भोपाळ म्हटलं की वायुदुर्घटना आठवते. पण, या भोपाळ आणि परिसरात प्राचीन ऐतिहासिक खजिनाही ठासून भरला आहे. सांची, विदिशा, उदयगिरी, भीमबेटका आदी ठिकाणचा प्राचीन भारताचा अमूल्य ठेवा अवश्य पाहायला हवा.

मध्य प्रदेशची राजधानी असलेले भोपाळ शहर आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर भटकणे म्हणजे एक पर्वणीच आहे. खुद्द भोपाळ हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. त्याचसोबत तिथे असलेले संग्रहालय अवश्य बघावे असे आहे. पण भोपाळला मुक्काम करून त्याच्या आजूबाजूला असलेला आपला प्राचीन ऐतिहासिक ठेवा बघण्याची संधी आवर्जून साधली पाहिजे. सांची, विदिशा, उदयगिरी, भीमबेटका आणि भोजपूर ही ती ठिकाणे. भोपाळला राहायचे आणि दोन दिवसांत ही सुंदर ठिकाणे बघून यायची असा मस्त कार्यक्रम ठरवता येईल. प्राचीन भारताचा अमूल्य ठेवा आणि त्याची विविध रूपे आपल्याला या भटकंतीमध्ये बघायला मिळतात.

Unseasonal rain is expected in the state for the next week
राज्यावर आठवडाभर अवकाळीचे ढग.. कुठे गारपीट, कुठे पाऊस?
vasai fort leopard
वसई किल्ला परिसरात बिबट्याची दहशत कायम, संध्याकाळ नंतर रोरो सेवा बंद करण्याची सुचना
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

पहिल्या दिवशी भोपाळच्या पूर्वेकडे असलेल्या सांची-विदिशा-उदयगिरी पाहायला जावे. भोपाळपासून फक्त ४५ किलोमीटरवर असलेला सांचीचा जगप्रसिद्ध बौद्ध स्तूप हे मोठे आकर्षण आहे. इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात मौर्य सम्राट अशोक याने बांधलेले, संपूर्णपणे विटांचे बांधकाम असलेले हे स्थापत्य फारच सुंदर आहे. हा स्तूप म्हणजे एक स्मारक होय. गौतम बुद्धाच्या अस्थी किंवा त्याचे काही अवशेष एका पेटीमध्ये जपून ठेवले जात असत आणि त्या पेटीवर स्मारक म्हणून भव्य अशा स्तुपाचे बांधकाम केले जाई. सांचीचा स्तूप हे पण असेच एक स्मारक म्हणायला हवे. स्तुपाच्या माथ्यावर छत्रावली आहे. इ.स.पूर्व पहिल्या शतकात सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात या स्तुपाच्या बाजूने भव्य शिल्पांकित अशी तोरणे बांधली गेली आणि त्या स्तपुपाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी एक सुंदर प्रदक्षिणापथ तयार करण्यात आला. इथल्या तोरणांवर बुद्धाच्या आयुष्यातील विविध प्रसंग कोरलेले आहेत. सांची इथली ही तोरणे आणि त्यावर केलेले शिल्पकाम मुद्दाम पाहण्याजोगे आहे. या तोरणांवर असलेल्या ब्राह्मी लिपीमधील शिलालेखानुसार महाराष्ट्रातील कोणी आनंद नावाच्या व्यापाऱ्याने यासाठी देणगी दिल्याचा उल्लेख आढळतो.

सांचीपासून पुढे फक्त नऊ किलोमीटरवर विदिशा आहे. इथे एक महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा बघायला हवा तो म्हणजे हेलिओडोरसचा स्तंभ. इंडो-ग्रीक राजा अ‍ॅण्टीअल्किडास याचा राजदूत हेलिओडोरस हा शुंग राजा भागभद्र याच्या दरबारात होता. तो विष्णुभक्त होता असे समजले जाते. भारतात मंदिर स्थापत्य हा गुप्त काळापासून म्हणजे इ.स.च्या चौथ्या शतकापासून पाहायला मिळते. परंतु या स्तंभावर असलेल्या उल्लेखानुसार इ.स.पूर्व पहिल्या शतकातदेखील इथे विष्णूमंदिर होते असा लिखित पुरावा मिळणे केवळ लक्षणीय आहे. या स्तंभाला इथले लोक खंबा बाबा असे म्हणतात. विदिशाहून चार किमीवर बेस नदीच्या काठी असलेल्या उदयगिरी गुंफा आणि त्यामध्ये असलेली शिल्पकला पाहायलाच हवी. इ.स.च्या पाचव्या शतकात, गुप्तकाळात या गुंफा खोदल्या गेल्या. इथे असलेले भूवराहाचे शिल्प अतिशय देखणे आहे. भूदेवीला पाताळातून बाहेर आणणारा हा विष्णूचा वराह अवतार इथे अतिशय ठसठशीतपणे आणि रेखीव असा कोरलेला आहे. डावा पाय किंचित दुमडून शेषावर ठेवलेला आणि उजवा पाय ताठ असलेल्या अशा आलीढासनात हा वराह उभा असून डाव्या खांद्यावर भूदेवी दिसते. पाठीमागील िभतीवर विविध देवदेवता या वराहाचे अभिवादन करताना कोरलेले आहेत. उदयगिरी इथे असलेल्या या गुंफा आणि त्यातली ही वैष्णव शिल्पे आपल्याला तिथे खिळवून ठेवतात. गुप्त सम्राट चंद्रगुप्त-दुसरा आणि कुमारगुप्त यांचे शिलालेख या ठिकाणी कोरलेले आहेत.

