News Flash

तिची सायकलवारी

जागतिक महिला सायकलिंगमध्ये पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळविणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.

सायकलवारी

स्वच्छंद भ्रमंतीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनाला बाहेर पडणारी मुलगी आता त्यापुढे जाऊन सायकली भ्रमंतीचा काहीसा साहसी आणि अनोखा आनंददेखील लुटताना दिसत आहे. महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर तिची सायकलवारी..

युथ हॉस्टेल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे २०१२ साली मनाली ते खारदुंगला मार्गावर फक्त महिलांसाठीच्या सायकल मोहिमेत तब्बल ८७ मुलींनी भाग घेतल्याची नोंद ‘लिम्का बुक’मध्येही करण्यात आली आहे.

मणिपाल विद्यापीठाची पदवीधर अनाहिता साईप्रसाद ही २१ वर्षीय तरुणी ट्रिप्टोच्या अहवालानुसार राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-१ वरून सायकलिंग करीत जाणारी पहिली महिला ठरली आहे.  काश्मीर ते कन्याकुमारी हे तब्बल ४,५२८ किलोमीटरच अंतर तिने एकटीनेच सायकलवरून पार केलेय.

प्रिसिलिया मदन या पनवेलच्या तरुणीने नुकतीच पनवेल ते कन्याकुमारी ही १९०० किलोमीटरची सायकल भटकंती १९ दिवसांमध्ये पूर्ण केली.

सायकलिंग खेळाची जागतिक संघटना असलेल्या युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलने (यूसीआय) जाहीर केलेल्या ताज्या मानांकन यादीत देबोरा हेरॉल्ड या भारतीय महिलेचा समावेश आहे. जागतिक महिला सायकलिंगमध्ये पहिल्या पाच क्रमांकात स्थान मिळविणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.

प्रतिकूल परिस्थितीत अलिबाग तालुक्यातील धोकवडे या खेडेगावात राहणाऱ्या योगिता तुकाराम शिलदणकर आणि दीपाली तुकाराम शिलदणकर या सख्ख्या बहिणींनी सायकलिंगमध्ये महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार पटकावला आहे.

सायकलिंगमध्ये महिलांनी गाजवलेल्या कर्तृत्वाची ही वानगीदाखल उदाहरणे. सायकल चालवणाऱ्या व्यक्तीला जसं वयाचं बंधन नसतं तसं मुलगा किंवा मुलगी याचंही नसतं. उलट एखादी मुलगी सायकल चालवतेय म्हटल्यावर तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. मग आत्मविश्वास, साहस, तंदुरुस्त आणि सुंदर अशी अनेक विशेषणं तिला लागू होतात.

७०-८० च्या दशकात चित्रपटांमध्ये मुली सायकलवरून महाविद्यालयात जाताना दाखवल्या जायच्या. चोळी परकर आणि ओढणी घातलेल्या मुलींना सायकलवरून जायला कोणताही संकोच वाटत नव्हता. जे चित्रपटात होतं तेच प्रत्यक्षातही दिसत असे. परंतु, जसा काळ बदलला तसं वास्तवही आणि मुलींनी शाळेत जावं म्हणून त्यांना मोफत सायकली वाटण्यापुरतंच हे नातं उरलं. पण आता पुन्हा गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलताना दिसत आहे. आजही शाळेत, शेतावर किंवा कामावर सायलवरून आत्मविश्वासाने रपेट करणाऱ्या महिला दिसतात. दक्षिणेतील राज्यांमध्ये तर हे चित्र सर्रास दिसतं. महाराष्ट्र आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये निदान शाळेच्या वयाच्या मुली अभिमानाने सायकलवरून शाळेत जातात. शाळा संपल्यावर सायकल सोडून न देता त्याचा वापर पुढेही चालू ठेवण्याची गरज आहे.

