कधी कुणी रस्त्याच्या मध्येच आले, कधी अचानक दिसलेली चांगली गोष्ट टिपण्यासाठी, चढाईवर सायकलला सावरण्यासाठी तर कधी उतारावर गती कमी करण्यासाठी सायकलला लगाम लावावाच लागतो. त्या लगामाला सायकलच्या प्रचलित भाषेत ‘ब्रेक्स’ असं म्हणतात. दुकानात नवीन सायकल विकत घेण्यासाठी गेलात आणि त्याला ब्रेक नसतील तर तुम्ही ती विकत घ्याल का? नाही ना? उलट आता तर मुलांना साधे ब्रेक्सही नको असतात. त्यांना डिस्क ब्रेक्स हवे असतात. त्यामुळे सायकलचा सर्वात महत्त्वाचा भाग असलेल्या या ब्रेक्सचा प्रवास कसा होता, त्याचे प्रकार कोणते या विषयी आपण थोडक्यात जाणून घेऊ या.
कार्ल ड्रेस या जर्मन संशोधकाने १८१७ मध्ये लौफमशीनचा (चालणारे यंत्र) शोध लावला. डॅण्डी हॉर्स या टोपणनावानेही ते प्रसिद्ध आहेत. आजच्या दुचाकीचे (सायकल आणि मोटरसायकल) ते पहिले रूप. विशेष म्हणजे या पहिल्या दुचाकीला कुठलंही यंत्र सोडा, साधे पायडलसुद्धा नव्हतं. दोन चाकं आणि पायांच्या मदतीने ही दुचाकी पुढे दामटवली जात असे. त्यानंतर पहिल्या पायडल असलेल्या बोनशेकर या सायकलीमध्ये स्पून ब्रेकचा वापर प्रथम करण्यात आला. यामध्ये पुढच्या चाकाच्या वर चमच्यासारखी पट्टी असे आणि त्याची जोडणी उजव्या हाताच्या हँडलला केलेली असे. ती कळ हाताने घट्ट आवळताच चमच्याची पट्टी आणि टायर यांचे घर्षण होऊन सायकलचा वेग मंदावत असे. हाच सायकलचा पहिला ब्रेक.
काही अपवाद वगळता सर्व सायकलींना पुढच्या आणि मागच्या अशा दोन्ही चाकांना ब्रेक्स असतात. यापकी कोणताही ब्रेक आयत्या वेळी निकामी झाला तर एका ब्रेकवर वेळ मारून नेता येऊ शकते. पण अशा परिस्थितीत आपण अपघाताला निमंत्रण देत असतो. त्यामुळे सायकल चालवायला सुरुवात करण्यापूर्वी सायकलचे ब्रेक्स तपासून पाहणं गरजेचं आहे. लांब पल्ल्याच्या सायकलिंगसाठी ज्या प्रकारचे ब्रेक्स तुमच्या सायकलला आहेत त्याची पूर्ण माहिती असणं आणि ते दुरुस्तीचं सामान सोबत असणं अत्यंत आवश्यक आहे.
ब्रेकची रचना
साध्या भारतीय बनावटींच्या सायकलींना पुढचा ब्रेक उजव्या हाताशी आणि मागचा ब्रेक डाव्या हाताशी असतो. मात्र, नवीन परदेशी बनावटींच्या गीअरच्या सायकलींना पुढचा ब्रेक डाव्या आणि मागचा ब्रेक उजव्या हाताशी असतो. यामागचं नेमकं कारण काय? तर गीअरच्या सायकलींमध्ये उजव्या हाताशी मागचे गीअर्स बदलण्याची आणि डाव्या हाताशी पुढचे गीअर्स बदलण्याची व्यवस्था असते. त्यामुळे हँडलवर गीअर आणि ब्रेक वायर्स एकत्रित करून त्यांचे कार्य सुलभ होण्यासाठी अशा प्रकारची रचना करण्यात आलेली आहे.
ब्रेक्स कुठे आणि कसे वापरावेत?
ब्रेक्सचा वापर केवळ सायकल थांबवण्यासाठी नाही तर वेग कमी करण्यासाठीही असतो.
मागचा किंवा पुढचा ब्रेक एकाएकी न मारता दोन्ही ब्रेक हळुवारपणे एकत्रित मारावेत. त्याने रिम आणि डिस्कचे आयुष्य वाढते.
उतरणीवर पुढचा ब्रेक एकाएकी मारू नये. त्यामुळे सायकल उलटून अपघात होऊ शकतो.
चिखलातून किंवा वाळूमधून सायकल चालवल्यानंतर टायरची रिम आणि ब्रेकवरील माती पाण्याने धुऊन स्वच्छ करावी.