दुसऱ्या दिवशी भोपाळच्या दक्षिणेकडे ४५ किमीवर असलेल्या भीमबेटका या जागतिक वारसास्थळाला भेट द्यावी. भारतात आदिमानवाच्या वस्तीचे आणि त्यांच्या कलेचे पुरावे इथे चित्ररूपात पाहायला मिळतात. इथे असलेल्या शैलगृहात आदिमानवाने चितारलेली रंगीत चित्रे मोठय़ा संख्येने रंगवलेली आहेत. हे खरे तर एक आश्चर्यच म्हणावे लागेल. या गुहांचा शोध लावण्याचे श्रेय मराठी माणसाकडे जाते. डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर उर्फ हरीभारू  या पुरातत्त्वज्ञाने या गुहा शोधून काढल्या. रेल्वेतून जाताना त्यांना डोंगरात काही खोदलेले दिसले. स्थानिक प्रवाशांकडे चौकशी करता त्या गुहा आहेत आणि आत जनावरे असतात असे कळले. जवळच्याच स्थानकावर रेल्वेगाडीचा वेग कमी झाला असता वाकणकरांनी बाहेर उडी मारली आणि त्या गुहांच्या शोधार्थ ते निघाले. त्यानंतर ते सतत तिथे जात राहिले आणि त्यांनी या चित्रांचा सखोल अभ्यास केला. सोबत बटाटे घेऊन जायचे आणि तिथे वाळूत ते पुरायचे. दुपारी ते बटाटे उकडलेले असत, तेच जेवण म्हणून जेवायचे असा व्रतस्थ अभ्यास त्यांनी केला. १९७५ मध्ये त्यांना पद्मश्री सन्मानाने पुरस्कृत केले गेले. त्यांच्या नावाची संशोधन संस्था उज्जन इथे उभारलेली आहे. भीमबेटकामध्ये विविध प्राणी, पक्षी, झाडे, शिकारीची दृश्ये अशी आदिमानवाने त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांची रंगीत चित्रे काढलेली दिसतात. कित्येक हजार वर्षांपूर्वी चितारलेली ही नसर्गिक रंगातली चित्रे आणि त्याचे मराठी संबंध मुद्दाम बघायला हवेत.

भीमबेटकापासून दक्षिणेला २५ किलोमीटरवर बेतवा नदीच्या काठी भोजपूर गाव आहे. परमार घराण्याचा प्रसिद्ध राजा भोज याच्यावरून हे नाव पडल्याचे सांगतात. इथे असलेले भोजेश्वर हे महादेवाचे मंदिर एक हजार वष्रे जुने आहे. विटांनी बांधलेल्या या मंदिरावर आज शिखर नाही. परंतु या मंदिरात असलेली १८ फूट उंच शिविपड खास बघावी अशी आहे. या मंदिराचे अजून वैशिष्टय़ म्हणजे इथेच बाजूला असलेल्या दगडावर या मंदिराचे स्थापत्य नियोजन कोरलेले आहेत. अतिशय देखणे शिविलग, मंदिर आणि बाजूला असलेले दगडावर कोरलेले नकाशे हे सर्वच अविस्मरणीय म्हणायला हवे.

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या परिसरात अनेक प्राचीन अवशेष आणि स्थापत्य विखुरलेले आहे. ही चार ठिकाणे म्हणजे त्याची एक झलक म्हणायला हवे. आपल्या या पर्यटनात एका वेगळ्या परिसराची ओळख आपल्याला होतेच परंतु आपले समृद्ध प्राचीन स्थापत्य आणि कला यांचे विविधांगी दर्शन केल्याचे समाधान नक्कीच लाभते.

ashutosh.treks@gmail.com