मध्य प्रदेशातील थंडीचे एकमेव ठिकाण म्हणजे पचमढी. खोलगट बशीसारखा पठारसदृश प्रदेश. १०६७ फूट उंचीवरील पचमढी ‘सातपुडा की रानी’ म्हणून ओळखले जाते. जवळच असलेल्या पांडव लेण्यांवरून हे नाव पडले आहे. खाली पिपरिया स्थानकापासून वर डोंगरावर जाण्यासाठी एखादी जिप्सी गाडी किंवा मोटारबाइक भाडय़ाने मिळते. जागोजागचे धबधबे, साग, जांभळाच्या गर्द झाडीतून डोकावणारे सूर्यकिरणांचे कवडसे, पक्ष्यांचे आवाज ऐकत साधारणपणे पचमढीला दोन तासांत पोहोचता येते. सातपुडाच्या जंगलांनी वेढलेले हे ठिकाण अतिशय शांत आणि रम्य आहे. अनेक छोटय़ा गुहा, कडेकपारीत शिवशंकराची पवित्र स्थाने आहेत. मध्य प्रदेशातील पचमढी आणि भेडाघाट येथे काही हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. जवळच असलेला अप्सरा विहार, सनसेट पॉइंट, जटाशंकर, पांडव लेण्या, नंदी कोह पाहण्यासारखे आहेत.

वर्षभरात तसे पचमढीला कधीही जाऊ शकतो. पण साधारणपणे सप्टेंबर ते मेदरम्यान तेथे भेट देणे अधिक चांगले. भोपाळ आणि इंदोर जवळील विमानतळ आहेत. पुणे, इटारसी, दिल्ली, बंगळुरू, चेन्नईमाग्रे रेल्वेने पिपरिया स्टेशनपर्यंत जाता येते. नागपूर, जबलपूर, भोपाळहून काही तासांत गाडीने पचमढीला पोहोचणे शक्य आहे. राहण्यासाठी उत्तम हॉटेल्स असलेले पचमढी प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या पसंतीस उतरेल असे थंड हवेचे ठिकाण आहे. डोंगरावरील सपाट पठार महाबळेश्वरच्या टेबल लँडची आठवण करून देतो.

mayawati west up statehood
उत्तर प्रदेशचा तुकडा पडणार? मायावतींचे पश्चिम उत्तर प्रदेशाचे आश्वासन
Suspect from Madhya Pradesh arrested in Satpur
नाशिक : मध्य प्रदेशातील संशयितास सातपूरमध्ये अटक
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…

पचमढीपासून पाच तासांवर भेडाघाट मार्बलरॉक आहे. पौर्णिमेच्या रात्री संगमरवरी शिळेमधून नर्मदा नदीच्या शांत आणि विस्तीर्ण पात्रातून  केलेली दीड -दोन तासांची नौकासहल केवळ अवर्णनीय. सोबतच्या गाइडचे रसभरीत काव्यात्मक स्थळमार्गदर्शन सफर अजूनच श्रवणीय करते. नर्मदेकाठचे उंचावरील चौसष्ट योगिनी मंदिर पाहण्यासारखे आहे. दहाव्या शतकातील वर्तुळाकार ६४ कोरीवबद्ध योगिनीच्या मूर्तीच्या मध्यभागी शिवपार्वतीची नंदीवर बसलेली मूर्ती आहे. संपूर्ण भारतात एकमात्र असे  शिवपार्वतीचे हे मंदिर आहे. राष्ट्रपती भवनाची कल्पना या स्थापत्याकलेवरून घेतल्याचे बोलले जाते. जवळच नर्मदेच्या गौरीघाटावरची सायंआरती व दीपपूजन आपणास थेट गंगामयाच्या आरतीची अनुभूती देते.

सोनाली चितळे

sonalischitale@gmail.com