28 February 2020

News Flash

हम्पीमधील गुहाचित्रे

समृद्ध विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर हंपी हे जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

समृद्ध विजयनगर साम्राज्याच्या राजधानीचे शहर हंपी हे जागतिक वारसास्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. हम्पी म्हणजे विरुपाक्ष मंदिर, खांबातून संगीताचे स्वर उमटणारे विठ्ठल मंदिर आणि त्या मंदिरात असलेला अतिशय देखणा असा दगडी रथ, उग्र नरसिंह यासाठी जगप्रसिद्ध आहे. पण हम्पीच्या समोर तुंगभद्रा नदीच्या दुसऱ्या तीरावर असलेल्या अनेगुंदी इथे एक मानवनिर्मित आश्चर्य पर्यटकांची वाट पाहात उभे आहे. ते म्हणजे आदिमानवाची शैलश्रये आणि तिथे चितारलेली रंगीत चित्रे! खरं तर आदिमानवाची शैलगृहे आणि त्यातली रंगीत चित्रे असं म्हटलं की मध्य प्रदेशमधील जगप्रसिद्ध भीमबेटका गुहाच डोळ्यांसमोर येतात. पण इथे अनेगुंदीलासुद्धा अशीच शिलाश्रये आहेत आणि त्यामध्ये खूप सुंदर अशी रंगीत चित्रे बघायला मिळतात. प्रागतिहासिक मानवाच्या पाउलखुणा आज आपल्याला अनेगुंदीमध्ये या शैलगृहाच्या रूपाने पाहायला मिळतात. ‘ओणाके किंडी’ असे स्थानिक नाव असलेल्या गुहा अगदी न चुकता पाहिल्या पाहिजेत. हे अगदी वेगळ्या प्रकारचे वारसास्थळ आहे. काही मानवी आकृत्या, काही बलासारखे प्राणी, चंद्र-सूर्य अशा निरनिराळ्या चितारलेल्या कलाकृती पाहून थक्क व्हायला होते. या टेकडीच्या माथ्यावर मेगालीथिक दफनभूमी आहे. तीन दगडी फरशा उभ्या आणि एक मोठी चौथी दगडी फरशी त्या तीनवर पालथी अशी ही पद्धत असते. याला इंग्रजी डोलमेन्स असा शब्द आहे. हे ठिकाण अनेगुंदीपासून अंदाजे १० कि.मी. अंतरावर आहे. परंतु शैलाश्रय आणि त्यातील चित्रांचे हे ठिकाण अनेगुंदीपासून फक्त दोन किलोमीटरवर आहे. स्थानिक लोक याला एलू गुड्डा असे म्हणतात. इथेच एक दगडात उमटलेला मोठा पायाचा ठसा पाहायला मिळतो. आदिमानवाचा पाय किंवा स्थानिक याला देवाचे पाऊल असे म्हणतात. अगदी वेगळे आणि आश्चर्यकारक असे हे ठिकाण आहे. इथली रंगीत चित्रे पाहून आपण स्तिमीत होतो. अनेगुंदीला यासाठी तरी नक्कीच भेट द्यायला हवी. गावातून या ठिकाणी जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध असतात. टेकडीच्या पायथ्यापर्यंत रिक्षा जाते. तिथून पुढे काही अंतर चालत जावे लागते. तसेच इथे एका ठिकाणी अजून एक खासियत आहे.  ती म्हणजे काही चित्रे ही त्यावर पाणी टाकले तरच उठून दिसतात. पाणी वाळले की पुन्हा ती चित्रे दिसेनाशी होतात. इतके सुंदर आणि आश्चर्यकारक ठिकाण आपल्या पूर्वजांनी राहण्यासाठी वापरले होते, ते सुंदर चित्रांनी सजवले होते. आपण आपल्या हंपीच्या भेटीमध्ये मुद्दाम जाऊन या कलाकृती अवश्य पाहिल्या पाहिजेत.

ashutosh.treks@gmail.com

First Published on December 14, 2016 1:40 am

Web Title: cave paintings in hampi
Next Stories
1 दुचाकीवरून : भविष्यातील सायकल
2 वाइनच्या प्रदेशात
3 जायचं, पण कुठं? : धाराशीव लेणी
Just Now!
X