News Flash

दुचाकीवरून : एक पॅडल मारून तर पाहा..

खरंतर आपल्याकडेही फार पूर्वीपासून प्रवासासाठी आणि विविध कामांसाठी सायकलचा वापर होत आहे.

सायकल

कधी काळी आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक असणारी सायकल आजकाल हद्दपार होत आहे. मात्र त्याचवेळी सायकल स्पर्धा, सायकलिंग ग्रुपची भटकंती, पर्यटन अशा अनेक माध्यमातून पुन्हा एकदा सायकली रस्त्यावर धावू लागल्या आहेत. अर्थातच सायकलींच्या तंत्रज्ञानातदेखील आमूलाग्र बदल होत आहे. म्हणूनच सायकलची यच्च्ययावत माहिती देणारं हे खास सदर..

आपल्याला कळायला लागल्याच्या वयापासून जवळपास प्रत्येकाला सायकलचं आकर्षण असतं. आपली स्वत:ची सायकल असावी, आपल्याला सायकल चालवायला मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि एका विशिष्ट वयात ती हौस अनेकजण भागवूनही घेतात. सायकल ही एक अशी गोष्ट आहे, जी तुम्ही रोजच्या कामासाठी वापरा किंवा त्यावरून लांबच्या सफरी करा, चालवण्यासाठी वयाचं बंधन नसतं.

खरंतर आपल्याकडेही फार पूर्वीपासून प्रवासासाठी आणि विविध कामांसाठी सायकलचा वापर होत आहे. मात्र सायकलला जगात असलेलं वलय-प्रतिष्ठा भारतात प्राप्त करून देण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. सायकल म्हणजे गरीबांचं वाहन, हाच दृष्टीकोन राहिला आहे. ग्रामीण भागात तर जुन्या पिढीकडून आजही सायकलचा वापर सर्रास केला जातो. शहरात सकाळी येणाऱ्या दूध आणि पाववाल्यापासून ते रात्री येणारा कुल्फीवाला सर्वजण सायकलचाच वापर करतात आणि त्यांच्या विशिष्ट घंटीनेच आपण त्यांना ओळखतो. पण ते त्यांच्या व्यवसायापुरतंच. सायकलस्वार म्हणून आपल्यादेखत त्यांना काहीच किंमत नसते. परंतु, सायकलींगविषयी थोडंफार गुगल केलं तर आपल्याला कळू शकेल की जगात सायकलस्वारांना किती मान आणि त्यांची काय शान आहे. एवढच काय सायकल शर्यतीचा समावेश १८९६ पासून पहिल्याच उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेपासून झाला आहे. आजदेखील आहे. युरोपातील अनेक देशामध्ये सायकल हा त्यांच्या विकास नियोजनात अविभाज्य स्थान आहे. रस्ते विकासात पहिला मान हा पादचाऱ्यांना आणि नंतर सायकलस्वारांना मिळतो. सार्वजनिक वाहनं, मोटारबाईक, खासगी गाडय़ा यांचा क्रमांक सर्वात शेवटी लागतो.

सायकल चालवण्यासाठी असेच प्रोत्साहन भारतातही मिळाले तर अधिकाधिक लोक सायकलींग करतील यात शंका नाही. परंतु, खेदाची बाब अशी की परदेशात जाऊन आलेले भारतीय नेहमी तिथल्या सायकल प्रेमाविषयी गोडवे गातात मात्र स्वगृही परतल्यावर मात्र सायकलस्वारांकडे तुच्छतेने पाहताना दिसतात. अलिकडेच दिल्लीचे उपमुख्यमंत्री हे स्वत:च्या घरून कार्यालयात सायकलने गेले.हल्ली तर मोटारबाईक चालवणं हे प्रतिष्ठेचं आणि सायकल चालवणं कमीपणाचं झालय. पण गेल्या काही वर्षांत सायकल स्पर्धा, मोहिमा याबाबत प्रसारमाध्यमांद्वारे जागृती होत आहे. परदेशी कंपन्यांच्या सायकलींची भली मोठी शोरुम्स आज आपल्याकडे सुरु झाली आहे. गिअर्स असलेल्या, अत्याधुनिक रचना असलेल्या या सायकली लगेच लोकांचं लक्ष वेधून घेतात, एखादा सायकलस्वार पँनियर्स बांधून लांबच्या प्रवासाला निघाला असेल तर त्याला थांबवून चौकशी आणि आवश्यक ती मदतही  करतात. त्या सायकलींची किंमत पंचवीस-तीस हजारांच्या घरात आहे, असं सांगितल्यावर तोंडात बोटंसुध्दा घालतात.

आधुनिक सायकली आणि तरूणांमध्ये वाढणारं सायकलींगचं वेड यामुळे सायकलला थोडंफार वलय प्राप्त व्हायला जरी सुरूवात झाली असली तरी ‘सायकल संस्कृती’ रूजवणं अधिक महत्त्वाचं आहे. आज मोठय़ा शहरात सायकलींगचे ग्रुप सुरु झाले आहेत. पर्यटनातदेखील हे प्रमाण वाढतय. पर्यटनातील वापर जसा वाढेल तशी ही रुची आणखीनच वाढू शकेल. सायकलचा नित्यनियमाने वापर करण, ती चालवणं प्रतिष्ठेचं समजण, सायकलस्वारांचा आदर करणं, पर्यावरण आणि आरोग्याच्या दृष्टीने त्याचं महत्त्व मान्य करून ते दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत करण्याचा वसा घेतला तरच ते शक्य आहे. म्हणूनच प्रत्येकाने ठरवलं तर सायकल चालवणे हा एक आनंददायी अनुभव होऊ  शकतो. त्यासाठी न्यूनगंड आणि फुकाची प्रतिष्ठा बाजूला ठेवून अभिमानाने पेडल मारायला हवेत.

सायकलचे प्रकार

रोडस्टर सायकल : आपण जी नेहेमी चालवतो ती साधी सायकल. ही सायकल वजनाला जड आणि मजबूत असते. शिवाय कमी किमतीमध्येही उपलब्ध असते.

हायब्रीड सायकल : मध्यम आकाराचे टायर असलेली ही सायकल शहरांमध्ये डांबरी रस्त्यांवर चालविण्यासाठी आणि गरज भासल्यास थोडय़ा उथळ रस्त्यावर चालवण्यासाठी योग्य आहे.

माउंटन बाइक : सायकलच्या दुकानात गेल्यावर चटकन डोळ्यात भरणारी अशी ही सायकल. जाड आणि रूंद टायर, तितकीच जाड फ्रेम आणि पुढच्या व मागच्या चाकाला शॉक अबसॉर्बर ही या सायकलची वैशिष्टे.

रोड बाइक : वजनाला अतिशय हलकी आणि पातळ आकाराचे टायर असलेली ही सायकल लांब पल्लय़ांच्या शर्यतींसाठी आणि सपाट रस्त्यांवर चालवण्यासाठी वापरली जाते. सायकलच्या सर्व प्रकारांमध्ये या सायकलची किंमत सर्वात जास्त असते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2016 3:03 am

Web Title: article on bicycle information
टॅग : Information
Next Stories
1 विष्णूच्या शक्तींचे मंदिर : अन्वा
2 हॅवर सॅक
Just Now!
X