बाजारात आलेल्या महागडय़ा सायकलींविषयी आता अनेकांमध्ये आकर्षण निर्माण होऊ लागले आहे. मुख्य म्हणजे ती गिअरची आहे का? असा प्रश्न हमखास विचारला जातो. अनेकजण तर एवढय़ावरच थांबत नाहीत तर आगाऊपणा करून सायकल उभी असतानाच गिअर लिव्हिर खटाखट दाबायला सुरुवात करतात. तसेच अशा सायकलींचे सर्व भाग सहज एकमेकांपासून वेगळे करता येतात. त्यामुळे या सायकली चोरांसाठी पूरकच म्हणाव्या लागतील. अर्थातच सायकलच्या सुरक्षेच्या कारणास्तव या सायकली बिल्डिंग किंवा चाळीच्या सार्वजनिक पाìकगमध्ये पार्क करता येत नाहीत. अशा वेळी घरामध्येच आपल्या नजरेसमोर सायकल ठेवण्यावाचून पर्याय नसतो.

पण जवळपास सर्वच शहरांतील घरामध्ये मोकळ्या जागेची मोठी अडचण असते. पण सायकलप्रेमींनी या जागेच्या अडचणीवरही मात करत सायकल घरात ठेवण्यासाठीही अनेक पर्याय शोधून काढले आहेत. आपल्याकडे अजून सायकल पाìकगचा इंटिरीअर डिझाइनमध्ये तितकासा विचार केला जात नाही. परंतु, परदेशात मात्र जागेच्या आणि सायकल वापराच्या अनुषंगाने घरात सायकल ठेवण्यासाठी इंटिरीअरचा मोठय़ा खुबीने विचार केला जातो. घरातील हॉल किंवा बेडरूममध्ये सायकल कशी ठेवायची इथपासून किचनमधील मोकळ्या जागेचासुद्धा सायकल लटकवण्यासाठी कसा वापर करू शकता याबाबतचे अनेक पर्याय तुम्हाला दिसतील. घरात सायकल ठेवण्यासाठी अडगळीच्या वाटणाऱ्या जागांचा वापर करता येतो. पायऱ्यांच्या खालची जागा, बेडरूमचा कोपरा; एवढंच काय तर पुस्तकं ठेवण्याचा खणही अशा पद्धतीने डिझाइन करता येतो की ज्यावर सायकल लटकवता येऊ शकते. अगदी घरातील छपरालासुद्धा सायकल लटकवण्यासाठी अनेक हँगर सध्या बाजारात उपलब्ध आहेत. दोरीच्या साहाय्याने ते खाली करून त्यामध्ये सायकल लावून घरातील अवकाशाच्या पोकळीत आपल्या डोक्यावर सायकल पार्क करता येऊ शकते. तुमची सायकल दिसायला आकर्षक असेल तर ती तुमच्या इंटिरीअरमध्ये भरच घालेल.

सायकलच्या एखाद्या जुन्या दुकानामध्ये गेल्यास सायकली एकमेकांना खेटून लावलेल्या दिसतात. पण अत्याधुनिक सायकलींच्या सायकल स्टोअरमध्ये गेलात तर त्यांची सायकल लावण्याची पद्धत वेगळी आहे असं दिसतं. भिंतीला असलेल्या हुकमध्ये मागचा टायर अडकवून त्या बिनधास्तपणे खाली सोडून दिलेल्या असतात. भिंतीला सायकली लावल्यामुळे जमिनीवरील जागाही मोकळी मिळते तिथे आणखी काही सायकली सुटसुटीतपणे उभ्या करता येतात. त्यामुळे कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सायकली ठेवता येतात. आपल्या कार किंवा बाइक पाìकगच्या सुरक्षित जागेच्या छपराचा सायकल लटकविण्यासाठी वापर करण्यास हरकत नाही. लांबच्या ठिकाणी सायकलची वाहतूक करणं पूर्वी फार जिकिरीचं होतं. तुमची गाडी असली तरी तिच्या डिक्कीमध्ये किंवा छपरावर टाकून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सायकल नेणं हा प्रकार थोडा तापदायकच होता. परंतु आता सायकलच्या वाहतुकीसाठी नामी शक्कल लढवण्यात आली आहे. सायकलसाठी खास अशी सायकल कॅरिअर डिझाइन करण्यात आली असून कारच्या टपावर ती सहज बांधून संपूर्ण सायकल त्या रॅकमध्ये जशीच्या तशी उभी करून सुरक्षितपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकते.

प्रशांत ननावरे

prashant.nanaware@expressindia.com