विविधतेनं नटलेल्या आपल्या महाराष्ट्रातील नैसर्गिक विविधतेबाबत बोलताना नेहमीच विदर्भातल्या पानगळी अरण्यांपासून ते भीमाशंकरच्या दाट पावसाळी रानापर्यंत आणि कासच्या पठारावरील रानफुलांच्या रांगोळीपासून ते सह्य़ाद्रीच्या रांगांतील पक्षीवैभवापर्यंत बोललं जातं. पण महाराष्ट्राच्या जैवविविधतेमध्ये सर्वात मोलाची भर घालणाऱ्या सागरकिनाऱ्यांची मात्र आठवणच होत नाही. महाराष्ट्राला पालघर-डहाणू ते मालवण-देवबागपर्यंत चांगला सातशे- सव्वासातशे किलोमीटर लांबीचा सागरकिनारा लाभलेला आहे. या किनाऱ्यावर सागरी किल्ले आहेत त्याचप्रमाणे हे किनारे म्हणजे महाराष्ट्राच्या जैवविविधतेचा खजिना आहेत. सर्वसाधारणपणे कोकणात पर्यटनाला गेल्यावर समुद्रावर जायचं, नारळपाणी प्यायचं, पाण्यात दंगामस्ती करायची, मावळत्या सूर्याचे फोटो (आता सेल्फी!) काढायचे, झालंच तर ताज्या मासळीवर ताव मारायचा हेच काय ते आपल्याला माहितेय. पण याच सागरकिनाऱ्यांच्या साथीने शंख-िशपल्यांपासून ते तेथील जैवविविधतेपर्यंत अनेक गोष्टी आपल्याला साद घालत असतात.

दिवाळीनंतरच्या भटकंतीमध्ये सागरशास्त्राचा अभ्यासक आणि संशोधक अभिषेक साटम याच्याबरोबर नागांव, रेवदंडा, बोर्लाई या सागरकिनाऱ्यांवर भ्रमंती करायचा योग आला आणि सागरातील अनोख्या जीवसृष्टीचा खजिनाच खुला झाला. आपल्या अवतीभोवतीच्या जमिनीवरच्या जगातली प्राणीसृष्टी जशी कीटक, सरपटणारे प्राणी, उडणारे पक्षी, सस्तन प्राणी, वनस्पती यांनी बनलेली आहे तशीच सागरी जीवसृष्टी एकपेशीय प्राण्यांपासून ते कवचधारी प्राण्यांपर्यंत आणि सागरी वनस्पतींपासून ते छोटय़ा संधीपाद प्राण्यांपर्यंत विविधतेने नटलेली आहे. सागरी जीवसृष्टीच्या अभ्यासकांसाठी नेरिटिक आणि ओशनिक अशा दोन मोठय़ा विभागांमध्ये ही सागरी सृष्टी विभागलेली आहे. नेरिटिक भाग म्हणजे जिथं सूर्याची किरणं सागरतळापर्यंत पोहोचतात असा भाग, तर ओशनिक झोन म्हणजे त्यापुढचा अधिक खोल भाग. आपल्यासारख्या हौशींसाठी नेरिटिक भागातील सागरी जीवसृष्टीही थक्क करणारी असते. या भागालाच इंटर टायडल झोन असेही म्हणतात. कारण भरतीला हा भाग पाण्याखाली जातो तर ओहोटीला या भागातील पाणी ओसरलेलं असतं आणि त्यामुळे ओहोटीला इथला खजिना उघडय़ावर आलेला असतो. आपल्याकडे किनाऱ्यांचे वाळूचा, खडकाळ आणि चिखलाने भरलेला असे तीन प्रकार पाहायला मिळतात. यातला खडकाळ किनारा म्हणजे सागरात उघडलेली खिडकीच जणू. कारण या खडकांवरील खड्डय़ांमध्ये, फटींमध्ये आणि खोलगट भागांमध्ये जे पाणी साचून राहतं त्यात तुम्हाला खेकडय़ांपासून ते माशांपर्यंत ओळखीचे सागरी रहिवासी जसे दिसतात तसेच सी निमोनपासून ते स्पंजपर्यंतचे सहसा लक्षात न येणारे सागरी जीवही पाहायला मिळतात.

