कावनई तीर्थ

निसर्गरम्य नाशिक जिल्ह्यतल्या इगतपुरी तालुक्यातील त्रिंगलवाडी आणि कावनई ही ठिकाणे खरे तर ट्रेकर्सना जास्त परिचित आहेत ती या दोनही ठिकाणी असलेल्या किल्ल्यांमुळे. इगतपुरीपासून जेमतेम १८ किलोमीटरवर असलेल्या या ठिकाणी ऐन पावसाळ्यात चिंब भिजण्यासाठी अवश्य जायला हवे. छोटेखानी असलेल्या किल्ल्यावर जायची वाट अगदी साधी आहे. किल्ल्यावर एक दरवाजा आणि पाण्याचे एक तळे दिसते. किल्ल्यावरून दिसणारा परिसर अतिशय सुंदर आहे. इथेच पायथ्याशी असलेल्या कावनई येथील कपिलधारा तीर्थ अत्यंत पवित्र समजले जाते. नाशिक इथे भरणारा कुंभमेळा हा पहिल्यांदा कावनई इथे भरत असे. त्यानंतर तो नाशिक इथे भरू लागल्याचे सांगतात. आजही कुंभमेळ्याला येणारे साधू प्रथम कावनई इथे येऊन कपिलतीर्थात स्नान करतात आणि नंतर नाशिककडे प्रयाण करतात.  मंदिर आणि त्यासमोर पाण्याचे मोठे कुंड यामुळे सगळा परिसर रम्य वाटतो. या निसर्गरम्य परिसराला अवश्य भेट द्यावी. डोंगररांगांनी वेढलेला हा सारा परिसर न्याहाळावा. पावसाच्या जोरदार सरी अंगावर घ्याव्यात. इगतपुरीपासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण. सरत्या पावसात गेले तर डोंगरांवरून कोसळणारे जलप्रपात आणि विविध रानफुलांचा अंथरलेला गालीचा बघितल्याचे समाधान नक्कीच मिळते. ऐन पावसाळ्यात ट्रेकर्स, निसर्गप्रेमी आणि धार्मिक पर्यटन करणारांसाठी हे ठिकाण अगदी आदर्श आहे.

kalyan gutkha factory marathi news, malanggad gutkha factory marathi news, gutkha thane marathi news, 7 lakh gutkha seized marathi news
कल्याण जवळील मलंगगडाच्या पायथ्याशी गुटख्याचा कारखाना, सात लाखांच्या गुटख्यासह तीन जण अटकेत
loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
tipeshwar sanctuary, archi tigress, cubs, attracting tourists, viral video, yavatmal, nagpur,
VIDEO : टिपेश्वरच्या जंगलात “आर्ची” आणि तिच्या बछड्याने पर्यटकांना लावले वेड
mhaisal yojana marathi news, mhaisal project sangli marathi news, mhaisal sangli jat taluka water issue marathi news
जतमध्ये पाण्यावरून राजकीय श्रेयवाद उफाळून आला

