‘त्या’ जाहिरातींमधील ‘टॉनिक’!

केवळ लैंगिक सामथ्र्य वाढवण्यासाठी शास्त्रानुसार एकही टॉनिक नाही.

डॉ. प्रसन्न गद्रे

टीव्हीवर विशेषत: रात्रीच्या वेळी कार्यक्रमांच्या मध्येच एखादी लांबच लांब जाहिरात सुरू होते. एक बाई त्यांच्या ह्य़ांच्या बद्दल जाहिरातीत तक्रार करत असतात. त्यांचा कधीच कसा मूडनसतो वगैरे.. मग कुणीतरी शक्तीप्राशसारखे काही नाव असलेले औषध किंवा पॉवर अमुकवगैरे नावाचे तेल वा कॅप्सूल तिच्या हाती ठेवते. लगेच आफ्टरच्या पाटीखाली पुन्हा त्या बाईंचे मनोगत. त्यांच्या मिस्टरांच्या परफॉर्मन्सबद्दलचे.. आपल्यापैकी प्रत्येकाने या जाहिराती पाहिल्या असतील. त्या बघून अशा चमत्कारीभासवल्या जाणाऱ्या टॉनिकच्या मागेही अनेक जण जातात आणि फसतातही. फारशा बोलल्या जाणाऱ्या या विषयावर आज विचार करूया.

सध्या बाजारात लैंगिक संबंधांविषयीच्या समस्यांसाठीवापरल्या जाणाऱ्या ‘टॉनिक’नी उच्छाद मांडला गेला आहे. काही तुरळक अपवाद वगळता ‘त्या’ गोष्टीसाठी टॉनिक नाही. काही वेळा व्यक्तीच्या आहारात शरीराचे एकूणच पोषण करणाऱ्या जीवनसत्त्वे व खनिजांचा आमूलाग्र अभाव असतो. अशा वेळी डोक्यापासून पायापर्यंत अनेक शारीरिक संस्थांच्या तक्रारी निर्माण होतात आणि लैंगिक समस्या या त्यातील एक असू शकतात. केवळ या परिस्थितीतच जीवनसत्त्वे व खनिजे शरीराला देणारी टॉनिक्स लैंगिक समस्यांवरही परिणामकारक ठरू शकतात. अन्यथा केवळ लैंगिक सामथ्र्य वाढवण्यासाठी शास्त्रानुसार एकही टॉनिक नाही.

लैंगिक संबंधाविषयी मुळातच समाजात खूप भ्रामक कल्पना असून या टॉनिकची बाजारपेठही अब्जावधींची उलाढाल असलेली आहे. अनेकदा योग्य ज्ञान नसणाऱ्या भोंदू व्यक्तींकडूनही या टॉनिकचे विपणन केले जाते. लैंगिक संबंधांच्या वेळी पुरूषांच्या जननेंद्रियांचा आकार वाढवण्यासाठी, ताठरता निर्माण करण्यासाठी, वीर्यपतनाची क्रिया वाढवण्यासाठी, स्त्रियांमध्ये स्तनांचा आकार वाढवण्याकरिता, अगदी म्हाताऱ्या व्यक्तीसही ‘तरुण’ बनवण्याचा दावा करणारी टॉनिक बाजारात सापडतात. ऑनलाइन वा पॉर्नोग्राफिक साईटवर या उत्पादनांचे विपणन जोरात चालते. टॉनिक घेऊन फसलो, हे ग्राहक सहसा कुणाला सांगत नसल्यामुळे त्या गोष्टीची कुठे वाच्यताही होत नाही. परिणामी ग्राहकाची समस्या आणि इकडे या उत्पादनांची उलाढाल तशीच सुरू राहते.

नेहमी दिसणाऱ्या लैंगिक टॉनिकमध्ये अनेकदा ‘जिनसेंग’ नामक वनस्पती, कॅफिन, ‘अ‍ॅफिटमाईस’सारखे काही विशिष्ट घटक, प्रसंगी अगदी दारू किंवा कोकेनसारख्या नशेच्या पदार्थाचा अंश, उत्तेजक द्रव्ये किंवा बाजारात मिळणाऱ्या ‘व्हायग्रा’सारख्या औषधांचा अंश या गोष्टींचा अंतर्भाव असू शकतो. आपण हे टॉनिक घेतोय म्हणजे बरे वाटणारच, या भावनेतून ग्राहकांना सुरूवातीला आत्मविश्वास वाटतो आणि ‘प्लासिबो इफेक्ट’प्रमाणे सुरूवातीचे ३-४ आठवडे त्यांना टॉनिकचा उपयोग झाल्यासारखेही भासते. पण हा परिणाम बहुतेक वेळा मनाला वाटणाऱ्या आत्मविश्वासामुळे शरीरावर दिसत असतो. टॉनिकचा उपयोग होत नाही, असे म्हटल्यावर अनेक जण पुन्हा त्याच प्रकारच्या चक्रात सापडतात आणि नवनवी टॉनिक वापरून पाहात राहतात.

