|| डॉ. अद्वैत पाध्ये

‘‘डॉक्टर, माझा मुलगा नुसता घरी बसून असतो हो. एवढा तरुण मुलगा, शिकताही पूर्ण आलं नाही त्याला या आजारामुळे, नुसता बसून रहातो किंवा झोपतो. माझ्यापेक्षाही जणू म्हातारा झालाय असं वाटतं हो मला’’

एका स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णाचे वडील त्यांची कैफियत मांडत होते. अतिशय काळजीचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. ‘‘त्याला नोकरी देऊ शकाल का तुमच्याकडे, डॉक्टर?’’ त्यांचा भाबडा प्रश्न.

‘‘अहो, कोणाकोणाला नोकरी देऊ ? आपल्याकडे एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के लोकांना हा विकार होतो. त्यातील बहुतेकांची सुरुवात ही अशा किशोर, तरुण वयातच होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षण व नोकरीवर नक्कीच परिणाम होतो. त्यामुळे किमान १५ रुग्ण तरी या विकाराने ग्रस्त असतात. या किंवा अन्य दीर्घकालीन मानसिक विकाराने ग्रस्त! ज्यामुळे त्यांच्या शिक्षण व नोकरी करण्याच्या क्षमतेवर, कौशल्यावर परिणाम थोडातरी होतोच. अशा किती जणांना मी नोकरी देऊ  शकणार? काही जणांना दिली तरी उरलेल्यांचे काय? पण तुमच्या म्हणण्याचा विचार करायलाच हवा. त्यांना नोकरी नाही देऊ  शकलो तरी त्यांना नोकरी करण्यास सक्षम व कुशल नक्कीच करता येऊ  शकेल. त्यांच्या पुनर्वसनासाठी तरी नक्कीच प्रयत्न करता येतील!’’

स्क्रिझोफ्रेनिया, बायपोलार डिसॉर्डर हे काही दीर्घकाळ चालणारे विकार!  त्यात उपचारांना  उशीर, मध्येच सोडून देणे या प्रकारांमुळे दीर्घकालीनत्व वाढतं ते वेगळंच! या  सर्वामुळे त्यांना फक्त औषधोपचार वा वैयक्तिक समुपदेशन देऊन भागत नाही तर त्यांचे पुनवर्सन गट करून त्यांच्यात सक्षमता, कुशलता, आत्मविश्वास वाढीला लावणे ही काळाची गरज आहे.

स्वमदत गट हे अनुभवांची देवाण-घेवाण करण्यासाठी असतात. ‘जो स्वत:ची मदत करतो, देव त्यांच्या पाठीशी उभे राहतो’ असं म्हणतात. इतर म्हणजे ओसीडी (मंत्रचळ) फीट्स किंवा अपस्मार किंवा एपिलेप्सी या आजारांत व्यक्ती त्यामानाने सक्षम असते, वास्तवाचे भान असते, व्यक्ती अगदी एकलकोंडय़ा नसतात, अनुभव देवाण-घेवाण त्यामुळे त्यांच्या स्वमदत गटात शक्य होते.

स्किझोफ्रेनियासारख्या विकारात हे शुभार्थी असं अगदी करू शकतातच असे नाही. बऱ्याचदा ते एकलकोंडे असतात, वास्तवाचे भान कमी असते, एक प्रकारचे रिकामेपण, आळस, अकार्यक्षमता या सर्व शृंखला त्यांच्या मनाला वेढून टाकत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनाची गतीच हरवलेली असते किंवा कमी झालेली असते. ती गती देण्यासाठी त्यांचा व्यवसाय पुनवर्सन गट महत्त्वाची भूमिका बजावतो. आजाराने निदान करताना त्यांची सामाजिक-व्यावसायिक अधोगती हा इतर लक्षणांबरोबर एक महत्त्वाचे लक्षण असते. त्यामुळे फक्त भास, भ्रम, संशय व इतर वर्तन नियंत्रित करून भागत नाही तर त्यांचे सामाजिक व  व्यावसायिक पुनरुत्थान फार महत्त्वाचे असते.

