दिवाळीच्या सुट्टीतल्या भटकंतीचे नियोजन आधीच झालेले असते. पण असे नियोजन झाले नसेल आणि दोन-तीन दिवस हाताशी असतील तर स्वत:च्या गाडीने भटकता येतील अशी काही महाराष्ट्रातील ठिकाणं आणि झटपट परदेशवारीचे पर्याय खास दिवाळीनिमित्त..

दिवाळी संपली की सहलीला बाहेर जाण्याची प्रथा आता सर्रास लोकप्रिय होऊ लागली आहे. भाऊबीज झाली की चांगले १०-१५ दिवस भटकंती करायची आणि ताजेतवाने होऊन पुन्हा आपापल्या उद्योगाला लागायचे. परंतु, असे नियोजन झाले नसेल आणि दिवाळीनंतर दोन-चार दिवस मोकळे असतील तर अशा वेळी जाणार कोठे? कोकण तर शक्यच नाही, कारण या काळात तिथे पर्यटकांची बरीच गर्दी असते. ऐनवेळी राहण्याची सोय होईलच असे नाही. पण अशा वेळी एक-दोन दिवसांसाठी किंवा फारतर चार दिवसांसाठीसुद्धा काही ठिकाणे आपली वाट पाहत असतात.

Change in traffic route due to Rath Yatra after ram navami in nashik
नाशिक : रथयात्रेमुळे वाहतूक मार्गात बदल
mumbai, registered vehicle number, RTO, traffic jam, vehicular pollution
मुंबईत वाहतूक कोंडी, प्रदूषणाचे संकट; वर्षभरात अडीच लाख वाहनांची नोंदणी; एकूण वाहने ४६ लाखांवर
Navi Mumbai, Gudipadwa
कडक उन्हात कडक उत्साह.. उन्हाची पर्वा न करता जोशात उत्साहात निघाली गुढीपाडवा स्वागत शोभायात्रा
Malavya Rajyog 2024
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तयार होणार शुभ राजयोग; ‘या’ ४ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

पुण्या-मुंबईवरून नाशिक आणि परिसर अंदाजे सारख्याच अंतरावर आहे. प्रवासाला साधारणत: चार-पाच तास लागतात. नाशिकच्या जवळच असलेले अंजनेरी, बकेश्वर, सिन्नरचे गारगोटी संग्रहालय ही ठिकाणे या वेळी खास पाहून घ्यावीत. त्याचबरोबर मुद्दाम पाहावे ते म्हणजे नाशिकमध्येच असलेली पांडवलेणी. इ.स.च्या पहिल्या-दुसऱ्या शतकातील ही बौद्ध लेणी देखणी तर आहेच, पण ऐतिहासिकदृष्टय़ासुद्धा आगळीवेगळी आहेत. तिथे असलेल्या ब्राह्मी लिपीतील विविध शिलालेखांवरून प्राचीन भारताचा एक सलग इतिहास उलगडण्यास मोठीच मदत झाली. सिन्नर हे तालुक्याचे ठिकाण आणि एक प्रमुख बाजारपेठेचे गाव. प्राचीन काळी सिंदीनगर या नावाने प्रसिद्ध असलेले हे गाव यादव राजांच्या राजधानीचे गाव होते. नाशिकऐवजी इथे मुक्काम केला तर विविध दिशांना विविध ठिकाणे पाहता येतील. इथे असलेले यादवकालीन गोंदेश्वराचे अतिशय भव्य आणि देखणे मंदिर सहज वेळ काढून पाहण्याजोगे आहे. सिन्नरवरून एका दिवसात पहिल्या बाजीराव पेशव्यांचे जन्मगाव डुबेरे पाहता येईल. गावाशेजारीच असलेला छोटेखानी किल्ला  कोणालाही सहज चढून जाता येईल असा आहे.