फिटनेसचं वाढलेलं महत्त्व, थोडं ग्लॅमर आणि भटकंतीतला नवा प्रयोग यामुळे शहरातील मुली सायकलिंग करण्यासाठी पुढे सरसावत आहेत. काही ना काही कारणाने मुली पुन्हा सायकलिंगकडे वळू लागल्या, हेही नसे थोडके. एखाद्या ट्रेकला जशी मुलींची गर्दी व्हावी अगदी तशी गर्दी सायकलभ्रमंतीला नसली तरी त्यातील टक्का वाढतोय. सायकलभटकंतीतून तंदुरुस्ती आणि भ्रमंतीतला आनंद या दोन्ही गोष्टी साध्य होतात.

हिमालयात गेलात तर हमखास एखादी तरी परदेशी महिला सायकलस्वार आत्मविश्वासाने पेडल मारताना दिसते. आपल्या देशापासून हजारो मैल दूर केवळ जग पाहण्याच्या, नवीन माणसं जोडण्याच्या, तेथील संस्कृती जाणून घेण्याच्या ईष्र्येने ती भटकत असते. एकटीने डोंगरदऱ्यांमध्ये फिरणाऱ्या भारतीय मुली आहेत. त्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आयुष्याकडे वेगळ्या नजरेतून पाहण्यासाठी, महिला सुरक्षा, शिक्षण, मातृत्व, पर्यावरण याबाबतच संदेश घेऊन त्या स्वत:चं वेगळं जग निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत हे नक्कीच आशादायी चित्र म्हणावं लागेल.

शहरातील वाढतं प्रदूषण आणि गर्दी यामध्ये सायकल चालवायची कशी, असा प्रश्न अनेकींना पडतो. परंतु, योग्य काळजी घेतली तर सायकलिंग करण्यात कसलीच अडचण येत नाही, असं जुहू ते दादर हे अंतर दररोज सायकलने कापणाऱ्या फिरोजा सुरेश यांना वाटतं. शहरातील महिला रोजच्या कामात काही प्रमाणात सायकलींचा वापर करू लागल्या आहेत. हा बदल  त्यांना स्वागतार्ह वाटतो. एक महिला सायकलिंग करते तेव्हा ते फक्त तिच्या एकटीपुरतं मर्यादित राहत नाही तर तो संदेश तिच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठीही असतो.

अनेक लहान-मोठय़ा सायकलींच्या ग्रुपमध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. स्वतंत्रपणे अनोळखी प्रदेशात जाणाऱ्या सायकल सफरींमध्येही मुली मोठय़ा उत्साहाने सहभागी होतात. वेगळा प्रदेश बघणं, तिथल्या माणसांना भेटणं, तिथली खाद्यसंस्कृती अनुभवणं, छायाचित्रण या आणि अशा अनेक कारणांसाठी मुली या सायकल सफरींना जात असतातच. पण त्याहीपेक्षा मुलगी म्हणून तिच्याभोवती समाजाने लादलेली चौकट त्यांना मोडायची असते. स्वत:ची शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासून पाहायची असते, सतत सुरक्षित वातावरणात राहण्याच्या सवयीपासून थोडं धाडस करत साहसी वृत्ती अंगीकारायची असते.  हा बदल स्वागतार्ह आहे. एवढंच काय तर भटकण्याच्या हौसेखातर सायकलमध्ये चाळीस-पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक करण्यासही आजकाल मुली मागे-पुढे पाहत नाहीत. शहर, राज्य, देश या सीमा तोकडय़ा म्हणूनच की काय, परदेशात सायकलिंगसाठी गेलेल्या किंवा जाण्याची इच्छा असणाऱ्या मुलींच्या सायकल भटकंतीची व्याख्या आता अधिक विस्तारत चालली आहे.

prashant.nanaware@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2016 5:33 am

Web Title: anitha sai prasad record in cycling
टॅग : Cycling
Next Stories
1 भटक्यांचे कट्टे
2 ट्रेकिंग गिअर्स : पेहराव
3 आडवाटेवरची वारसास्थळे : पळसंबेची एकाश्म मंदिरे
Just Now!
X