कोणत्याही सागरकिनाऱ्यावर मग ती गिरवाग चौपाटी असो किंवा अक्षी नागावचा किनारा, सर्वात आधी आपल्याला नेहमी काय दिसतं तर वाळूत विखुरलेले शंख, िशपले. निमुळत्या आकाराचे, सुळकेदार, कधी काटे काटे असलेले शंख आपलं लक्ष त्यांच्या आकाराने आणि रंगाने चटकन वेधून घेतात. शास्त्रीय भाषेत हे शंख म्हणजे गॅस्ट्रोपोड्स. एखाद्या जाणकाराबरोबर सागरकिनाऱ्यावर फिरलं की या शंखांना नावं असतात आणि हे शंख म्हणजे गोगलगाईसारख्या जीवांची घरं आहेत हे कळतं. नाही तर ‘अभ्यासाच्या नावाने शंख आहे नुसता’ हीच आपल्याला शंखाची ओळख असते. पण समुद्रात हे शंख म्हणजे या प्राण्यांचं घर, संरक्षक आवरण आणि शरीराचे भागही असतात. आता यातही मूळचे आणि उपरे असा प्रकार असतो बरं. म्हणजे शंखातला मूळचा जीव मरण पावला की लगेच हर्मिट क्रॅब त्यावर कब्जा करतो. जसं जसं हर्मिट क्रॅबचं शरीर वाढत जातं तसा तो दुसरा अधिक मोठय़ा आकाराचा शंख बळकावतो. हर्मिट क्रॅबचं हे वागणं पाहिल्यावर ‘आयत्या शंखावर खेकडोबा’ अशीच म्हण मराठीत हवी होती असं वाटतं. एखाद्या स्वच्छ (अलीकडे जरा कमीच आहेत) सागरकिनाऱ्यावर ओहोटीच्या वेळीला चक्कर मारली तर नेरिता, कोनस, ट्रोचस, टबरे, नेटिका, फ्रॉग शेल, ऑलिव्हा (यांना प्रमाण मराठी नावे नाहीत!) असे शंख सहज पाहायला मिळतात. या शंखांचे सोबती म्हणजे िशपले, ज्यांना शास्त्रीय भाषेत बाय वाल्वज म्हटलं जातं. िशपल्यांशी सर्वसामान्यांचा संबंध येतो तो जेवणात तिसऱ्या मसाला खाण्यापुरता. पण या िशपल्यांचे विविध प्रकार आहेत. अर्का, डोनेक्स, काíडयम असे काही प्रकारचे िशपले सर्वत्र आढळतात. शंख-िशपले गोळा करताना किनाऱ्यावरच्या एका रांगोळीकडे आपोआप लक्ष जातं. ही रांगोळी असते वाळूच्या चिंटुकल्या गोळ्यांची. कधी एखाद्या फुलाचा आकार तर कधी एखाद्या देशाचा नकाशा या ठिपक्यांमधून साकारलेला पाहायला मिळतो. ही कारागिरी असते सँड बबलर क्रॅबची. आपल्या करंगळीच्या नखापेक्षाही आकाराने लहान असलेला हा खेकडा आपल्या तोंडात किनाऱ्यावरची वाळू घेतो, त्यातील पोषक द्रव्ये खाऊन उरलेल्या वाळूचा फुगा- बबल करून बाहेर टाकतो. कोकणातल्या काही किनाऱ्यांवर स्टार फिश अर्थात तारा मासा हमखास दिसतो. आपल्या समरूप आकाराने हा पाच पायांचा (की हातांचा?) जलचर प्राणी उठून दिसतो. िशपल्याच्या आतला जीव हे याचं मुख्य अन्न असतं, आपल्या पायांनी िशपल्यावर पकड घेऊन त्याचं तोंड जबरदस्तीने उघडून स्टार फिश त्यात आपल्या शरीरातून जो पाचक रस सोडतो, त्यामुळे आतला जीव विरघळतो आणि मग स्टार फिश त्याला शोषून खातो.

किनाऱ्यावरच्या फेरफटक्यात चिटन, फ्लॅट वर्मसारखे आकाराने अगदी लहान अनोखे जीव पाहायला जाणकार नजरच लागते. खडकाळ किनाऱ्यावरच्या पाण्याच्या डबक्यात नीट डोकावून पाहिलेत तर अतिशय नाजूक असे सी निमोन पाहायला मिळते. एखाद्या कोमल फुलासारखा दिसणारा हा जलचर त्याच्या मोहक रूपाने लक्ष वेधून घेतो. मात्र सागरकिनाऱ्यावरचे सगळेच जलचर फक्त मोहक वा सुंदर नसतात बरं, उदाहरणार्थ, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर नावाने ओळखला जाणारा जेली फिश. मनमोहक रंग आणि आकर्षक स्वरूपाचा हा जलचर तितकाच त्रासदायक दंश करीत असल्याने माणसासाठी धोकादायकच आहे.

पण एकुणात नेहमी आपल्यासमोर असूनही आपल्या नजरेत न येणारा हा सागरातील ठेवा माहीतगाराबरोबर पाहायला हवाच. कारण त्याशिवाय त्याच्या संवर्धनासाठी आपण काही करणार नाही. आज मानवी विष्ठेपासून ते घातक रसायनांपर्यंत आणि अविनाशी प्लॅस्टिकपासून ते मानवनिर्मित कचऱ्यापर्यंत सारं काही समुद्रात लोटून या रत्नाकराला आपण जणू डम्पिंग ग्राऊंड बनवून टाकलं आहे. आपल्या अशा वागण्याने आपण किती प्रकारच्या सागरी जीवांचे वसतिस्थान उद्ध्वस्त करीत आहोत हे कळण्यासाठी तरी सागरकिनाऱ्यांवरची ही दर्याची दौलत पाहायला हवी. त्यासाठी दातिवरे, सफाळा, अर्नाळा, पालघर, अलिबाग, अक्षी, नागाव, मुरुड, आंजल्रे, वेळास, निवती, मालवण, वेंगुल्रे, चिवले, रेडी अशा कोकणातल्या सागरकिनाऱ्यांबरोबरच मुंबईतले हाजी अली, कार्टर रोड, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी हे किनारेही उत्तम आहेत. मग चला दर्याची दौलत पाहायला आणि जपायलाही.

makarandvj@gmail.com