भंडारदरा परिसरसुद्धा दोन-तीन दिवस मनमुराद भटकण्यासाठी योग्य आहे. यंदा पाऊस भरपूर झाल्याने धरणे काठोकाठ भरली आहेत. भंडारदरा धरण आणि आजूबाजूचा अतिशय रमणीय परिसर मुद्दाम याच काळात जाऊन पाहावा. कळसूबाई शिखर, टाकेदचे जटायू मंदिर, रतनवाडीचे शिल्पसमृद्ध अमृतेश्वर मंदिर, रतनगड किल्ला, सांदण दरी ही सगळी ठिकाणे आत्ताच तर पाहायला हवीत. सर्वत्र हिरवेगार झालेले आणि त्यातून होणारा आपला प्रवास निश्चितच रमणीय असतो. रतनवाडीवरून सांदणमाग्रे घाटघरला जावे. तिथून अलंग-मदन-कुलंग या सह्याद्रीमधील सर्वात रौद्र किल्ल्यांचे दुरूनच दर्शन घ्यावे आणि परत भंडारदरा इथे यावे. भंडारदरा इथे जेवणाच्या आणि मुक्कामाच्या छान सोयी उपलब्ध आहेत.

कधी थोडा-जास्त प्रवास करून औरंगाबाद गाठावे. मुक्काम औरंगाबादला करून वेरुळची लेणी, घृष्णेश्वर दर्शन करावे. अजिंठा निवांत पहिले नसेल तर मुद्दाम तिथे जावे. वाटेत गोळेगाववरून एक रस्ता अन्वा या गावी जातो. तिथे असलेले विष्णूच्या शक्तींचे मंदिर खास पाहण्याजोगे आहे. अजिंठा लेणींना जाताना अलीकडे अजिंठे नावाचे गाव लागते. तिथे वू पॉइंट नावाची जागा आहे. ती अगदी न चुकता पाहावी अशी आहे. इथे आपण उंचावर असतो आणि समोरच्या डोंगरामध्ये घोडय़ाच्या नालेच्या आकाराचा संपूर्ण अजिंठा लेण्यांचा नजारा अतिशय देखणा दिसतो. एक-दोन दिवस जास्त असतील तर पुढे कन्नडमाग्रे पितळखोरा ही सुंदर लेणी पाहावीत. या लेणींमध्येसुद्धा प्राचीन चित्रकला केलेली पाहायला मिळते. चालायची तयारी असेल तर इथूनच सरळ एक पायवाट खाली पाटणादेवीला उतरते. तासभर सुंदर पायपीट करून आपण एका रम्य स्थळी येतो. चालायचे नसेल तर गाडीरस्त्याने घाटाने थेट पाटणादेवीपर्यंत जाता येईल. इथेच आजूबाजूला कण्हेरा, पेडका हे किल्लेसुद्धा आहेत. धारकुंडचा धबधबासुद्धा जवळच आहे. खुद्द औरंगाबाद शहरामध्ये दोन सुंदर ठिकाणे भेट देण्याजोगी आहेत जी सहसा पाहिली जात नाहीत. त्यातले एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे वस्तुसंग्रहालय. खूप नेटकेपणाने राखलेले हे संग्रहालय आवर्जून बघावे. विविध मूर्ती, वस्तू यांची देखणी दालने उत्तम रीतीने सजवलेली आहेत. दुसरे ठिकाण म्हणजे औरंगाबादची लेणी. विद्यापीठाच्या मागूनच इथे रस्ता जातो.

नागपूरवरून दोन-तीन दिवस मोकळे असतील तर पूर्वेकडे गडचिरोलीला जावे. अतिशय देखणे असे मरकडा मंदिर आणि त्यावर असलेले मूíतकाम डोळेभरून पाहण्याजोगे आहे. त्याशिवाय मेळघाट, चिखलदरा ही ठिकाणेसुद्धा तेवढीच तोलामोलाची आहेत. गाविलगड, नरनाळा हे किल्ले शांतपणे पाहायचे असतील तर मुद्दाम दोन दिवस काढून चिखलदऱ्याला जायला हवे. नागपूरजवळचे रामटेक ही एकेकाळची वाकाटक राजवटीची राजधानी होती. महाकवी कालिदासाने आपले मेघदूत हे लोकप्रिय काव्य इथेच लिहिले असा समज आहे. तिथे असलेली प्राचीन मंदिरे, आणि सगळाच रामटेकचा परिसर हा एक दिवस वेळ काढून पाहावा असा आहे. नागपूरवरून पश्चिमेकडे बुलढाणा इथे यावे. जगप्रसिद्ध लोणार सरोवर आणि त्याच्या काठी असणारी सुंदर छोटी छोटी मंदिरे, लोणार गावातले दैत्यसूदन मंदिर, निद्रिस्त हनुमानाचे मंदिर ही खास आकर्षणे. लोणारवरून पहाटे लवकर आवरून सरळ मेहेकर गाठावे. मेहेकर गावी बालाजी म्हणजेच विष्णूचे मंदिर आहे. या मंदिरातील १२ फूट उंचीची मूर्ती कमालीची सुंदर आहे. याला शारंगधर असे म्हणतात. या मूर्तीच्या मस्तकावर जो मुकुट आहे त्या मुकुटात धनुष्य हातात धरून बसलेल्या विष्णूची छोटी मूर्ती आहे. सांबरिशगाचे धनुष्य केले की त्याला शारंग असे नाव आहे.

