News Flash

दुचाकीवरून : सायकल टुरिंगसाठी उपयुक्त अ‍ॅक्सेसरीज

लांबच्या प्रवासात तळहातांवर फार ताण येऊ नये यासाठी ग्लोव्ह्ज आवश्यक आहेत.

हेल्मेट, बॉटल होल्डर, लॉक आणि स्पीडोमीटर या काही महत्त्वाच्या सायकलच्या अ‍ॅक्सेसरीजची आपण मागील भागात माहिती घेतली. पण मी म्हटलं होतं त्याप्रमाणे ही यादी न संपणारी आहे. त्यामुळे आजही आपण आणखी काही उपयुक्त आणि सायकलस्वाराकडे असाव्यातच, अशा आणखी काही अ‍ॅक्सेसरीजबद्दल जाणून घेणार आहोत.

हॅण्ड ग्लोव्ह्ज 

लांबच्या प्रवासात तळहातांवर फार ताण येऊ नये यासाठी ग्लोव्ह्ज आवश्यक आहेत. विशेषत: डोंगराळ भागात सायकिलग करताना उतरणीवर हाताला खूप झटके बसतात. त्या वेळी हॅण्डलवरील ग्रिपमुळे तळहातांची नाजूक त्वचा दुखावू नये यासाठी ग्लोव्ह्ज कामी येतात. थंडी आणि वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठीही ते आवश्यक आहेत. हल्ली बाजारात लाइट असलेले ग्लोल्व्ह्सुद्धा आले आहेत, ज्याचा उपयोग सिग्नल इंडिकेटर म्हणून करण्यात येतो.

रिफ्लेक्टर्स

सहज दुर्लक्षित करता येईल अशी ही वस्तू तरीही फार महत्त्वाची. रात्री आपल्याकडे चांगला लाइट असला तरी कोटसारखे रिफ्लेक्टर अंगात चढवणे नेहमीच फायद्याचे ठरते. फक्त रात्रीच कशाला दिवसाही वाहनांच्या गर्दीत, धुक्यात, पावसात सायकलस्वार म्हणून उठून दिसायचे असल्यास (सुरक्षेच्या दृष्टीने) हे कामी येते. प्रत्येक सायकलस्वाराकडे रिफ्लेक्टर जरूर असावे.

हवेचा पंप

श्रेडर, प्रेस्टा, वूड्स किंवा डनलॉप वॉल्व्ह हे टय़ूबच्या वॉल्व्हचे तीन प्रचलित प्रकार आहेत. हल्ली बाजारात उपलब्ध असलेल्या पंपांना तीनही प्रकारच्या वॉल्व्हमध्ये हवा भरता येईल अशा प्रकारचे अडॉप्टर असतात. त्यामुळे तुमच्याकडे ज्या प्रकारच्या वॉल्व्हची टय़ूब आहे, तसा बदल करून पंपाचा वापर करता येतो. हवेचा दाब दाखवणारे इंडिकेटर्स असलेला पंप घेणे केव्हाही चांगले. एक छोटा पंप असणे अनिवार्य आहे, जेणेकरून तुम्ही स्वत: पंक्चर काढू शकता.

कॅरियर

सायकलला कॅरियर असणे केव्हाही चांगले. आधुनिक सायकलींच्या बनावटीप्रमाणे त्यांची वेगवेगळी कॅरियर्स बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे ती विकत घेताना आपल्या सायकलला ते लावण्याची योग्य व्यवस्था आहे की नाही याची शहानिशा करूनच कॅरियर विकत घ्यावे.

पॅनियर

लांबच्या सायकल सफरीला जाताना सोबत भरपूर सामान न्यावे लागते. हे सामान पाठीवर न लादता पॅनियर्समध्ये भरून पॅनियर्स कॅरियरवर लादणेच चांगले. विविध आकारांची पॅनियर्स बाजारात मिळतात.

घंटी

स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेचा उपाय म्हणून सायकलला एक छोटी घंटी असणे नेहमी चांगले. शहरात सायकल चालवताना तर त्याचा फायदाच होतो. विचित्र आवाजाचे हॉर्न लावण्यापेक्षा छोटी घंटी केव्हाही चांगली.

ॅलन की

आधुनिक गीअर सायकलींसाठी वापरले जाणाऱ्या या टूलमध्ये वेगवेगळ्या आकारांच्या की असून सायकलजोडणी, ब्रेक आणि गीअरच्या सर्व कामांसाठी ते वापरता येते.

लाइट्स

केवळ दुचाकी किंवा चार चाकी वाहनांनाच दिवे लावण्याचे दिवस आता मागे पडले आहेत. सायकलसाठीही आता वेगवेगळ्या प्रकारांचे दिवे बाजारात आले आहेत. पुढचा दिवा, मागचा दिवा, इंडिकेटर्स, डोक्याला लावण्याचा दिवा (हेड टॉर्च), सायकलच्या चाकामध्ये दिवे असे नानाविध दिव्यांचे प्रकार मिळतात. आपल्या गरजेनुसार ते विकत घ्यावेत. साधारणपणे हेड टॉर्च आणि सायकलच्या सीटच्या मागे एक इंडिकेटर सायकलला असावा. अंधारात, धुक्यात किंवा पावसामध्ये सायकल चालवताना त्याचा खूप उपयोग होतो.

सॅडल आणि हॅण्डलबार पाऊच

रोजच्या कामासाठी सायकल वापरताना किंवा कमी अंतराचे सायकलिंग करताना प्रत्येक वेळी शरीरावर बॅगेचे ओझे वावरण्याची आवश्यकता नसते. त्यासाठी सॅडल आणि हॅण्डलबार पाऊच कामी येतात. त्यामध्ये तुमचा छोटा पंक्चर कीट, अ‍ॅलन की, मोबाइल, पाकीट, चष्मा, गॉगल आणि खाण्याच्या काही वस्तू सहज मावतात. बाजारात वेगवेगळ्या आकाराचे आणि प्रकारचे पाऊच उपलब्ध आहेत.

गॉगल

गॉगल आपण इतर वेळीही वापरतो, पण सायकिलग करताना गॉगल वापरणे अतिशय गरजेचे आहे. आपण वेगात सायकल चालवत असताना अनेक धूलिकण डोळ्यांत जाण्याची शक्यता असते. तसेच काही वेळेस रस्त्यांवरील इतर वाहनामुळे दगड, माती उडून तुमच्या डोळ्यांत गेल्यास मोठी इजा होऊ शकते. रात्री आणि दिवसा वापरण्याचे वेगवेगळे गॉगल बाजारात मिळतात.

prashant.nanaware@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2016 12:58 am

Web Title: accessories for bicycle touring
Next Stories
1 आडवाटेवरची वारसास्थळे : केळदीची चिन्नम्मा
2 लोक पर्यटन : घुमरी – जोझीला युद्ध स्मारक
3 ऑफबीट क्लिक
Just Now!
X