पण एक लक्षात ठेवायला हवे. लैंगिक टॉनिक असल्याचा दावा करणाऱ्या औषधांचे दुष्परिणामही असू शकतात. एक तर ही औषधे अनेकदा बनवली कुणी, त्यात नेमके कोणते घटक आहेत, औषधांच्या वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत का, याची सामान्यांना माहिती मिळणे शक्यच नसते. शिवाय तथाकथित टॉनिक्समध्ये मिसळल्या जाणाऱ्या काही द्रव्यांनी अनेकांना गुप्त अवयवांवरील त्वचा जळण्याचा किंवा आणखी काही त्रास झाल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे याबाबतीत जागरूक राहणे गरजेचे आहे. पात्र अशा सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टरांकडून या विषयासंबंधीचे घेतलेले शास्त्रीय ज्ञान हेच खरे टॉनिक म्हणावे लागेल.

काही लैंगिक समस्या, त्यावरील भोंदू उपाय आणि खरे शास्त्रीय उपाय

  • पुरूषांच्या लिंगाचा आकार लहान असणे – मुळात हा आजार नव्हे, परंतु त्यासाठी ‘पुरूषार्थ वाढवण्याचा’ दावा करणारी टॉनिक, विविध लेप, व्हॅक्यूम पंप असे अशास्त्रीय उपाय केले जातात. लैंगिक संबंधांचा अनुभव आणि लिंगाचा आकार यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे अशा काही शंका मनात असतील तर सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टरांशी बोलून त्यांचे निरसन करून घ्यावे.
  • वीर्य कमी होणे वा शुक्रजंतू कमी आहेत अशी शंका असणे. वीर्याचा घट्ट वा पातळपणा व त्याबद्दलच्या शंका – अशा परिस्थितीत आहारात कांदा- लसूण बंद करणे, ‘ऑरगॅनिक’ शेतीतून केलेलेच पदार्थ खाणे, विशिष्ट घट्ट पदार्थ किंवा पांढऱ्या रंगाचे पदार्थ खाण्याचा उपाय अनेक जण सुरू करतात. काहीजण यावरही ‘रामबाण’ औषध देण्याचा वायदा ग्राहकांना करतात. परंतु वीर्याची तपासणी केल्याशिवाय- अर्थात ‘सिमेन अनॅलिसिस’ केल्याशिवाय खरोखरच काही वैद्यकीय समस्या आहे का, हे कळणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने अशी तपासणी करून घेणे व त्यानंतर गरज भासल्यास औषधोपचार करता येतात.
  • स्वप्नदोष – स्वप्नदोष किंवा झोपेत असताना होणारे वीर्यपतन हे नैसर्गिक असून तो दोष नाही. यावर अनेक जण रक्त वाढवण्याची टॉनिक सुरू करतात. ‘स्वप्न पडणार नाहीत’ असा दावा करणारी काही औषधेही दिली जात असून त्यात तथ्य नाही. अनेक जण अंधश्रद्धेचे उपाय करत असून ते टाळायला हवेत. डॉक्टरांशी मोकळेपणे बोलून घेतल्यास शंका-कुशंका राहणार नाहीत.
  • इंद्रियात वाकडेपणा असणे/ ताठरता कमी होणे/ ‘इरेक्शन फेल्युअर’ – यावर अनेक जण जिनसेंग वा इतर वनस्पतींची मुळे किंवा प्राण्यांच्या शिंगांची भुकटी वापरण्यास सांगतात. खरे तर इंद्रिय वाकडे असणे ही समस्या नसून ते किती वाकडे आहे याची डॉक्टरांकडून खातरजमा करून घेणे चांगले. ताठरता कमी होण्यावर (इरेक्शन फेल्युअर) विविध तेले, मसाज आणि अचाट दावे करणारी औषधे वापरली जातात. ती टाळून समस्येचे मूळ वैद्यकीय कारण शोधायला हवे. अनेकदा व्यक्तीला असलेले उच्च रक्तदाब वा मधुमेहासारखे काही आजार, संप्रेरकांचे असंतुलन, विविध जीवनसत्त्वांची कमतरता, मानसिक ताण-तणाव, स्नायू वा नसांचे आजार यामुळेही ‘इरेक्शन फेल्युअर’ असू शकते. यावर डॉक्टरी सल्ल्याने औषधोपचार करणे बरे, कारण अशास्त्रीय औषधांचे आरोग्याला दुष्परिणामच संभवतात.
  • लैंगिक दुर्बलता/ लैंगिक शक्ती कमी होणे – हे अनेकदा भावनिक कारणांशी जोडलेले असते. तरीही बाजारात त्यासाठीची अनेक ‘शक्तीवर्धक’ औषधे मिळतात. अनेक जण काही अघोरी औषधांचाही वापर त्यासाठी करत असून ते टाळायला हवे. अशी समस्या असलेल्या व्यक्तींनी सेक्सॉलॉजिस्टना आपली समस्या मोकळेपणे सांगून सल्ला घेणे योग्य.
  • कामवासना वा कामेच्छा कमी होणे – कामवासना उत्तेजित करण्याचा दावा करणारी औषधे व टॉनिक अनेक जण यासाठी घेतात. परंतु त्याऐवजी कामवासना कमी का आहे याचे नेमके कारण सेक्सॉलॉजिस्टच्या सल्ल्याने शोधणे योग्य.

prasannagadre@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Power tablet advertisement

ताज्या बातम्या