काही वेळा अशा पुनर्वसन गटासाठी सुचवल्यानंतर पालक गटात येणाऱ्या इतर रुग्णांना/ शुभार्थीना बघून, शंका उपस्थित करतात की यांच्याबरोबर राहून याचा आजार वाढणार तर नाही ना? तर त्यांना सांगावे लागते एकतर हे सर्व त्या मानाने बरे असलेले रुग्ण आहेत आणि हा संसर्गजन्य आजार नाही.

काही पालक व शुभार्थीना वाटते की माझ्या किंवा माझ्या रुग्णाच्या कुवतीपेक्षा कमी कुवतीचे ही कामे आहेत. मी नाही येणार/ पाठवणार. तेव्हा त्यांना सांगावे लागते की अगदी इंजिनीअर झाल्यावर या विकारामुळे मागे पडलेले जे रुग्ण या गटात मनापासून आले, ते आता बाहेर छान नोकरी पण करू शकत आहेत.

अशा व्यवसाय पुनवर्सन गटात त्यांचा मनोशारीरिक आळस झटकण्यासाठी सूर्यनमस्कार, योगासने, नृत्योपचारासारखे प्रकार खूप छान मदत करतात. त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी, त्यांचे या विकरामुळे आलेले जडत्व दूर करण्यासाठी सूर्यनमस्कारासारखा सर्वागसुदंर व्यायाम, योगातील आसनप्रकार, ओमकार, नृत्योपचार यांचा प्रभावी उपयोग करता येतो. त्यांची नकरात्मक लक्षणे कमी व्हायला मदत होते.

या विकारामुळे त्यांची सामाजिक कौशल्ये, विचारशक्ती यावर परिणाम झालेला असतो. त्यासाठी या गटात त्यांना व्यवहारकुशल बनवण्यासाठी तोंडी हिशोब कसे करायचे, बँकेचे व्यवहार कसे करायचे, हे सप्रात्यक्षिक किंवा भूमिका नाटय़ाद्वारे करता येते.

एखाद्या विषयावर बोलता यावे, नीट विचार मांडता यावेत यासाठी चर्चा घेणे, तसेच एखाद्या विषयावर सांगून त्यांचे संकलन करणे, मासिक/नियतकालिक बनवले त्यांची विचारक्षमता वाढीला लागते. त्यांच्यासाठी तिथेच ग्रंथालय/वाचनालय बनवता येऊ  शकते. या सर्वाची जबाबदारी हळूहळू तेच घेऊ  शकतात, ज्यातून पुढे त्यांचा नोकरीचा आत्मविश्वास येऊ  शकतो, एखादे काम सातत्याने, चिकाटीने करण्याची सवय लागते.

त्याचबरोबर त्यांच्या कौशल्याप्रमाणे वेगवेगळ्या वस्तू बनवणे, कलात्मक वस्तू, शिवणकाम करून वस्तू, खाद्यपदार्थ बनवणे, ते व्यवस्थित पॅकिंग करून विकणे या सर्व कामांत त्यांना हळूहळू कुशल बनवता येते. या गटांनी बनवलेल्या वस्तू ग्राहकपेठा, कॉर्पोरेट्स (सीएसआर अंतर्गत) करत असलेली प्रदर्शने यात भाग घेऊन, त्यांनाच विक्रेते, मार्केटिंग पर्सन बनवून ती कौशल्ये हळूहळू विकसित करता येतात.

या सर्वामुळे त्यांचे सामाजिक अभिसरण खूप छान होत जाते. आत्मविश्वास वाढतो. फक्त यासाठी त्यांना शिकवण्यासाठी असे समाजकार्यकर्ते, स्वयंसेवक यांचे मार्गदर्शन त्यांना द्यावे लागते. त्यासाठी या कार्यकर्त्यांचेपण प्रशिक्षण (विकारासंदर्भात) करावे लागते.

अख्ख्या महाराष्ट्रात अशी तीनच केंद्रे कार्यरत आहेत. ती वाढण्याची गरज आहे! मोठे शिवधनुष्य आहे हे, पण प्रत्यंचा लावल्यावर होणारा आनंद काही वेगळाच असतो यात वाद नाही!

या पुनर्वसन गटामुळे त्या शुभार्थीची प्रगती जी होते ती बाबा आमटेंच्या या कवितेतून छान व्यक्त होते..

पायी शृंखला असू दे, मी गतीचे गीत गाई

दु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही!

 

Adwaitpadhye1972@gmail.com