08 July 2020

News Flash

वन पर्यटन : चांदोली राष्ट्रीय उद्यान

चांदोली राष्ट्रीय उद्यानात वसंत सागर जलाशय, कोकणदर्शन, झोळंबी सडा अशी पर्यटनस्थळे आहेत

२०१० मध्ये कोयना व चांदोली मिळून सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला.

सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतील जैववैविध्य जपण्यासाठी गेल्या १५-२० वर्षांत अनेक प्रयत्न सुरू आहेत. त्यांपैकीच एक सर्वात महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्प. सह्य़ाद्रीची डोंगररचना आणि त्याला मिळालेली घनदाट अरण्यांची जोड यामुळे एकूणच कोयना आणि चांदोली परिसराला एक आगळेवेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. १९८५ मध्ये चांदोलीला अभयारण्याचा दर्जा मिळाला. त्यानंतर २००४ मध्ये ते राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले व २०१० मध्ये कोयना व चांदोली मिळून सह्य़ाद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून विशेष दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर युनेस्कोनेही त्याचा वारसा यादीत समावेश केला आहे. व्याघ्र प्रकल्पानंतर या अभयारण्यातील वावरावर अनेक बंधने आली असली तरी बफर झोनमध्ये काही ठिकाणी आपणास जाता येऊ शकते. तेथून नजरेस पडणाऱ्या जंगलावरून एकूणच या अभयारण्याचा अंदाज सहज येऊ शकतो.

चांदोलीत ऐन, बेहडा, जांभूळ, हिरडा, पांगारा, फणस, माड, उंबर, आवळा, आंबा, आपटा असे वृक्ष आणि अडुळसा, कढीिलब, शिकेकाई, तमालपत्र अशा वनऔषधी आहेत. जलपर्णी, घटपर्णी, दविबदू यांसारख्या दुर्मीळ कीटकभक्ष्यी वनस्पतीही या राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. पट्टेवाला वाघ, बिबटय़ा, गवे, अस्वल, रानडुक्कर, सांबर, वानर, सायाळ, भेकर, ससे, शेकरू, खवले मांजर, भुंकणारे हरिण, काळवीट यांसारख्या अनेक वन्यजीवांचा इथे वावर आहे. फुलपाखरांच्या असंख्य प्रजाती इथे बघायला मिळतात.

चांदोली राष्ट्रीय उद्यानात वसंत सागर जलाशय, कोकणदर्शन, झोळंबी सडा अशी पर्यटनस्थळे आहेत. वसंतनगर जलाशयावर उडणारे रंगीबेरंगी पक्षी, त्यांच्या लकबी आणि आवाजाचं वेगळेपण जाणवल्याशिवाय राहत नाही. अभयारण्यात सिद्धेश्वर नावाचे एक ठिकाण आहे. येथे खडकाळ घळी आहेत, इथे अस्वलांचा वावर आहे. वारणा नदीचा उगम, स्वामी समर्थाच्या वास्तव्याने पुनीत झालेली रामघळ, बारमाही वाहणारी रामनदी व त्यापुढे असणारा धबधबा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. वन्य प्राणी निरीक्षणासाठी उद्यानात काही ठिकाणी निरीक्षण मनोरे उभारण्यात आले आहेत. हिरवीगार घनदाट वनराई, सह्याद्रीचे उंच उंच एकमेकांशी स्पर्धा करणारे डोंगर, दुर्मीळ पशुपक्ष्यांचा येथे असलेला राबता आणि मुख्य म्हणजे येथील प्रदूषणरहित वातावरण पाहून आपण एकदम खूश होऊन जातो. नोव्हेंबर ते मार्च हा या पर्यटनासाठी उत्तम कालावधी आहे.

डॉ. सुरेखा म. मुळे drsurekha.mulay@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2017 4:21 am

Web Title: chandoli national park in maharashtra
Next Stories
1 वन पर्यटन : पैनगंगा अभयारण्य
2 मुघल स्थापत्याचा हबशी महाल
3 लोक पर्यटन : दुर्लक्षित दुर्गालेणे
Just Now!
X