मराठवाडा म्हणजे महाराष्ट्राचा वैभवशाली वारसा म्हणावा लागेल. जवळजवळ प्रत्येक गावात एखादे सुंदर यादवकालीन मंदिर वसलेले आहे. मंदिरावरील मूíतकाम निव्वळ अप्रतिम असे आहे. मराठवाडय़ाच्या मंदिरांवर प्रकर्षांने जाणवणारी बाब म्हणजे अप्सरा ज्यांना सूरसुंदरी म्हणतात त्यांचे केलेले शिल्पांकन हे होय. लातूर या ठिकाणी मुक्काम केला तर आजूबाजूची अनेक देखणी मंदिरे दोन-तीन दिवसांत पाहता येतील. औसा आणि धर्मपुरी इथे असलेले मध्ययुगीन स्थापत्य शैलीने नटलेले भुईकोट किल्ले, त्यात असलेल्या प्रचंड विहिरी आणि निराळ्या धाटणीचे बुरूज आवर्जून पाहावेत असे आहे. निलंगा, पानगाव, धर्मापुरी या ठिकाणची नितांतसुंदर मंदिरे खास मंदिर पर्यटन म्हणून पाहावीत अशी आहेत. औंढय़ानागनाथ हे मंदिर ज्योतिìलग म्हणून महत्त्वाचे आहेच, त्याचबरोबर ते मराठवाडय़ातील सर्वाधिक शिल्पांनी मढलेले मंदिर आहे. अंबेजोगाई इथे योगेश्वरी मंदिरावर गणेशाच्या शक्तीची मूर्ती आहे. अशीच मूर्ती पुण्याजवळ असलेल्या भुलेश्वर इथे पाहायला मिळते. अंबेजोगाईमध्ये खोलेश्वर मंदिरातील एका भिंतीवर कोरलेला सुंदर शिलालेख मुद्दाम बघावा असा आहे. तसेच चौबारा या ठिकाणीसुद्धा एक शिलालेख आहे. त्याचसोबत मराठीतील आद्यकवी मुकुंदरायांची समाधी, दासोपंतांचे समाधी मंदिर आणि अंबेजोगाई लेणी खास करून पाहावीत अशी आहेत. मुकुंदरायांच्या समाधीस्थानी असलेला धबधबा याच दिवसात पाहायला मिळेल. या परिसरात अनेक मोर बागडताना पाहायला मिळतात.

सोलापूरला मुक्काम केला तर दोन दिवसांत छान ठिकाणे पाहता येतील. सोलापूरवरून नळदुर्गचा भक्कम किल्ला पाहण्याजोगा आहे. सोलापूरवरून विजापूर या आदिलशाहीच्या राजधानीच्या गावी जाता येते. गोलघुमट, इब्राहीम रोजा आणि तिथे असलेली सहस्रफणी पाश्र्वनाथाची मूर्ती अगदी न चुकता पाहावी. जैन र्तीथकर पाश्र्वनाथांच्या या मूर्तीच्या डोक्यावर नागाचा फणा आहे. त्याच्यावर एक खोलगट भाग असून त्यात दूध किंवा पाणी ओतले की ते नागाच्या विविध मुखांतून बाहेर पडते. एकाच पाषाणातून घडविलेल्या या मूर्तीच्या आतून इतक्या बारीक आणि सर्वदूर जाणाऱ्या पोकळ नळ्या कशा केल्या असतील हा एक कौतुकाचा आणि आश्चर्याचा भाग आहे.

तर यंदाच्या दिवाळीत अशी संपन्न महाराष्ट्राची भटकंती करायला हरकत नाही.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com