कपिलधार धबधबा

कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाडय़ातसुद्धा काही ठिकाणे ऐन पावसाळ्यात बघण्यासारखी आहेत. काहीशा लांबलेल्या विश्रांतीनंतर मराठवाडय़ात पुन्हा पावसाने जोर धरलेला आहे. अशाच वेळी बीडच्या अगदी जवळ असलेल्या कपिलधारा धबधब्याचे दर्शन मुद्दाम घेतले पाहिजे. सह्य़ाद्रीच्या पूर्वेकडे गेलेल्या बालाघाट डोंगररांगेच्या कुशीत वसले आहे कपिलधार तीर्थ आणि धबधबा. बीडच्या दक्षिणेला अंदाजे २० कि.मी. वर असलेल्या मांजरसुंबाजवळ हा धबधबा आहे. मांजरसुंबा हे ठिकाण भौगोलिकदृष्टय़ा महत्त्वाचे समजले जाते. बीड, अहमदनगर, अंबेजोगाई आणि उस्मानाबादला जाणारे रस्ते इथे एकत्र येतात. कपिलधार हे बीड जिल्ह्यातले एक निसर्गरम्य ठिकाण तर आहेच, त्याचबरोबर या ठिकाणाला धार्मिक महत्त्वसुद्धा प्राप्त झालेले दिसते ते इथे असलेल्या मन्मथ स्वामींच्या समाधीस्थानामुळे. वीरशैव कवी मन्मथ स्वामी हे लिंगायत संप्रदायातील एक महान सत्पुरुष होऊन गेले. त्यांचा जन्म मराठवाडय़ात नेकनूर इथे इ.स. १५६१मध्ये झाला. वीरशैव संत नागनाथ मरळसिद्ध यांचे ते शिष्य. मन्मथस्वामींच्या काव्यरचनेमध्ये ‘अनुभवानंद’ आणि ‘स्वयंप्रकाश’ या ओवी संग्रहाचा समावेश होतो. कपिलधार या ठिकाणी स्वामींनी इ.स. १६३१ मध्ये समाधी घेतली. इथे त्यांचे सुंदर असे समाधिस्थान आहे. तुलसीविवाहाच्या वेळी इथे पाच दिवसांची यात्रा भरते. अंदाजे ३०० फूट उंचीवरून कोसळणाऱ्या कपिलधार धबधब्याच्या पायथ्याशीच हे सुंदर ठिकाण आहे. मराठवाडय़ाच्या मध्यवर्ती असलेल्या या ठिकाणी अवश्य भेट द्यावी. अंबेजोगाई, परळी वैजनाथ या ठिकाणांच्या प्रवासात मांजरसुंबा इथले कपिलधार तीर्थ आणि मन्मथस्वामींची समाधी ऐन पावसाळ्यात आवर्जून बघावी.

 

रमणीय नीलकंठेश्वर

मस्त पावसात पुण्याजवळ अगदी वेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर नीलकंठेश्वरला जायलाच हवं. पुण्याच्या अगदी जवळ, जेमतेम ४० किलोमीटर अंतरावर पानशेतजवळ  एका डोंगरमाथ्यावर हे एक सुंदर ठिकाण आहे. कुठे आहे हे नीलकंठेश्वर आणि तिथपर्यंत कसे जावे असा प्रश्न पडणे साहजिक आहे. पुण्यातून वारजे मग पुढे कोंढवे धावडे त्यानंतर मांडवीमाग्रे जांभळी या गावी जावे. तिथून उजवीकडे वळून नीलकंठेश्वरच्या पायथ्याशी जाता येते. चांगला रस्ता इथपर्यंतच आहे. त्यामुळे इथे आपले वाहन ठेवून पुढे डोंगरावर जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने मस्त रमतगमत चालत जावे. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर घेत रमतगमत आपण डोंगराच्या माथ्यावर येतो. डोंगरमाथ्यावर सुंदर असे शिवमंदिर, त्याच्या भोवताली लावलेली झाडं, तसेच विविध देवता आणि अनेक ऋषी-मुनींच्या मोठय़ा आकारातल्या खूप मूर्ती दिसतात. प्रवेशद्वारापाशी हत्तींच्या भव्य आकृती आणि जवळच पाण्याचा एक हौद आहे. हे सगळं इथे उभं करण्याचं श्रेय जातं सर्जेमामा या व्यक्तीला. हे मूळचे दौंड तालुक्यामधील गलोडवाडीचे. परंतु वनखात्यात नोकरी करणाऱ्या मामांनी हे अत्यंत देखणं स्थान इथे निर्माण केलेलं आहे. इथून खडकवासला, पानशेत आणि वरसगाव अशा तीनही धरणाचे जलाशय दृष्टीस पडतात. त्याच प्रमाणे सिंहगड आणि तोरणा या दोन किल्ल्यांचे दर्शनपण इथून घडते. अगदी सहकुटुंब जावे असे हे ठिकाण आहे. पाण्यावरून येणारा गार वारा आणि चहूबाजूंनी दिसणारा अतिशय रमणीय निसर्ग इथे आल्याचे आणि एक अगदी वेगळे ठिकाण पाहिल्याचे समाधान निश्चितच मिळवून देतो.

आशुतोष बापट ashutosh.treks@gmail.com