News Flash

हॅवर सॅक

ट्रेकिंगला जायचं म्हटलं की त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असते ती सॅक म्हणजेच पाठपिशवी.

गिर्यारोहण या खेळात ट्रेकिंग, हायकिंग, प्रस्तरारोहण आदींचा समावेश होतो. यातील ट्रेकिंग म्हणजे पदभ्रमण. हा प्रकार आता समाजाच्या सर्व स्तरांत बऱ्यापैकी रूजला आहे. विशेषत: आपल्या मुलांनी एकदा तरी ट्रेकिंग किंवा तत्सम साहसी खेळात सहभागी व्हावं असं पालकांना वाटू लागलं आहे. शाळाही गिर्यारोहणाचा समावेश त्यांच्या अभ्यासक्रमात करू लागल्या आहेत. एकंदरच ट्रेकिंगला जाण्याचा कल वाढू लागला आहे. ट्रेकिंगला जायचं म्हटलं की काही साहित्य सोबत घ्यावे लागते. त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट असते ती सॅक म्हणजेच पाठपिशवी. कारण सॅकमध्येच इतर सर्व सामान ठेवायचे असते. मग बाजारात जाऊन एखादी सॅक विकत घेतली जाते. बाजारात अनेक आकाराच्या, प्रकारच्या आणि वेगवेगळ्या सोयी असलेल्या सॅक मिळतात. सॅकबद्दल सविस्तर माहिती नसल्यास निवड केलेली सॅक आपल्या गरजा पूर्ण करणारी व आरामशीर असेलच असे नाही. मग ट्रेकिंग करताना सॅक बाळगणे त्रासदायक होते. काही वेळा त्यातून पाठदुखी, मानदुखी अशा त्रासांना सामोरे जावे लागते. सॅक घेण्याआधी तिच्याबद्दल माहिती असल्यास योग्य सॅकची निवड करणे शक्य होईल.

सॅकचा आकार/क्षमता

सर्वसाधारणपणे किती क्षमतेची सॅक आपल्याला घ्यावयाची आहे व त्यात कोणत्या सोयी असायला हव्यात ते गिर्यारोहक कोणत्या प्रकारच्या व कालावधीसाठी गिर्यारोहणाला जाणार आहे, यावर अवलंबून असते.

एक दिवसाची मोहीम

एक दिवसाच्या आरोहणासाठी नेण्याचे सामान कमी असते. आरोहण साहित्य, पाणी, जेवणाचा डबा, औषधपेटी आदी सामान असते. त्यासाठी ३० ते ४० लिटर क्षमतेच्या अंतर्गत फ्रेम असलेल्या सॅक पुरेशा असतात. आरोहण साहित्य वजनदार असते. त्यामुळे खांद्याच्या व कमरेच्या पट्टयांना पुरेसा मऊपणा असावा. या सॅकला औषधपेटी ठेवण्यासाठी टॉप पाउचमध्ये जागा, सामान हलू नये म्हणून आवळपट्टया, सॅकच्या शीर्षांकडील भागावर लावलेला लूप , पाण्याच्या बाटल्या ठेवण्यासाठी बाजूचे पाऊच, एखाद्या वेळेस जास्त सामान वाहून न्यायचे असल्यास सॅकचा गळ्याकडील भागाचा विस्तार करण्याची सोय, तसेच टॉप पाऊचचा विस्तार करण्याचीही सोय असावी.

दोनहून अधिक दिवसांची मोहीम

दोन दिवस व त्यापेक्षा जास्त दिवसांच्या मोहिमेसाठी आरोहण साहित्य, पाणी व जेवणाचा डबा या सामानाबरोबरच झोपण्याचे सामान, जेवणासाठी भांडी, शिधा, पाणी साठविण्यासाठी गॅलन, कपडे आदी अतिरीक्त सामान लागते. हे ठेवण्यासाठी जवळपास साठ लिटरची सॅक असणे गरजेचे असते.

अनेक टप्प्यांचे (Multi Pitch) आरोहण

खूप उंच प्रस्तरिभतींवरील आरोहणात सर्वच प्रकारचे सामान जास्त असते. त्यामुळे अशा प्रस्तरारोहण मोहिमांत जास्त क्षमतेच्या सॅक वापराव्या लागतात. साधारणपणे ६० ते  ९०लिटर क्षमता असलेल्या सॅक या मोहिमांमध्ये वापरल्या जातात. या मोहिमांमध्ये आरोहणादरम्यान जसजसे वरचे टप्पे गाठले जातात तसतसे बरेच सामान वर खेचून घ्यावे लागते. यासाठी सामान भरलेली सॅक खेचून घेण्यासाठी सॅकच्या शीर्षांकडील भागावर वर्तुळाकार पट्टी लावलेली असावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2016 2:58 am

Web Title: article on haversack information
टॅग : Information
Just Now!
X