ब्रेक्सचे प्रकार
रिम ब्रेक्स : रिम ब्रेक्स हे सर्वात हलके असतात. कारण चाकाची रिम ही ब्रेकच्या डिस्कचंही काम करते. रिम ब्रेक्सचं काम सुरळीत चालण्यासाठी चाक सुस्थितीत असण्याचीही आणि त्याची नीट काळजी घेण्याची गरज आहे. रिम ओली असेल तर जोपर्यंत ब्रेक पॅड त्या संपूर्ण रिमला कोरडं करत नाहीत तोपर्यंत ब्रेक्सचा योग्य परिणाम दिसून येत नाही. या ब्रेक्समध्ये ब्रेक पॅड सर्वात महत्त्वाचे असतात. बाजारात वेगवेगळ्या आकाराचे, जाडीचे आणि डिझाइनचे ब्रेक पॅड उपलब्ध आहेत.
ड्रम किंवा हब ब्रेक्स : सर्व प्रकारच्या हवामानासाठी उत्तम ब्रेक्स म्हणजे ड्रम किंवा हब ब्रेक्स. नेहमीच्या वापरासाठीच्या सायकलींमध्ये हे ब्रेक्स पाहायला मिळतात. चाकाच्या हबमध्ये ड्रम ब्रेक्स बसविलेले असल्याने त्याला हब ब्रेक्स असेही म्हणतात. यामध्ये जितका मोठा ड्रम असेल तितके ते ब्रेक्स जास्त परिणामकारक ठरतात.
डिस्क ब्रेक्स : हे ब्रेक्स सर्वात आधुनिक प्रकारात मोडतात. हल्ली बाजारात नव्याने दाखल होणाऱ्या सर्वाधिक सायकलींना डिस्क ब्रेक्स असल्याचं दिसतं. चाकाच्या मध्यभागी असलेली डिस्क ही ब्रेकिंगचं काम अतिशय परिणामकारकपणे करते. तसेच टायरची टय़ूब किंवा चाक बदलण्यासाठी डिस्क ब्रेक्स अतिशय सोपे पडतात. आधुनिक सायकलींमध्ये डिस्क ब्रेक्सची लोकप्रियता मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. परंतु कोणत्याही सायकलला डिस्क ब्रेक्स लावता येत नाहीत. त्यासाठी सायकलच्या फ्रेमला त्यासाठीची तरतूद असावी लागते. काही सायकलींमध्ये दोन्ही चाकांपकी केवळ एकाच चाकाला डिस्क ब्रेक्स असतो. तर काही सायकलींमध्ये दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्सची सुविधा असते.
कोस्टर ब्रेक्स : विरुद्ध दिशेला म्हणजे मागच्या बाजूला पायडलिंग केल्यानंतर कोस्टर ब्रेक्स लागतात. हे ब्रेक्स केवळ मागच्या चाकाला लावता येतात. कोस्टर ब्रेक्स हे दुरुस्तीसाठी अतिशय सोपे असतात. असं असलं तरी हे ब्रेक्स केवळ सपाट रस्त्यावरच अधिक परिणामकारकपणे काम करतात. लांब आणि वळणावळणाच्या उतरणीवर हे ब्रेक्स फारसे कामाचे नाहीत.
फिक्स्ड गीअर किंवा फिक्सी : या सायकलमध्ये पुढचा किंवा मागचा असा कोणताच ब्रेक नसतो. एवढंच काय मागच्या चाकाला चेन फिरण्यासाठी फ्रेमच्या बाहेर वेगळी चकती नसून ती चकती हबलाच जोडलेली असते. ही अशा प्रकारची जोडणी सायकलचा ब्रेक म्हणूनही काम करते. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्कशीतील सायकल. ती सायकल पुढे आणि मागेही चालते आणि त्यांना गरजेप्रमाणे ब्रेकही लावता येतो.
प्रशांत ननावरे prashant.nanaware@expressindia.com

Helper wanted in momo shop salary
मोमोच्या दुकानात हवाय मदतनीस, जाहिरात होतेय व्हायरल, पगाराचा आकडा पाहून प्रत्येकाला हवी आहे ही नोकरी
spmcil recruitment 2024 jobs in security printing and minting corporation of India ltd
नोकरीची तयारी : सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमधील संधी
insta facebook shaheed word ban
इन्स्टाग्राम, फेसबुकवर शहीद शब्द लिहिण्यावर बंदी? का झाला असा निर्णय?
preventive chemotherapy
कोण घेतंय ‘ही’ केमोथेरपी? ठरणार का ती कर्करुग्णांसाठी वरदान? तज्ज्ञ काय सांगतात?