प्रवास हा प्रत्येकालाच आवडतो. मग कोणी आपल्या खासगी वाहनातून करतो तर कोणी बस, रेल्वे, विमान अशा सार्वजनिक वाहनातून. प्रत्येकाची प्रवासाची व्याख्याही निराळी. काहींना प्रसिद्ध स्थळांना भेटी द्यायला आवडतं तर अनेकजण खिडकीच्या बाहेर डोकं काढून आजूबाजूच्या गोष्टी न्याहाळण्यात धन्यता मानतात. मात्र, या सगळ्यांपेक्षा एक वेगळी जमात या भूतलावर अस्तित्वात आहे आणि ती म्हणजे सायकलस्वारांची. या अवलियांना प्रवासाची प्रचंड आवड असते. आणि ती भागवण्यासाठी ते वापर करतात सायकलचा. म्हणजे आपल्याला पाहिजे ते सामान सायकलवर लादायचं आणि कधी ठरल्याप्रमाणे तर कधी वाट मिळेल तिथे पेडल करत सुटायचं. वाटेत मिळेल त्या पदार्थाचा आस्वाद घ्यायचा आणि कंटाळा आला की थांबायचं. स्पर्धा, प्रवास किंवा व्यायामासाठी सायकलिंग न करता स्वत:च्या आनंदासाठी, साहसासाठी, आपल्याला पाहिजे तितके दिवस आणि आवडत्या ठिकाणी सायकलिंग करणे, अशी सायकल टुरिंगची साधी सरळ व्याख्या करता येईल.
सायकल टुरिंग या प्रकाराबद्दल आपल्याला आत्ता फार अप्रूप वाटत असलं तरी जगभर गेल्या एक शतकाहून अधिक काळ तो चांगलाच रुजलेला पाहायला मिळतो. १८७८ सालीच ब्रिटनमध्ये ‘बायसिकल टुरिंग क्लब’ची स्थापना करण्यात आली होती. नंतर त्याचं नामकरण ‘सायकलिस्ट टुरिंग क्लब’ असं करण्यात आलं. ही जगातील सर्वात जुनी राष्ट्रीय पर्यटन संस्था मानली जाते. थॉमस स्टीव्हन या सॅन फ्रॅन्सिस्को क्रॉनिकलसाठी लिहिणाऱ्या लेखकाने १८८४ साली दोन वर्षे सायकलिंग करून लिहिलेल्या लेखांचं तर दोन खंडांमध्ये एक हजार पानांचं पुस्तक त्याकाळी प्रसिद्ध झालं होतं. सायकल टुरिंगचा इतिहास इतका जुना आहे. सायकलचं बदललेलं स्वरूप, सायकलिंगविषयी झालेला सकारात्मक प्रचार, सार्वजनिक जीवनात वाढलेला सायकलचा वापर यामुळे पहिल्या महायुद्धानंतर सायकल टुरिंगचं प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतं. याच काळात एका फ्रेंच पर्यटकाला आपल्या पाच वर्षांच्या सायकल टुरिंगबाबत खूप अभिमान वाटत होता. पण त्याचा सर्व अभिमान गळून पडला जेव्हा तो आपल्या प्रवासात एका ऑस्ट्रेलियन सायकलस्वाराला भेटला जो गेली सत्तावीस वर्षे सायकल टुरिंग करत होता. दुसऱ्या महायुद्धात आपलं घर गमावल्यानंतर एका जर्मन सायकलस्वाराने सायकल टुरिंग करायचं ठरवलं आणि १९५९ साली निघालेला हा पठ्ठय़ा अठरा वर्षे सायकलवरून जगभर प्रवास करत होता. या काळात त्याने ज्या देशांनी आपल्या सीमा बंद करून ठेवल्या होत्या ते देश सोडून तब्बल १५९ देशांना भेटी दिल्या. मुख्य म्हणजे प्रवासादरम्यान एकूण २३१ वेळा चोरांनी त्याला लुटलं आणि त्याच्या पाच सायकलीसुद्धा चोरीला गेल्या.
सायकल हे तुम्हाला स्वावलंबी बनवतं जे इतर कोणतंही वाहन करू शकत नाही. त्यासाठी कोणतंच इंधन लागत नाही फक्त लागतं सायकलच्या थोडय़ा तांत्रिक गोष्टीचं ज्ञान. आजुबाजूच्या गोष्टी न्याहाळत तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी थांबू शकता. त्याचप्रमाणे हे असं एकमेव वाहन आहे, जिथे तुमच्याकडे पाहून लोकांना आपणहून तुमच्याशी मैत्री करावीशी वाटते. त्यांना तुमच्या साहसाचं अप्रूप वाटत असतं. हल्ली तंत्रज्ञानामुळे अनेकजण समाजमाध्यमांवर लिहितात.
सायकल टुरिंगचं स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे. ऑनलाइन कम्युनिटीज तयार होत आहेत. या सगळ्याविषयी आपण पुढील काही भागात सविस्तरपणे माहिती घेऊ.
प्रशांत ननावरे
prashant.nanaware@expressindia.com
Twitter – @nprashant