आणि आपल्या सहप्रवाशांमध्येही याबाबत जागृती करा.

चारचाकी गाडय़ांचा प्रवास-

जे महत्त्व दुचाकी चालवणाऱ्यांसाठी हेल्मेटचं आहे, तेच महत्त्व चारचाकी चालवणाऱ्यांसाठी सीटबेल्टचं. सीटबेल्टमुळे अपघाताच्या परिस्थितीत शरीर गाडीच्या डॅशबोर्डवर आपटणं, खिडकीची काच फुटून बाहेर फेकलं जाणं या प्रकारांपासून संरक्षण होतं. चालक किंवा मागे बसलेले प्रवासी यांचं डोकं पुढच्या डॅशबोर्डवर किंवा सीटवर आपटल्यामुळे मानेच्या मणक्याला व्हीप्लॅश नावाची दुखापत होते. सीटबेल्ट पोटाला घासून दुखापत होते अशा सबबी अनेक प्रवासी देतात, मात्र अपघात होऊन जीव गमावणे किंवा कायमचे अपंगत्व येणे यापेक्षा पोटाच्या दुखापती सहज बऱ्या करता येणे शक्य आहे.

दुचाकीवर प्रवास करताना-

शहरी मध्यमवर्गीय घरांमध्ये माणशी एक या प्रमाणात दुचाकी आहेत. पुण्यासारखी काही शहरं तर आता दुचाकींचं शहर म्हणूनच ओळखली जातात. दुचाकीवरून प्रवास करताना चालवणाऱ्याबरोबरच मागे बसणाऱ्यांनीही हेल्मेट वापरणं ही सक्ती आपणच आपल्याला करायला हवी. रस्त्यावर एखादा अपघात झाला आणि त्यातून मज्जासंस्थेला मार लागला तर कायमचं अपंगत्व येतं. अनेकदा नैसर्गिक विधी करण्याबद्दलच्या संवेदना नष्ट होतात आणि त्यातून रुग्ण कायमचा अंथरुणाला खिळतो. हे टाळण्यासाठी चांगल्या दर्जाचं हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. हेल्मेटच्या बाहेरील गुळगुळीत पृष्ठभागामुळे अपघातानंतर चालक गाडीवरून उडून घसरला तरी एकाच जागी होणारा संभाव्य आघात कमी करण्यास मदत करतो. त्यामुळे मेंदू आणि मज्जासंस्थेला होणारी गंभीर दुखापत रोखण्यात हेल्मेटची मदतच होते. हेल्मेटच्या आतल्या बाजूला असलेलं फोमचं आवरणदेखील अपघाताच्या प्रसंगी बफरप्रमाणे काम करतं. हेल्मेटच्या वापरामुळे मणक्याला दुखापत होते या समजुती या निव्वळ गैरसमज आहेत आणि वैद्यकीय संशोधनातून असं काहीही समोर आलेलं नाही हे ही लक्षात ठेवायला हवं.

nsbhagali@yahoo.co.in

(शब्दांकन: भक्ती बिसुरे)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Osteoporosis